मासिक पाळीचे ४ दिवस म्हणजे अगदी नको नको होणारे दिवस. पाळी यायच्या आधीच ४ ते ५ दिवसांपासून पायात पेटक्या येणे, कंबद दुखणे, अंगदुखी असे त्रास सुरू झालेले असतात. जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने काही जणींना पाळी सुरू झाल्यावर तर काहीच करायची इच्छा होत नाही. काहीवेळा या वेदना असह्य असतात. काही महिलांची पोटदुखी इतकी जास्त असते की त्यांना झोपून राहण्याशिवाय पर्याय नसतो. दर महिन्याला किमान ३ ते ४ दिवस अशाप्रकारचा त्रास होत असेल तर हा त्रास कमी होण्यासाठी आपण काही ना काही उपाय करतो, मात्र त्याचा उपयोग होतोच असे नाही (Diet Tips For Menstrual Cycle).
मात्र मासिक पाळीच्या काळात आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास हे त्रास कमी होण्याची शक्यता असते. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ किरण कुकरेजा यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देतात. या काळात शरीराचे योग्य पद्धतीने पोषण होणे गरजेचे असल्याने कोणते पदार्थ खायला हवेत याविषयी आयुर्वेदात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यानुसार पाळीच्या काळात कोणते पदार्थ खायला हवेत याविषयी त्या सांगतात. पाहूयात या पदार्थांची यादी..
१. काकडी - पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी काकडी आवर्जून खायला हवी.
२. बीटाचा ज्यूस - बीटात लोह आणि फोलिक अॅसिड चांगल्या प्रमाणात असल्याने या काळात हे दोन्ही घटक आवश्यक असतात.
३. काळे मनुके - पाळीमुळे पोटात येणाऱ्या कळा कमी होण्यासाठी रात्रभर पाण्यात भिजवलेले ८ ते १० मनुके खाणे फायदेशीर ठरते.
४. कलिंगड - सूज आल्यासारखे वाटत असेल तर ती कमी होण्यासाठी कलिंगड उपयुक्त ठरते.
५. लिंबी-पुदीना सरबत - पाळीच्या दरम्यान होणारा त्रास कमी होण्यासाठी लिंबू आणि पुदीन्याचे सरबत अवश्य प्यायला हवे.
६. केळं - केळ्यामध्ये शरीराला आवश्यक असे अनेक घटक असतात हे आपल्याला माहित आहे. मासिक पाळीच्या काळात शरीराला ताकदीची आवश्यकता असल्याने केळं आवर्जून खायला हवं.
७. डार्क चॉकलेट - आनंदी राहण्यासाठी चॉकलेट खाणे केव्हाही फायद्याचे असते. डार्क चॉकलेट खाल्ल्याने आपले हॅपी हॉर्मोन अॅक्टीव्हेट होतात.