मासिक पाळीत बायकांना काय वेदना होतात, हे सांगून पुरुषांना समजणं अवघडच. पण, निदान त्या वेदनेची जाणीव तरी व्हावी म्हणून जपानमधील एका कंपनीने एक आगळावेगळा प्रयोग केला. मासिक पाळीतील वेदना, त्रास सहन करत महिला घर आणि ऑफिस दोन्हीकडे काम करत राहतात. काय सांगून कळणार कुणाला, असं म्हणत संकोचही करतात. मात्र, मासिक पाळीच्या वेदना, रजोनिवृत्तीच्या काळात बायकांना होणारा शारीरिक, मानसिक त्रास याबाबत अनेकदा घरातले पुरुष अनभिज्ञच राहतात.
ही परिस्थिती जगभरात सर्वत्र सारखीच आहे. या पार्शवभूमीवर म्हणूनच जपानमधील एका कंपनीने केलेला प्रयोग लक्षवेधी ठरतो. या कंपनीने पुरुषांना मासिक पाळीच्या काळात महिलांना होणारा त्रास समजावा, यासाठी एक प्रयोग केला. 'एक्सिओ' ही जपानमधील टेलिकम्युनिकेशन कंपनी. या कंपनीने आपल्या पुरुष कर्मचाऱ्यांना मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांचा अनुभव घेण्याची संधी दिली. पुरुषांना मासिक पाळीत बायकांना होणारा त्रास कळावा, कुणा महिलेने मासिक पाळीत त्रास होतो म्हणून सुटी मागितली तर त्याचा संवेदनशिलतेने त्यानं विचार करावा, हा त्यामागचा उद्देश.
(Image : google)
एक्सिओ कंपनीने पुरुष कर्मचाऱ्यांना 'पिरिओनाॅइड' या उपकरणाद्वारे पाळीतील वेदनांचा अनुभव दिला. पुरुषांच्या ओटीपोटाच्या खाली एक पॅड ठेवलं गेलं. या पॅडमध्ये उपकरणाच्याद्वारे इलेक्ट्रिक सिग्नल्स सोडले गेले. याद्वारे महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान ओटीपोटात, पायात, मांड्यात चमक येणे, गोळे येणे, हा जो त्रास होतो तो आणि तसाच त्रास या प्रयोगात सहभागी पुरुषांनीही अनुभवला. 'नारा वुमन्स युनिव्हर्सिटी आणि ओसाका हिट स्कूल या स्टार्टअप कंपनीतील शास्त्रज्ञांनी मिळून पिरिओनाॅइड हे उपकरण तयार केलं आहे.
मसाया शिबासाकी २६ वर्षांचा, या कर्मचाऱ्याने हा अनुभव घेतला. तो म्हणाला, त्या वेदनांमुळे मला धड उभंही राहताही येत नव्हतं. दर महिन्याला मासिक पाळीच्या काळात महिलांना काय त्रास सहन करावा लागतो, याची जाणीव झाली, असं त्याच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितलं.