Join us   

Irregular Period Problem : मासिक पाळी सारखी पुढे-मागे होते? ४ कारणं, वेळीच सवयी बदला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2022 11:34 AM

Irregular Period Problem : पाळी नियमित असेल तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, पाहूयात पाळी अनियमित होण्यामागे प्रामुख्याने कोणती कारणे असतात.

ठळक मुद्दे गोळ्या घ्यायची वेळ आलीच तर त्या मनाने न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला हव्यात. कोणत्याही गोष्टीाचा जास्त ताण न घेणे, ताण येत असेल तर तो कमी होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

ठराविक वयानंतर नियमित मासिक पाळी येणे हे महिलांचे आरोग्य चांगले असण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. २८ दिवसांनी येणारी मासिक पाळी अनियमित होण्याची समस्या गेल्या काही वर्षात तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. घरातील कामे, ऑफीस, इतर ताण आणि मुख्यत: जीवनशैलीतील बदल यांमुळे मासिक पाळीच्या तारखा पुढे-मागे होण्याची समस्या वाढली आहे. (Irregular Period Problem) अनेकींना ४ दिवसाची पाळी १० ते १५ दिवस सुरूच राहते. काहींना केवळे २ दिवसच रक्तस्त्राव होतो. तर काही महिलांना दर १५ दिवसांनी पाळी येते. इतकेच नाही तर २ ते ३ महिने पाळी न येणाऱ्याही अनेक महिला आपल्या आजुबाजूला असतात. यामुळे अतिरिक्त रक्तस्त्राव, त्यामुळे येणारा थकवा, अंगदुखी यांसारख्या इतर समस्याही डोके वर काढतात. मग औषधोपचार घेऊन ही पाळीची सायकल नीट करावी लागते. मात्र पाळी नियमित असेल तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते आणि इतर त्रासही दूर होतात. पाहूयात पाळी अनियमित होण्यामागे प्रामुख्याने कोणती कारणे असतात. 

(Image : Google)

१. वजन कमी-जास्त होणे 

तुमचे वजन अचानक खूप वाढले किंवा खूप कमी झाले तर त्याचा शरीराच्या सर्वच क्रियांवर परिणाम होत असतो. त्यामुळे आपले वजन वाढले किंवा कमी झाले की त्याचा आपल्या पाळीच्या सायकलवर परीणाम होतो. तुम्ही अजिबात व्यायाम करत नसाल किंवा खूप जास्त व्यायाम करत असाल तरी ही सायकल बिघडू शकते. त्यामुळे वजन एका ठराविक मर्यादेत ठेवणे पाळी नियमित होण्यासाठी आवश्यक असते. 

२. आहारातील बदल

संतुलित, पोषक आहार हा उत्तम तब्येतीसाठी केव्हाही अतिशय चांगला. मात्र आपण सतत मसालेदार, जंक फूड खात असू तर त्याचा आहारावर विपरित परिणाम होतो. शरीराला आवश्यक असणारे पोषण मिळाले नाही तर पाळीची सायकल अनियमित होण्याची शक्यता असते. त्यामुळे आहार चांगला ठेवणे अतिशय आवश्यक आहे. 

३. ताणतणाव 

आपण वेगवेगळ्या गोष्टींचा सतत ताण घेत असतो. या ताणाचा आपल्या शरीरावर आणि मनावर विपरित परीणाम होत असतो. सतत ताणतणावात असलेल्या स्त्रियांना पाळी पुढे-मागे होण्याची समस्या उद्भवते आणि त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणून कोणत्याही गोष्टीाचा जास्त ताण न घेणे, ताण येत असेल तर तो कमी होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

(Image : Google)

४. गर्भनिरोधक गोळ्या 

हल्ली अनेक तरुणी लग्नाच्या आधी किंवा लग्नानंतर सर्रास गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात. या गोळ्या घेणे गर्भधारणा होऊ नये म्हणून फायदेशीर असले तरी त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. यापेक्षा सुरक्षित संबंध ठेवणे केव्हाही जास्त सोयीचे असते. किंवा एखादवेळी गोळ्या घ्यायची वेळ आलीच तर त्या मनाने न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला हव्यात. 

टॅग्स : आरोग्यमासिक पाळी आणि आरोग्यहेल्थ टिप्स