डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी
"मॅडम प्रेगनन्सी कशी असेल अहो? माझं सहा महिन्याचं बाळ अजून अंगावर पितंय! पाळी सुरूच झाली नाहीये अजून माझी.." क्लिनिक मध्ये दर काही दिवसांनी हा संवाद असतोच असतो. प्रसूतीनंतर काही काळासाठी पाळी सुरू होणे आणि मग लगेचच पुन्हा दिवस राहणे या गोष्टी अगदी आजही घडतात. पाळी येण्याचा काळ प्रत्येक स्त्रीनुसार बदलतो. काही स्त्रियांना लगेच पुढच्या महिन्यात पाळी सुरू होऊ शकते तर काही जणींना वर्षभर पाळी येत नाही. असे असले तरी या काळात प्रेगनन्सी मात्र राहू शकते. बाळ अंगावर दूध पीत असेल तर दिवस राहत नाहीत किंवा पाळी जितकी उशीरा येईल तितके चांगले या जुन्या पिढीतीली अशास्त्रीय समजूती आहेत. त्यामुळे आजही आजी किंवा आई आपल्याला असे काही सांगत असतील तर त्याबाबत योग्य ती माहिती घेणे गरजेचे आहे (Menstrual Cycle After Pregnancy).
प्रसूतीनंतर काही काळ पाळी सुरू झाली तरी अनियमित असू शकते. तसेच रक्तस्त्रावाचे प्रमाण ही बरेच कमी असणे हेही नॉर्मल आहे. प्रसूतीनंतर शरीर पूर्ववत होण्याचा काळ सहा आठवड्याचा म्हणजेच दिड ते २ महिन्याचा असतो. प्रसूतीनंतर स्त्री शारीरिक, मानसिक आणि भावनिक आंदोलनातून जात असते त्यामुळे लगेचच लैंगिक संबंध ठेवले जात नाहीत. तशी इच्छा किंवा आग्रह झाला तरी दोन महिन्यानंतर संबंध ठेवायला हवेत. तसेच प्रत्येक संबंधाच्या वेळी कंडोम वापरणे आवश्यक आहे. तसेच संबंध ठेवल्यानंतरही प्रत्येक महिन्याला एक प्रेगनन्सी टेस्ट घरच्या घरी करणे उत्तम. म्हणजे नको असलेली प्रेगनन्सी रहिल्यामुळे होणारा मनस्ताप वाचू शकतो.
स्तनपान सुरू असताना...
प्रसूतीनंतर स्तनपान चालू असताना घेता येणाऱ्या काही गर्भ निरोधक गोळ्याही उपलब्ध आहेत. परंतु गोळ्यांमुळे अनियमित रक्तस्त्राव ,वजन वाढणे असे दुष्परिणाम दिसू शकतात. म्हणूनच एका प्रसूतीनंतर संबंध ठेवताना कंडोम वापरणे यापेक्षा कॉपर टी हे सर्वात उत्तम गर्भनिरोधक आहे. पाळीच्या पाचव्या दिवशी ही बसवली जाते आणि स्तनपानाच्या काळात कॉपर टी गर्भाशयात जास्त चांगली बसू शकते. यामुळे जास्त रक्तस्त्राव होण्याची संभाव्यता बरीच कमी होते.
तर मैत्रिणींनो! जुन्यापुराण्या चुकीच्या समजुतींमध्ये अडकून स्वत:चे नुकसान करून घेण्यापेक्षा शास्त्रीय माहिती घेऊन स्वत:ची काळजी घेणे उत्तम नाही का?
(लेखिका स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ आहेत.)
shilpachitnisjoshi@gmail.com