Join us   

पाळी सुरू असताना अजिबात खाऊ नयेत असे ३ पदार्थ; तज्ज्ञ सांगतात त्यांचे तोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2022 5:08 PM

Foods Women Should avoid during Periods Menstruation : पाळीच्या कालावधीत कोणते पदार्थ टाळावेत आणि त्याने काय फायदे-तोटे होतात याविषयी...

ठळक मुद्दे गोड पदार्थ, मसालेदार पदार्थ, खूप जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले पदार्थ, अल्कोहोल, कॉफी किंवा कॅफेन या गोष्टी या कालावधीत टाळायला हव्यात.सुकामेवा, दाणे, डाळी असे पचायला हलके पदार्थ खाणे केव्हाही चांगले. 

पाळी सुरू असली की आपल्याला काही सुचत नाही. एकीकडे पोटातून येणाऱ्या कळा, दुसरीकडे थकवा, दर काही वेळाने होणारी मळमळ यामुळे आपण अगदी अस्वस्थ होऊन जातो. कधी एकदा ४ दिवस संपतात आणि आपण नेहमीच्या रुटीनला लागतो असे होऊन जाते. पाळी आली तरी घरातली कामं, ऑफीस हे सगळं सुरू असतंच त्यामुळे म्हणावा तसा आराम मिळतोच असं नाही. मात्र या पाळीच्या काळात काही गोष्टींची थोडी काळजी घेतल्यास आपले आरोग्य चांगले राहू शकते आणि आपल्याला पाळीचा म्हणावा तितका त्रास होत नाही. आता पाळीच्या काळात स्वच्छता किंव इतर काळजी आपण घेतोच. मात्र आहाराच्या बाबतीत कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत आपल्याला पुरेशी माहिती असतेच असे नाही. म्हणूनच प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाडी योगेंद्र याबाबत काय सांगतात ते आपण समजून घेणार आहोत. पाळीच्या कालावधीत कोणते पदार्थ टाळावेत आणि त्याने काय फायदे-तोटे होतात याविषयी (Foods Women Should avoid during Periods Menstruation)...

पाळी सुरू असताना खाऊ नयेत असे पदार्थ 

१. खारट पदार्थ 

पाळीच्या काळात पोटात किंवा कंबरेत क्रॅम्प येणे हे सगळ्यात सामान्य लक्षण आहे. स्नायूंमध्ये एकसारखे क्रॅम्प येत असतील तर आपण हैराण होऊन जातो. त्यात मीठाचे पदार्थ खाल्ल्यास हे क्रॅम्प वाढण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर खारट पदार्थांमुळे सूज येण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे पॅकेट फूड, चटणी, लोणचं, पापड यांसारखे पदार्थ टाळलेले केव्हाही चांगले.

२. हाय फॅट फूड 

पाळीच्या काळात आपले हार्मोन्स संतुलित असणे अतिशय आवश्यक असते. त्यामुळे जास्त फॅटस असणारे पदार्थ खाल्ले तर पाळीमुळे होणारा रक्तप्रवाह वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला दिवसभर अस्वस्थ वाटू शकते. म्हणूनच बटर, क्रिम, फास्ट फूड, वेफर्स यांसारख्या गोष्टी खाणे शक्यतो टाळायला हवे. त्यापेक्षा सुकामेवा, दाणे, डाळी असे पचायला हलके पदार्थ खाणे केव्हाही चांगले. 

३. याशिवाय 

गोड पदार्थ, मसालेदार पदार्थ, खूप जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले पदार्थ, अल्कोहोल, कॉफी किंवा कॅफेन या गोष्टी या कालावधीत टाळायला हव्यात. कारण या पदार्थांमुळे पाळीच्या काळात गॅसेस किंवा पोटात गोळा येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पाळीच्या काळातील दुखणे, थकवा आणि अस्वस्थता कमी करायची असेल तर अशाप्रकारचे पदार्थ टाळलेले केव्हाही चांगले. यामुळे पाळीचा त्रास नक्कीच काही प्रमाणात का होईना कमी होऊ शकतो. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्य