मासिक पाळीच्या वेळी आता बहुतांश महिला सॅनिटरी पॅडसचा वापर करतात. सॅनिटरी पॅड वापरणे तुलनेने सोपे असल्याने आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही तरुणी आणि महिला वेगवेगळ्या ब्रँडचे सॅनिटरी पॅडस वापरतात. त्यातही सध्या कापडी किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे पॅड बाजारात उपलब्ध झाले आहेत. ते ४ दिवस फार ताणाचे होऊ नयेत यासाठी पॅड हा उत्तम पर्याय असतो. पण आपल्यातील फारच कमी जणींना पँटी लायनरविषयी माहिती असते. या दोन्हीमध्ये नेमका फरक काय? कोणती गोष्टी केव्हा वापरायची, त्यामुळे आपल्याला काय फायदा होतो याविषयी समजून घेणे महत्त्वाचे आहे (Difference Between Sanitary Pad and Panty liner ).
पॅड आणि पँटीलायनरमध्ये नेमका फरक काय?
1.पँटी लायनर हे दिसायला पॅड सारखं दिसत असलं तरी त्याचा आकार पॅडपेक्षा लहान असतो.
2.पॅडला ज्याप्रमाणे बाजुने चिकटवण्यासाठी सोय असते तशी सोय पँटी लायनरला नसते.
3.पॅडमध्ये द्रव पदार्थ शोषून घेण्याची क्षमता जास्त असते, मात्र पँटी लायनरमध्ये ती तुलनेने अगदीच कमी असते.
पँटी लायनर का आणि कधी वापरायचं?
१.ज्यावेळी आपल्याला पाळी येणार आहे असे वाटायला लागते, त्यावेळी पँटी लायनर घालणे फायद्याचे ठरते. बऱ्याच जणींना पाय दुखणे, पोटात दुखणे, कंबर दुखणे असं ४ ते ५ दिवस आधीपासूनच व्हायला लागतं अशावेळी पँटी लायनर घातलेलं असेल तर आतले कपडे खराब होण्याची शक्यता राहत नाही.
२. पिरीयडस येण्याच्या सुरुवातीला ज्याप्रमाणे अगदी कमी फ्लो होतो, त्याचप्रमाणे पिरीयडस संपत आले की त्यानंतरही थोडं थोडं स्पॉटींग होत राहतं. अशावेळी पॅड लावले तर ते लवकर भरत नाही, त्यामुळे ते जास्त वेळ तसेच ठेवावे लागते. आधीच ४ दिवस पॅड वापरुन आपण इरीटेट झालेलो असतो त्यामुळे पुन्हा अगदी कमी फ्लोसाठी पॅडची गरज नसते. अशावेळी शेवटचा दिवस झाला की आपण पँटी लायनर आवर्जून वापरु शकतो. त्याचा चांगला फायदा होतो.
३. काहीवेळा आपल्याला व्हाईट डिस्चार्ज होतो. अशावेळीही आपले आतले कपडे खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेरच्या कपड्यांनाही ओलसरपणा येतो आणि ऑफीसमध्ये किंवा बाहेर कुठेही गेलो तरी आपण अस्वस्थ होतो. त्यामुळे अशावेळीही पँटी लायनर अतिशय उपयुक्त ठरतो. हा पँटी लायनर आपण दिवसभर ठेवला तरी काहीही त्रास होत नसल्याने व्हाईट डिस्चार्जसाठी हा अतिशय चांगला उपाय ठरु शकतो.