डॉ. पौर्णिमा काळे (आयुर्वेद आणि योगतज्ज्ञ)
मुलगी वयात आली सुरू होणारी मासिक पाळी काही मुलींना अक्षरश: रडायची वेळ आणते. काहींना या पाळीचा इतका त्रास होतो की वेदना असह्य होतात. आयुर्वेदानुसार मासिक पाळीच्या काळात स्त्रिया राजस्वला अवस्थेत असतात, ज्यामध्ये शरीर अधिक संवेदनशील होते. या काळात स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी असे आयुर्वेद सुचवते, ज्याला "राजस्वला परिचर्या" म्हणतात. ही परिचर्या म्हणजेच जीवनशैली पाळल्याने शरीरातील दोष संतुलित राहण्यास मदत होते. जीवनशैलीच्या या नियमांमुळे पाळीतील त्रास कमी होतो आणि भविष्यात आरोग्य टिकून राहते. आता त्या ४ दिवसांत ही जीवनशैली व्यावहारिक पद्धतीने कशी अवलंबता येईल ते पाहूया (How to reduce period pain menstrual cycle)..
१. आहारात बदल
मासिक पाळीच्या काळात शक्यतो सात्त्विक आणि पचनास सोपा आहार घ्यावा. जड, मसालेदार आणि तिखट पदार्थ टाळावेत. भाजी, फळे आणि ताज्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. साळीच्या लाह्या, लाह्यांचा चिवडा याचे सेवन करावे. यामुळे शरीराला पोषण मिळते आणि रक्त शुद्धीकरण क्रिया चांगली होते. या काळात गूळ आणि तिळाचे सेवन केल्याने शरीरातील रक्त परिसंचरण सुधारते आणि पोटदुखी कमी होते. या काळात पोट साफ व्हावे यासाठी घरी बनवलेले गोड ताक घ्यावे, यामुळे पचन सुधारते आणि शरीरातील उष्णता संतुलित राहण्यास मदत होते. त्याशिवाय त्रिफळा चूर्ण रात्री गरम पाण्यासोबत घेतल्यास पोट साफ राहते आणि वात दोष नियंत्रित होतो. पाळीच्या काळात थंड पाण्याचे सेवन टाळावे. यामुळे वात दोषाचा बिघाड होऊ शकतो आणि पोटदुखी वाढू शकते.
२. विश्रांती आणि आराम
पाळीच्या काळात अधिक मेहनतीचे काम, भारी वजन उचलणे, व्यायाम किंवा मोठे प्रवास शक्यतो टाळावेत. यावेळी शरीराला पूर्ण विश्रांती देणे अत्यंत आवश्यक असते. पुरेशी झोप घेतल्यास शरीराची ऊर्जा परत मिळवता येते.
३. स्नान आणि स्वच्छता
पाळीच्या काळात थंड पाण्याने स्नान टाळावे, कारण यामुळे वात दोष निर्माण होतो. याऐवजी गरम पाण्याने स्नान करणे अधिक चांगले असते.नाहताना पाण्यात तुळस, कडुलिंबाची पाने किंवा कोरफड घातल्यास सूज आणि त्वचा संक्रमण कमी होण्यास मदत होते.
४. मानसिक ताण कमी करणे
ध्यान किंवा ध्यानसदृश व्यायामाचा सराव मानसिक शांतता मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतो. काही मिनिटे शांत बसून श्वसन नियंत्रित करणे हे मानसिक ताण कमी करण्याचे उत्तम साधन आहे. या काळात मन:शांती राखणे आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आवश्यक आहे.
५. तेल मालीश (अभ्यंग)
वातशामक तेलांनी विशेषतः तिळाच्या तेलाने हलकी मालीश करणे शारीरिक आराम आणि ताण कमी करण्यासाठी उपयुक्त असते. एरंड तेलात चिमुटभर हिंग टाकून ते तेल कोमट करायचे. या तेलाने पोटावर हलक्या हाताने मालिश केल्यास पोटदुखी कमी होते. पाठ आणि पायांवर कोमट तीळाच्या तेलाने मालीश केल्यास वात दोष कमी होऊन वेदना कमी होतात.
नियमितपणे करा या गोष्टी...
१. पाळीच्या दिवांसव्यातिरिक्त इतर दिवशी ७-७ दिवसांनी एरंड तेल घ्यावे. त्यानंतर होणाऱ्या जुलाबांनी पोट साफ होते आणि वात दोष संतुलित राहून पोटदुखी होत नाही.
२. रोज दुधा शतावरी कल्प घ्यावे. ज्यांना मधुमेह आहे अशांनी शतावरी कल्प न घेतो शतावरी चूर्ण घ्यावे.
३. पाळी वेळी जास्त अंगावरून जाऊन जर पोट दुखत असेल तर अशोकअरिष्ट २-२ चमचे पाण्यात मिक्स करून घ्यावे.
४. दुर्वांचा रस २-२ चमचे दोन वेळा घेतल्यास पाळीचा त्रास कमी होण्यास मदत होते.