मासिक पाळी आली की पोट दुखणं, पायात गोळे येणं, कंबर दुखणं तसं बायकांसाठी नेहमीचंच. आणि इतरांनाही वाटतं की हे काय दर महिन्याचंच रडगाणं. पण त्यामुळे जर एखाद्या जागतिक चॅम्पिअनशिपलाच मुकावं लागलं, ऐन स्पर्धेत पायात गोळा आला आणि माघार घ्यावी लागली तर? तसंच काहीसं ब्रिटिश धावपटू दिना ॲशर स्मिथचं झालं. मुनीच इथं झालेल्या युरोपिअन चॅम्पिअनशिप स्पर्धेत २०० मिटर फायनलला तर दिना पोहोचली पण शंभर मिटर फायनलमध्ये तिला माघार घ्यावी लागली कारण तिच्या पोटरीत गोळा आला. त्यावर तिनं ‘गर्ल स्टफ इश्यूज’ अशी माध्यमांना प्रतिक्रियाही दिली. पण दिनानं हा विषय आता जगभरातल्या माध्यमांसमोर मोकळेपणानं मांडला आहे आणि प्रश्न उपस्थित केला आहे की मासिक पाळीचा, त्यामुळे होणाऱ्या त्रासाचा महिला खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो, तर तो काय होतो त्यावर उपाय काय यावर रिसर्च व्हायला हवा. हा प्रश्न पुरुषांचा नाहीच म्हणून त्याकडे कितीकाळ दुर्लक्ष करणार?’ (Dina asher smith, demands more research on periods and performance)
(Image : Google)
दिनाच्या पूर्वीही स्कॉटिश खेळाडू एलिश मॅकलगन हिनंही हाच मुद्दा उपस्थित केला होता. तिलाही मासिक पाळी आल्यानं दोनवेळा स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. तिचंही म्हणणं आहे की महिला खेळाडूंसाठी मासिक पाळी हा नैसर्गिक मुद्दा असला तरी त्याचा परिणाम संपूर्ण कारकिर्दीवर होतो याचा स्पर्धेच्या नियमात विचार व्हायला हवा. आताही दिना तेच म्हणते आहे. ती स्पर्धेनंतर स्पष्टच शब्दात म्हणाली की, मासिक पाळीत होणाऱ्या त्रासावर तसंही बायका बोलत नाहीत. तो त्रास कुणाला सांगत नाही. पण त्रास होतोच. मात्र इतरांनाही असंच वाटतं की हा काय नेहमीचाच त्रास आहे, एवढं काय त्यात? पण त्या वेदनांनी, त्यातून होणाऱ्या त्रासानं कामगिरीवर, क्षमतांवर परिणाम होतो. तो किती होतो, त्यावर उपाय काय यावर रिसर्च व्हायला पाहिजे. हाच प्रश्न जर पुरुषांच्या जगाचा असता तर त्यावर एव्हाना उत्तरं शोधली गेली असती.’
(Image : Google)
दिना जे कळकळून सांगते आहे, त्याला डॉक्टरही दुजोरा देतात. इंग्लंडच्याच एक्सरसाईज मेडिसिनच्या डॉक्टर रिबेका रॉबिनसन इंडिपेंडट युके या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात की मासिक पाळीचा महिलांच्या कामगिरीवर कमीजास्त परिणाम होतोच. पण त्याचा आजवर शास्त्रीय सखोल अभ्यास झालेला नाही, तो व्हायला हवा.’ दिनाचीही हीच मागणी आहे की मासिक पाळीचा खेळाडूंच्या कामगिरीवर काय परिणाम होतो यावर संशोधन व्हायला हवे.