मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर होतंच. पण प्रश्न अनेकींच्या आर्थिक स्थितीचाही असतो, त्याकाळात पॅड्सवर खर्च करावे इतके पैसे खर्च करणंही गावखेड्यातच काय शहरातही अनेकींना शक्य नसतं. आता गेल्या काही काळात सतत जनजागृती करण्यात आली की पॅड्स वापरा, त्यावरच्या सिनेमा-जाहिरातीही आल्या. पॅड्स वापरणं तुलनेनं सुखकर असलं तरी पुन्हा एक प्रश्न होताच की, त्या पॅड्सची विल्हेवाट कशी लावायची? पॅड्स टाकायला जागा नाही म्हणून अनेकजणी ते घरात फ्लश करु लागल्या, कुणी सर्रास कचऱ्यात फेकू लागल्या जे सफाई मदतनिसांसाठी भयंकर घातक. गावखेड्यात तर असे पॅड्स उघड्यावर फेकले तर ते जनावरांच्या पोटात जाण्याचेही भय आहेत. शहरात तरी पॅड्स कागदात गुंडाळून, पॅक करुन घंटागाडी येते त्यात टाकले जातात पण खेड्यात काय? तिथं महिलांना पॅड्स परवडणं अवघड, ते ही घेतलेच तर त्यांची विल्हेवाट हा मोठा प्रश्न. अशा सगळ्या प्रश्नांच्या आणि महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर केरळच्या एक गावानं सरळ तोडगा शोधला. आणि हे गाव ‘सॅनिटरी नॅपकिन फ्री’ गाव झालं. म्हणजे आता या गावात राहत असलेली कोणतीही महिला त्या चार दिवसात सॅनिटरी नॅपकिन वापरत नाही.
केरळच्या कुंबलांगी या गावाची ही गोष्ट. केरळचे राज्यपाल अरीफ खान मोहंमद यांनी १३ तारखेला घोषणा केली की कुंबलांगी हे एरनाकुलम जिल्ह्यातलं गाव देशातलं पहिलं सॅनिटरी नॅपकिन फ्री गाव आहे. खरंतर एका निवडणूक मोहीोतून ही योजना आकाराला आली. येथील खासदार हिबी इडेन यांनी ‘अवलकाई’ ही योजना अमलात आणली. महिलांसाठीचा उप्रक असा त्याचा अर्थ. ही योजना त्यांनी त्यांच्या एरनाकुलम मतदारसंघात राबवली. वय वर्षे १८ पासून पुढच्या महिलांना सरासरी ५००० मेन्स्ट्रुअल कपचे वाटप करण्यात आले. त्यासाठी त्यांनी एचएलएल आणि इंडियन ऑइल कार्पोरेशनची मदत घेतली. मेन्स्ट्रुअल कप कसे वापरायचे याचे महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. समजावूनही सांगण्यात आले की सॅनिटरी नॅपकिन्समध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आहे त्याचे विघटन व्हायला पाचशे वर्षांहून अधिक काळ लागतो. त्यानंतर या गावातील महिलांनी हे कप वापरण्यास सुरुवात केली आता आता हे गाव सॅनिटरी नॅपकिन मुक्त गाव म्हणून घोषित करतण्यात आले आहे.
कुबलांगी हे गाव ‘आदर्श गाव’ म्हणूनही राज्यपालांनी घोषित केले. आता प्रधान मंत्री सांसद आदर्श ग्राम योजनाही तिथं राबवण्यात येईल. कुबलांगी हे गाव केरळातले आदर्श टुरिस्ट व्हिलेज म्हणून पूर्वीच घोषित करण्यात आले आहे. या गावाच्या निमित्ताने पुन्हा तोच प्रश्न ऐरणीवर आला आहे की, मासिक पाळीच्या काळातलं आरोग्य आणि स्त्रियांना सोयीची ठरतील, आरामदायी आणि सुखकर अशी साधनं स्त्रियांपर्यंत पोहोचणं, त्यांना ती आर्थिकदृष्ट्या परवडणं, स्वच्छता पाळता येण्यासाठी पुरेसं अनुकूल असणं हे सारंच गरजेचं आहे. मेन्स्ट्रुअल कप हा सॅनिटरी नॅपकिनला एक पर्याय आहे.