Join us   

मासिक पाळी अनियमित? कधी लवकर, कधी दोन-दोन महिने येतच नाही? गंभीर आजारांचा धोका, तज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2022 1:18 PM

Irregular menstruation: सध्या मासिक पाळी (periods) अनियमित असण्याचा त्रास अनेक जणींमध्ये वाढत चालला आहे. पण हा त्रास मुळीच हलक्यात घेऊ नका, असं सांगत आहेत काही तज्ज्ञ..

ठळक मुद्दे मासिक पाळीचा संबंध थेट ओव्ह्यूलेशन म्हणजेच शरीरात स्त्री बीज तयार होण्यावर होत असतो. त्याचा परिणाम मातृत्व लांबण्यावर होऊ शकतो. 

वयाच्या १४- १५ व्या वर्षीपासून मासिक पाळी (Irregular menstruation cycle) जी सुरु होते ती अगदी चाळिशीपर्यंत आणि त्याच्या नंतरही काही जणींची साथ देते. पाळीचा कितीही कंटाळा येत असला, पाळीत होणारा त्रास आठवून पाळीचे दिवस जवळ येताच पोटात गोळा येत असला तरी महिन्याच्या महिन्याला नियमितपणे येणारी पाळी प्रत्येकीला समाधान देते. कारण पाळीचं नियमित असणं हे थेट त्या स्त्री च्या आरोग्याशी संबंधित असतं. म्हणूनच तर पाळी नियमित येणं, ठरलेले दिवस पुरेसा रक्तस्त्राव (bleeding in menstruation) होणं हे अतिशय गरजेचं आहे.

 

पण हल्ली पाळीच्या अनियमिततेचं (Health problems due to irregular menses) प्रमाण तरुण मुलींमध्ये खूप जास्त वाढलं आहे. पाळी आल्यानंतर पहिले एक- दोन वर्ष पाळी अनियमित असणं समजण्यासारखं आहे. त्या काळात शरीरात खूप जास्त प्रमाणात हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे त्याचा परिणाम पाळीवर होतो. पण त्यानंतर मात्र पाळी नियमित व्हायलाच पाहिजे. काही जणींची पाळी कधी महिना भरातच येते तर कधी दोन- दोन महिने येतच नाही. अशी पाळीच्या बाबतीतली कोणतीही अनियमितता पुढे जाऊन भविष्यात अतिशय गंभीर ठरू शकते, असं आयव्हीएफ एक्सपर्ट डॉ. उन्नती ममटोरा यांनी एका हिंदी वाहिनीशी बोलताना सांगितलं.

 

आई होण्यावर होऊ शकतो परिणाम मासिक पाळीचा संबंध थेट ओव्ह्यूलेशन म्हणजेच शरीरात स्त्री बीज तयार होण्यावर होत असतो. स्त्री बीज तयार होतं त्यानंतर ते परिपक्व होतं, त्यानंतर मासिक पाळी येते, असं ते साधारणपणे २८ दिवसांचं चक्र असतं. मासिक पाळीच जर अनियमित असेल तर स्त्री बीज तयार होण्याचा नेमका काळ कोणता, ते योग्य पद्धतीने तयार होत आहे की नाही, यासगळ्या गोष्टी स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे मग त्याचा परिणाम मातृत्व लांबण्यावर होऊ शकतो. 

 

मासिक पाळी अनियमित असल्यास या आजारांचा धोका - पीसीओएस - थायरॉईड - वजन वेगाने वाढणे किंवा मग कमी होणे - स्ट्रेस लेव्हल वाढणे - हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतो आणि त्यातून वेगवेगळ्या आजारांची निर्मिती होते

 

तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज - विसाव्या वर्षीनंतरही पिरेड्स अनियमितच येत असतील, तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - एखाद्या महिन्यात पिरेड्स लवकर येणे किंवा लांबणे हे नॉर्मल असू शकतं. पण हा त्रास दर महिन्यात किंवा दर एक- दोन महिन्यांनी होत असेल तर मात्र डॉक्टरांकडे जा. - पाळीमध्ये खूप जास्त किंवा खूप कमी रक्तस्त्राव होत असेल, तरीही डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्य