मासिक पाळी हा वयात आलेल्या मुली आणि स्त्रियांसाठी नैसर्गिक शरीरधर्म असला तरी तो सहज, सुलभ पार पडतोच असं नाही. मासिक पाळीआधी आणि दरम्यान शरीरात हामोन्समधे बदल होतात. हे बदल महिलांमधे अनेक तक्रारींचं कारण बनतात. तसेच मासिक पाळीविषयीच काही समस्या असतील तर त्याचेही परिणाम मुलींच्या आणि महिलांच्या आरोग्यावर होतात. नियमित पाळी न येणं, पाळी खूप उशिरा येणं या पाळीच्या समस्यांमुळे आरोग्यावर परिणाम होतो शिवाय सौंदर्यविषयक समस्याही निर्माण होतात. मासिक पाळी अनियमित असणं किंवा मासिक पाळीच्या सायकलमधे बदल होणं यामुळे चेहेर्यावर मुरुम पुटकुळ्या येणं, लाल चट्टे पडणं, तसेच इसबसारखे त्वचाविकार उद्भ्वतात. त्यामुळे मासिक पाळी येण्याआधी आणि दरम्यान हे त्वचाविकार जर गंभीर स्वरुपात डोकं वर काढत असतील तर वेळीचं डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यायला हवा.
छायाचित्र: गुगल
मासिक पाळी आणि त्वचाविकार
मासिक पाळी दरम्यान अनेकींच्या बाबतीत त्वचेत खूप बदल होतात. त्वचा संवेदनशील होते, मुरुम पुटकुळ्यांनी चेहेरा भरुन जातो. त्यामुळे मुलींना बाहेर पडणंही नकोसं होतं.मासिक पाळी येण्याआधी शरीरात हार्मोन्समधे बदल होतात त्यामुळे त्वचेवर लाल चट्टे पडतात, मुरुम, पुटकुळ्या आणि फोड येतात. मासिक पाळी दरम्यान त्वचेत होणारे हे बदल जर गंभीर असतील तर ते चार दिवसांनी मासिक पाळी थांबली तर जातील असं मानून शांत राहाणं हे त्वचेचं आणखी नुकसान करणारं ठरतं. मासिक पाळी पूर्वी हार्मोन्समधे झालेल्या बदलांमुळे मासिक पाळीचे लक्षणं जाणवायला लागतात. यालाच पीएमएस अर्थात प्रीमेंस्ट्रअल सिंड्रोम) असं म्हणतात. ही लक्षणं हार्मोन्समधे बदल झाल्यानं निर्माण होतात. या बदलांमधे महिनाभर चढ उतार होत राहातात. या बदलांचा परिणाम म्हणून पाळी येण्याआधी मूड बदलणे, शरीरावर, चेहेर्यावर सूज येणं, वजन वाढणं, मुरुम पुटकुळ्या येणं या समस्या महिलांमधे उद्भवतात. शरीरावर लाल चट्टे पडणं, खाज सुटणं आणि सूज येणं ही प्रीमेंस्ट्रल सिंड्रोमची प्रमुख लक्षणं आहेत.
छायाचित्र: गुगल
मासिक पाळी आणि पित्त उभरणं
शरीरावर पित्त उभरणं अर्थात शरीरावर मोठ मोठ्या गांधी येणं. याचा संबंध पित्ताशी जोडला जातो. पण अनेक महिलांना मासिक पाळी जवळ येते तेव्हा हा त्रास होतो. महिलांना प्रसूतीनंतर मासिक पाळी आधी अंगावर पित्त उभरण्याचा त्रास होतो. पित्त उभरतं करण शरीरातील काही पेशी ज्यांना ‘मस्ट सेल्स’ असं म्हटलं जातं त्या रक्तप्रवाहात हिस्टामाइन वा इतर रासायनिक घटक सोडतात. अर्थात मासिक पाळीमुळेच पित्त उभरण्याचा त्रास होतो असं नाही. तर काही खाद्य पदार्थांची अँलर्जी, विशिष्ट किडे चावणं, सूर्यप्रकाश किंवा एखाद्या औषधाची अँलर्जी म्हणूनही अंगावर पित्त उभरतं. पण ज्या महिलांना मासिक पाळी आधी शरीरावर पित्त उभरतं त्यांना भविष्यात ऑटोइम्यून प्रोजेस्टेरॉन डर्मेटाइटिस (एपीडी) होण्याची शक्यता जास्त असते. एपीडी ही गंभीर समस्या असते. मासिक पाळी दरम्यान शरीरावर पित्त उभरण्याचा संबंध गंभीर त्वचा विकाराशीही असतो.
छायाचित्र: गुगल
एपीडीसोबतच पित्त उभरणं, त्वचेवर लाल चट्टे येणं या समस्या मासिक पाळी दरम्यान होतात. या समस्यांमुळे महिलांमधे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो. या समस्यांमुळे त्यांना चारचौघात वावरायला संकोच वाटतो. याबद्दल कोणाशी बोलणंही त्यांना नकोसं होतं. मासिक पाळीदरम्यान निर्माण होणारे हे त्वचाविकार अशा प्रकारे महिलांच्या आयुष्यावरच मोठ परिणाम करतात.
पण संकोच करणं, न बोलणं हा यावरचा उपाय नाही. यावर तातडीनं उपचार झाल्यस या समस्या दूर होतात किंवा नियंत्रित होण्यास मदत होते. आणि म्हणूनच मासिक पाळी दरम्यान त्वचा विषयक समस्या जर गंभीर असतील तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. यावर डॉक्टर औषधं, क्रीम,लोशन्स देतात . आणि समस्या जर गंभीर असली औषधोपचारांनी नियंत्रित होणारी नसली तर प्रोजेस्ट्रेरॉन या हार्मोनची निर्मिती थांबवण्याकरता हार्मोन थेरेपीही सुचवतात.