ते चार दिवस म्हणजे प्रत्येक बाईच्या आयुष्यातली डोकेदुखी. पाळी आली रे आली की, अनेकींच्या कपाळावर आठ्या पडतात. एकतर सातत्याने होणाऱ्या ब्लिडिंगमुळे वारंवार बदलावे लागणारे पॅड आणि दुसरे म्हणजे पोटदुखी. या दिवसात एकडून तिकडे हलणेही अनेक जणींना कठीण होऊन बसते. अशा काळात व्यायाम कसा करायचा, असा विचार करत असाल तर थोडे थांबा. कारण व्यायाम तुम्हाला या काळात मोठ्या प्रमाणात आराम देऊ शकतो. म्हणूनच हलका- फुलका व्यायाम करा आणि पाळीच्या त्या त्रासाला काही प्रमाणात का होईना पण छुमंतर करून टाका, असा सल्ला तज्ज्ञ मंडळी देत आहेत. खूप हेवी एक्सरसाईज करणे पाळीच्या दिवसांमध्ये नक्कीच टाळले पाहिजे. पण स्ट्रेचिंग, वॉकींग, मेडिटेशन यासारखा व्यायाम करून नक्कीच पाळीचे दुखणे काही प्रमाणात हा का होईना पण कमी होऊ शकते. १. भुजंगासन पाळीच्या दिवसात जर पोटदुखीचा किंवा पाठदुखीचा त्रास होत असेल तर भुजंगासन हा व्यायामप्रकार करावा. भुजंगासन करण्यासाठी सगळ्यात आधी पालथे झोपा. यानंतर हात छातीच्या आजूबाजूला ठेवा आणि हातावर ताण देऊन कंबरेपर्यंतचे शरिर वर उचला. मानही शक्य तेवढी मागे करा आणि नजर छताकडे स्थिर करा. जास्तीतजास्त ३० ते ६० सेकंदांपर्यंत व्यायामाची ही स्थिती कायम ठेवावी. जास्त ताण वाटत असल्यास आसन स्थिती सोडून रिलॅक्स व्हावे.
२. वॉकिंग शरिराला कोणताही जास्त ताण न देता एका स्थिर लयीत वॉकींग केले तरी पाळीच्या दुखण्यातून आराम मिळू शकतो. पाळीदरम्यान अनेक जणींच्या पोटऱ्या खूप जास्त दुखतात. या दुखण्यालाही चालण्याने नक्कीच आराम मिळू शकतो आणि पिरेड्सदरम्यान अनेकींना येणारे डिप्रेशन काही प्रमाणात कमी होऊ शकते. ३. स्ट्रेचिंग पाळीच्या दिवसात अनेकींना पोटदुखी, पायात पेटके येणे, पाठ आणि कंबर दुखणे असे त्रास सतावू लागतात. या सगळ्यासाठी उत्तम व्यायामप्रकार म्हणजे स्ट्रेचिंग. वृक्षासन, ताडासन यासारखे व्यायाम करून तुम्ही स्ट्रेचिंग करू शकता किंवा इतर कोणतेही स्ट्रेचिंगचे प्रकार निवडू शकता. बेडवर पडूनही स्ट्रेचिंग करता येते. ४. लिफ्टिंग चालणे किंवा इतर कोणताही व्यायाम करणे तुम्हाला शक्य नसेल तर वेट लिफ्टींग हा व्यायामही तुम्ही करू शकता. यामध्ये मात्र एकच काळजी घ्या की खूप हेवी वजन उचलू नका. लाईट वेट लिफ्टिंग केल्याने तुमच्या मसल्सला आराम मिळू शकतो.
५. डान्सिंग एरॉबिक्स किंवा फार त्रास न होणारा झुंबा डान्स करूनही पाळीतील दुखण्यामध्ये आराम मिळू शकतो. पण खूप जास्त हेवी डान्स करणे या काळात टाळा. यामुळे अवास्तव थकवा येऊ शकतो आणि पायदुखी जाणवू शकते. ६. स्विमिंग स्विमिंग आणि पाळीमध्ये ? असा प्रश्न पडून कदाचित तुमच्या भुवया उंचावल्या असतील. पण हो अनेक एक्सपर्टने पाळीमध्ये स्विमिंगचा व्यायाम हा उत्तम असल्याचे सांगितले आहे. मेन्स्ट्रुअल कप वापरून तुम्ही आरामात स्विमिंग करू शकता.