मासिक पाळी जवळ आली की महिलांना अक्षरश: नको होते. हे दिवस येऊच नयेत असेही अनेकींना वाटते. याचे कारण म्हणजे या काळात शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि त्यामुळे होणारे शारीरिक त्रास. अनेकदा पाळी येण्याच्या काही दिवस आधीपासूनच पाठदुखी, पायात गोळे येणे अशा समस्या सुरू होतात. प्रत्यक्ष पाळी येते तेव्हाही पोटात कळा येणे, कंबर दुखणे, थकल्यासारखे वाटणे अशा समस्या उद्भवतात. काही वेळा हा त्रास इतका जास्त असतो की महिलांना काहीच करावेसे वाटत नाही (Ayurvedic Remedies To Control Cramps in Menstrual Cycle).
काही महिलांची पोटदुखी इतकी जास्त असते की त्यांना झोपून राहण्याशिवाय पर्याय नसतो. दर महिन्याला किमान ३ ते ४ दिवस अशाप्रकारचा त्रास होत असेल तर हा त्रास कमी होण्यासाठी आपण काही ना काही उपाय करतो. मात्र त्याचा उपयोग होतोच असे नाही, आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. पूनम यासाठीच काही सोप्या टिप्स आपल्यासोबत शेअर करतात. रोजच्या आयुष्यात काही सोपे बदल केले तर पाळी दरम्यान होणारा हा त्रास कमी होण्याची शक्यता असते. पाहूया त्या कोणते उपाय सांगतात...
१.रोजच्या आहारात गोड पदार्थांचे प्रमाण कमी करावे. आहारातल्या कॅलरीचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्याचा परीणाम म्हणजे मासिक पाळीच्या काळात वेदना होण्याचे प्रमाण वाढते.
२. मीठ खाण्याचे प्रमाण कमी करावे. मीठाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरामध्ये अनावश्यक पाणी साठून राहते आणि पाळीच्या काळातील वेदना वाढण्याची शक्यता असते.
३.हिरव्या भाज्या कोथिंबीर, पालक,बटाटा, सफरचंद, चिकू इ. फळे यांसारख्या जीवनसत्त्व ‘ब’असणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. फळे सालीसहित खायला हवीत, तसेच सालीसहित डाळींचा वापर करावा.
४.मासिक पाळी आधी दोन-तीन दिवसांपासून रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यातून एक चमचा त्रिफळा चूर्ण घ्यावे.
५. हिंग पावडर एक चमचा आणि जिरे पावडर एक चमचा आणि गुळ दोन चमचे एकत्र करून त्याच्या लहान गोळ्या करुन ठेवाव्यात. या गोळ्या दिवसातून ३-४ वेळा चघळून खाव्यात.