Join us   

पाळी येण्याआधी होतेय भयंकर चिडचिड ! मुड स्वींग्स टाळण्यासाठी प्रत्येकीने करून पहावे असे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 6:12 PM

पाळी आल्यावर होणारा त्रास तर वेगळाच असतो. पण पाळी येण्याच्या आधीचे काही दिवसही अनेक जणींसाठी खूपच त्रासदायक ठरतात. याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे या दिवसांमध्ये होणारी  भयंकर  चिडचिड.  थोडे जरी आपल्या मनाविरूद्ध झाले, मुलांनी त्रास दिला किंवा ऑफिसमध्ये बॉसने कटकट केली की, इकडे  आपल्या रागाचा पारा वाढू लागतो आणि आता या समोरच्या व्यक्तीला खाऊ की गिळू अशी आपली  परिस्थिती होऊन जाते. तुमचीही अशीच भयंकर चिडचिड होत असेल, तर हे काही सहज सोपे  उपाय  नक्कीच  करून पहा.

ठळक मुद्दे शरिरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, जवस, बदाम, अक्रोड यांचे योग्य प्रमाणात नियमित सेवन करणे गरजेचे आहे.एरवी जी गोष्ट आपण अगदी सहजपणे स्विकारू शकतो, तिच गोष्टी पाळीच्या आधीच्या दिवसांमध्ये  प्रचंड राग  आणणारी ठरते. 

फॉलिक्युलर, ओव्ह्युलेटरी आणि ल्युटिल हे पाळीचे तीन टप्पे आहेत. यातील शेवटचा टप्पा म्हणजे  पाळी येण्याच्या आधीची फेज. या दिवसांमध्ये महिलांच्या शरिरातील प्रोजेस्टरॉन आणि इस्ट्रोजीन या हार्मोन्सची पातळी बदलत असल्याने मुडस्विंग, चिडचिडेपणा या गोष्टी वाढत जातात. कधी खूपच आनंद वाटू लागतो, तर पुढच्याच क्षणाला अगदी क्षुल्लक गोष्टीचाही भयंकर राग येऊ लागतो. कधी उगाच झोपून रहावेसे वाटते, तर कधी कुणाशीच काहीही बोलण्याची इच्छा होत नाही. अगदी उदास- उदास वाटू लागते. असा अनुभव प्रत्येक स्त्री ने एकदा तरी घेतलेलाच असतो.  या गोष्टी वरवर दिसतात एवढ्या सहज सोप्या नक्कीच नाहीत. पाळीच्या आधीच्या दिवसांमध्ये होणारी चिडचिड ही थेट तुमच्या शरीरात काही महत्त्वपुर्ण घटकांची कमतरता आहे हे दर्शविते.

 

व्हिटॅमिन बी ६, बी १२ कमी असेल, तुमच्या शरिरात लोह कमी असेल आणि तुम्ही ॲनिमिक असाल, तर तुमची या काळातील चिडचिड  वाढू शकते, असे पुणे येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा जोशी चिटणीस यांनी सांगितले. व्हिटॅमिन बी ६ आणि बी १२ हे दोन्ही आपल्याला मुख्यत: मांसाहारी पदार्थातूनच मिळते. त्यामुळे जर तुम्ही संपूर्ण शाकाहारी असाल तर शरिरातील या दोन्ही गोष्टींची कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य औषधोपचार घ्या, असा सल्लाही डॉ. शिल्पा यांनी दिला आहे. तसेच शरिरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, जवस, बदाम, अक्रोड यांचे योग्य प्रमाणात नियमित सेवन करणेही गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

मुड स्वींग्स टाळण्यासाठी करून पहा हे सोपे उपाय

  • दररोज नियमित काळी वेळ वॉकिंग करा.
  • रोजचा योगाभ्यास आणि ध्यानधारणाही तुमचे मानसिक संतुलन चांगले ठेवू शकते.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन बी ६, बी १२ यासोबतच कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचीही औषधी घ्या.
  • हवे असल्यास चहा आणि कॉफी घ्या. पण त्यांचे सेवन मर्यादित ठेवा.
  • याकाळात सकस आहार घ्या. तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ घेणे टाळा.
  • साबुदाणा, फळे, हिरव्या भाज्या, सूप असे पदार्थ आहारात जास्त घ्या. 
  • साखर, मीठ, तिखट, अल्कोहोल आणि कॅफीन यांचे सेवन मर्यादित ठेवा. 
  • कोणत्याही ताण आणणाऱ्या गोष्टींचा विचार करू नका. 
  • मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. 

पाळी येण्याच्या आधी अनेकींना जाणवतात या समस्या १. पाळी येण्याच्या आधी अनेकींना पोड जड वाटू लागते. प्रोजेस्टरॉन या हार्मोनची पातळी कमी झाल्यामुळे शरिरात पाणी पातळी साठू लागते आणि ओटी पोट फुगल्यासारखे वाटते.  २. अनेक जणींचे स्तन जड पडतात आणि अतिशय दुखरे होतात. हलकासा धक्का लागला तरी ते सहन होत नाही.  ३. अनेक जणींना बद्धकोष्ठता किंवा डायरिया असे त्रास जाणवतात. हार्मोन्सचे प्रमाण बदलले की ते पचन संस्थेवरही परिणाम करतात.   

टॅग्स : आरोग्यमहिला