झोप व्यवस्थित नसेल तर आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात असे आपण नेहमी ऐकतो. झोप पूर्ण झाली नाही की डोकेदुखी, अंगदुखी, अपचन, अॅसिडीटी हे त्रास होतात. पण पुरेशी झोप मिळाली नाही तर महिलांना अनियमित मासिक पाळीचा आणि पाळीदरम्यान प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्राव होण्याचा त्रासही होतो. जर्नल ऑफ स्लीप रिसर्चमध्ये नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. ६ तासांपेक्षा कमी वेळ झोपणाऱ्या मुली आणि महिलांमध्ये पाळीशी निगडीत समस्या उद्भवतात. साधारणपणे व्यक्तीला ७ ते ९ तासांची झोप आवश्यक असते. पण सर्वसाधारणपणे रोज ही झोप ६ तासांहून कमी होत असेल तर ४४ टक्के महिलांमध्ये अनियमित पाळीची समस्या उद्भवते. तर ७० टक्के महिलांना अति रक्तस्राव होतो.
सध्या कामाचा ताण, शिक्षण, कुटुंबातील जबाबदाऱ्या, इतर गोष्टींचे ताण, सोशल मीडियाचा अतिवापर, व्यसनाधिनता यांमुळे सर्वच वयोगटातील लोकांचे झोपेचे प्रमाण कमी झाल्याचे आढळते. पण मासिक पाळी येत असलेल्या मुली आणि महिलांनी पुरेशी झोप घेतली नाही तर त्याचा परिणाम त्यांच्या पाळीच्या सायकलवर होताना दिसतो. मासिक पाळीच्या तक्रारींमध्ये झोपेबरोबरच अतिरीक्त ताणतणाव, नैराश्य या गोष्टींचाही समावेश असल्याचे दिसते. मुलींमध्ये पाळीच्या काही दिवस आधी किंवा पाळीच्या दरम्यान जेव्हा मोठ्या प्रमाणात मूड स्विंग, पोटात, कंबरेत किंवा पायात क्रँप येणे, अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे दिसून येतात तेव्हा याचे कारण झोपेशी निगडीत असल्याचे आपण लक्षात घ्यायला हवे. शरीराला नियमितपणे पुरेशी विश्रांती किंवा आराम मिळत नसेल तर या समस्या डोके वर काढतात.
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये निद्रानाशाचे प्रमाण ४० टक्क्यांनी अधिक आहे. मासिक पाळी आणि झोप या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. एक चांगले असेल तर दुसरे आपोआप सुरळीत होते. निद्रानाशाच्या समस्येसाठी डॉक्टरांकडे गेल्यावर ते व्हीटॅमिन्स आणि इतर काही औषधे देतात. त्यामुळे झोपेचे गणित सुधारते पण यामुळे औषधावरचे अवलंबित्व वाढते. तसेच मासिक पाळीशी निगडीत समस्यांसाठीही महिला डॉक्टरांकडे जातात. त्यावेळी पाळी नियमित येण्यासाठी तोंडाने घेण्याच्या गर्भनिरोधक गोळ्या डॉक्टर देतात. पण त्यामुळे नैराश्य, रक्ताच्या गुठळ्या होणे आणि ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका उद्भवण्याची शक्यता असते.
आपल्याकडे मासिक पाळीशी निगडीत तक्रारी म्हणाव्या तितक्या गांभिर्याने घेतल्या जात नाहीत. अनेक वर्षांनंतर पाळीशी निगडीत एखादी समस्या लक्षात येते आणि तेव्हा वेळ बरीच पुढे गेलेली असल्याने समस्या वाढलेल्या असण्याची शक्यता असते. त्यामुळे मासिक पाळीशी निगडीत तक्रारींकडे वेळच्या वेळी लक्ष देणे महत्त्वाचे आहे. डॉक्टरांनीही याबाबत महिला रुग्णांना जागरुक करण्याची आवश्यकता आहे. महिलांनीही आपला आहार, झोप, व्यायाम या गोष्टींकडे नेहमीच योग्य पद्धतीने लक्ष द्यायला हवे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या इतर समस्या आणि मासिक पाळीशी समस्यांचे निराकरण होण्यास मदत होईल. नकळत त्या आनंदी आणि चांगले जीवन जगू शकतील.