दर महिन्याची पाळी (menstruation) म्हणजे अनेक जणींसाठी नुसता वैताग. कुणाचं खूपच पोट दुखतं तर कुणाची कंबर- पाठ आखडून जाते. कुणाला खूपच ब्लिडिंग (heavy bleeding) होतं तर कुणाला सारख्या चकरा आणि उलट्या. काही जणींना तर पाळी येण्याच्या ४- ५ दिवस आधीपासूनच पोट आणि कंबरदुखीचा त्रास सुरु होतो. औषध गोळ्यांनी हा त्रास कमी करता येतो. पण दरवेळी औषधं घेण्यापेक्षा काही नैसर्गिक उपाय करता आले, तर कधीही उत्तमच.. म्हणूनच तर पिरेड्समध्ये होणारी पोटदुखी (menstrual cramps) कमी करायची असेल तर त्या ४ दिवसांत हे काही पदार्थ खाणं टाळा.
पाळीच्या दिवसांत कोणते पदार्थ खाणे टाळावे
१. प्रोसेस फूड (processed food)
बाजारात जे पॅकफूड मिळतात त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रिझर्व्हेटीव्ह असतात. प्रिझर्व्हेटीव्हमुळे शरीरातील पाणी पातळी कमी होते. आधीच पाळीमध्ये अनेक जणींना जेवण कमी जातं, पाणी कमी प्यायल्या जातं. त्यात जर शरीरातील पाणी पातळी कमी झाली तर आणखी अशक्तपणा येऊ शकतो. त्यामुळे पाळीच्या दिवसांत शक्यतो डबाबंद, पॅकफूड खाणं टाळावं.
२. कॉफी (coffee)
गरमागरम काॅफी पिऊन पोटदुखी कमी करता येईल, असं अनेक जणींना वाटतं. पण खरं तर त्याने आराम मिळण्यापेक्षा पोटदुखी जास्त वाढू शकते. कॉफीमधलं कॅफिन एन्झायटी वाढवतं. यामुळे आराम मिळण्याऐवजी बैचेनी वाढू शकते. काही जणींना यामुळे बीपी वाढण्याचाही त्रास होतो. शिवाय पाळीत पोट दुखत असेल तर थोडीशी झोप घेऊन आराम घेणं गरजेचं असतं. पण कॅफिनमुळे तुमची स्लिपिंग सायकल डिस्टर्ब होऊ शकते. त्यामुळे या दिवसांत खूप काॅफी पिणं टाळा. दिवसातून एखादा कप ठीक आहे.
३. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ (milk and dairy products)
पाळीच्या दिवसांत दूध प्यायलं की उलटी होते आणि पोट दुखणं जरा जास्तच वाढतं, असा अनेक जणींचा अनुभव आहे. याचं कारण म्हणजे दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये अगदी आईस्क्रिममध्येही arachidonic acid म्हणजेच omega-6 fatty acid असतं. या ॲसिडमुळे इन्फ्लामेशन वाढतं आणि त्यामुळे पाळीतली पोटदुखी जरा जास्तच वाढते. त्यामुळे या दिवसांत खूप जास्त डेअरी प्रोडक्ट्स खाऊ नका.
४. गोड पदार्थ (sweet and sugary products)
पाळीच्या दिवसांमध्ये तुमच्या शरीरातील ब्लड- शुगर लेव्हलमध्ये खूप जास्त चढ- उतार होत असतात. अशावेळी जर तुम्ही भरपूर साखर घातलेले गोड पदार्थ खाल्ले तर रक्तामधील साखरेचे प्रमाण खूप जास्त वाढू शकते किंवा खूप झटकन कमी होऊ शकते. या दोन्ही गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाहीतच. यामुळे एन्झायटी, मुडस्विंग असा त्रास तर होतोच, पण पिरेड्स क्रॅम्प्स पण वाढतात. शिवाय अतिगोड खाण्याने शरीरातील सोडीयमच्या पातळीवरही परिणाम होतो.