Join us   

पिरिएड्सच्या आधी चेहरा पिंपल्सनी भरतो? १० उपाय, त्रासापासून सुटका व्हायला होईल मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 5:16 PM

Periods pimple : पिंपल्समुळे आपल्याला त्रास तर होतोच पण आपल्या सौंदर्यावरही त्याचा परिणाम होतो, पाहूयात उपाय

ठळक मुद्दे पाळी येण्याआधी काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवीआहार-विहाराकडे पुरेसे लक्ष दिल्यास पाळीच्या आणि इतरही समस्या दूर होण्यास मदत होते.

महिन्याची ठराविक तारीख जवळ आली की आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स यायला लागतात. असे पिंपल्स (Acne) आले की आपण समजून घेतो की आपली मासिक पाळी (menstruation cycle ) आता जवळ आली आहे. पाळीच्या दरम्यान होणारा त्रास वेगळाच पण पाळी यायच्या आधीही अंगदुखी, कंबरदुखी, पाय दुखणे अशा समस्या उद्भवतात. या सगळ्यात आणखी एक महत्त्वाची समस्या असते ती म्हणजे चेहऱ्यावर पिंपल्स (pimples) येण्याची. थेट चेहऱ्याच्या सौंदर्यात बाधा आणणाऱ्या या समस्येमुळे आपल्यातील अनेक जणी फार हैराण होऊन जातात. पाळी होऊन गेली की हे पिंपल्स जात असतील तरीही कधी एकदा पाळी येते आणि हे पिंपल्स जातात असे आपल्याला होऊन जाते. 

पाळी सुरू असताना एखादा सण-समारंभ आला की मग तर आपली फारच चिडचिड होते. कारण चेहऱ्यावरील या पिंपल्समुळे आपल्याला थ्रेडींग, फेस क्लिनिंग, फेशियल, मेकअप असे काहीच नीट करता येत नाही. पाळीच्या आधी आणि दरम्यान येणाऱ्या या पिंपल्समागची कारणे लक्षात घ्यायला हवीत. पाळीदरम्यान आपल्या शरीरातील हार्मोन्स वेगाने बदलत असतात. हे मुरुम लाल रंगांचे आणि जास्त त्रासदायक असतात. पीरियड्सच्या दिवसांमध्येही शरीरातील एस्ट्रोजन कमी होते आणि टेस्टोस्टेरोन वाढते. या हार्मोनची पातळी वाढल्याने त्वचेवरील रोमछिद्रात सीबमची निर्मिती करणाऱ्या ग्रंथींमध्ये सीबम जास्त प्रमाणात तयार होते आणि पुरळ येतात.

(Image : Google)

पाळीच्या दरम्यान पिंपल्सचा त्रास होऊ नयेत यासाठी उपाय 

१. पाळीच्या काळात काहींचा चेहरा एकदम तेलकट होतो नाहीतर एकदम कोरडा होतो. अशावेळी चेहरा कोमट पाण्याने धुवावा. त्यामुळे चेहऱ्यावरील बॅक्टेरीया निघून जाण्यास मदत होते. दिवसातून दोन वेळा चेहरा धुतल्यास मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होईल. 

२. नाक, कपाळ, हनुवटीवरील ब्लॅक हेड्स आणि व्हाइट हेड्स नैसर्गिक पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करावा. हे करताना त्वचेला कोणतीही इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. 

३. पाळीच्या काळात सीबमची निर्मिती झाल्याने चेहऱ्यावर तेल जमा होते. अशावेळी मेकअप करणे टाळावे. कारण मेकअपमुळे चेहऱ्याची रंध्रे बंद होतात आणि घाण चेहऱ्याच्या आतल्या बाजूला साठून राहते. त्यामुळे शक्यतो मेकअप टाळलेलाच बरा

४. पाळीच्या काळात चेहऱ्यावर मुरुमे येऊ नयेत म्हणून जास्तीत जास्त पाणी प्यावे. त्यामुळे पोट साफ होईलच पण त्वचाही जास्तीत जास्त स्वच्छ राहण्यास मदत होईल. 

५. पाळी यायच्या काही काळ आधीपासून मसालेदार, तेलकट पदार्थ टाळायला हवेत. ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन ई आणि अँटी ऑक्सिडेंट गुणधर्म असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.

६. आहारात भरपूर भाज्या, फळे, ज्यूस यांचा समावेश करायला हवा. त्यामुळे चेहरा चांगला राहण्यास मदत होते. 

७. ताण-तणावमुळेही चेहऱ्यावर पिंपल्स येतात. या काळात ती जास्त वाढतात. पाळीच्या दरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे आपली चिडचिड वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा काळात ताणतणावांपासून दूर राहणे केव्हाही चांगले. त्यामुळे पिंपल्सचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. 

(Image : Google)

८. साजूक तूप खाण्याचे प्रमाण वाढवावे. कारण यामुळे हार्मोनल बॅलेन्स राखला जातो आणि तूप त्वचेला आतून पोषण देण्याचे काम करते. त्यामुळे नियमितपणे तूपाचे सेवन करावे.

९. आठवड्यातून किमान तीन वेळेस तरी नारळपाणी प्यावे. पाळी सुरु असतानाही रोज एक नारळपाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. 

१०. व्यायाम करणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण पाळीच्या समस्या दूर होण्यासाठी तर हे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे व्यायामात सातत्य ठवायला हवे.   

टॅग्स : आरोग्यमासिक पाळी आणि आरोग्यब्यूटी टिप्स