Join us   

मासिक पाळी सुरु असताना डोक्यावरुन आंघोळ करु नये? हे खरं की गैरसमज?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2023 9:44 AM

Know Why No Hair wash During Periods According to Ayurveda : मासिक पाळीत डोक्यावरुन आंघोळ करत नाहीत, केस धूत नाहीत यामागे खरंच काही शास्त्रीय कारण आहे का?

मासिक पाळीत डोक्यावरुन आंघोळ करु नये असं घरातल्या वडिलधाऱ्या महिला सांगतात. अनेकजणी ते पाळतात आणि चौथ्या दिवशी डोक्यावरुन पाणी घेतात. नहाणं आलं हा शब्दप्रयोग त्यावरुनच आला. अनेकदा स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान अवघड कामे, प्रवास या गोष्टीही करु नयेत असे सांगितले जाते. बाजूला बसण्याची एक जुनी रीत होतीच, ती आता कमी झाली आहे. मात्र डोक्यावरुन पाणी मात्र अनेकजणी घेत नाही. खरंच त्याचा आरोग्याशी काही संबंध असतो की केवळ अंधश्रद्धा? आयुर्वेदात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. प्रसिद्ध आयुर्वेजदतज्ज्ञ डॉ. संदिप काळे यासंदर्भात शास्त्रीय माहिती देतात (Know Why No Hairwash During Periods According to Ayurveda).

डोक्यावरुन पाणी घेतलं तर काय होतं?

मासिक पाळी सुरू असताना अपान वायू शरीरात कार्य करत असतो. म्हणजे मासिक पाळीतून रक्तस्राव होत असतो. रज बाहेर काढण्याचे काम सुरू असते आणि अशा वेळेस कुठल्याही प्रकारचा व्यायाम किंवा ताण पडेल असे काही करणे शरीरासाठी योग्य नाही. म्हणजेच जर रक्त शरीराच्या बाहेर टाकले जातेय अशा अवस्थेमध्ये जेव्हा व्यायाम करतो तेव्हा रक्ताभिसरण वेगाने होते. म्हणून या दिवसात फार कष्टांची कामं करु नयेत.

आंघोळ केल्यानंतरही आपले रक्ताभिसरण वेगाने होते. अनेक महिलांना डोक्यावरुन आंघोळ केल्यावर तर आपल्याला नेहमीपेक्षा जास्त थकायला होते. यावेळी संपूर्ण शरीरामध्ये रक्त फिरण्याची क्रिया सुरू होते त्यामुळे अपेक्षित रज स्राव त्यावेळेस होत नाही. असे होऊ नये आणि शरीरातील अनावश्यक असलेले घटक योग्य पद्धतीने शरीराबाहेर पडावेत म्हणून रक्ताभिसरण क्रिया वेगवान होईल अशा कोणत्याही क्रिया या काळात करु नयेत. 

पण म्हणजे याचा अर्थ आंघोळ करु नये असं अजिबात नाही. स्वच्छता सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. डोक्यावरुन आंघोळ केल्यावर दमल्यासारखे होत असेल, थकवा येत असेल तर ते टाळलेले बरे. मात्र इच्छा आणि आवश्यकता असेल आणि त्यामुळे केस धुतले तर काही बिघडत नाही. आरोग्याला त्याचा अपाय नाही.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्यकेसांची काळजी