Join us   

नवरात्र स्पेशल आरोग्य उपासना : सणावारात मासिक पाळी येऊ नये म्हणून घे गोळ्या, तुम्हीही असं करत असाल तर तज्ज्ञ काय म्हणतात बघा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2022 1:40 PM

Navratri Special Health Misconceptions about Postponing Menstrual Cycle with Medicine : देवी ही जर आपण स्त्रीरुपातच बघतो तर तिला पाळी येत नसणार का? मग देवीचे दर्शन घेताना पाळी चालू असेल तर काय बिघडले?

ठळक मुद्दे कधी कधी तर ह्या सगळ्याला कंटाळून ‘गर्भपिशवी काढून टाका’अशीही मागणी स्त्रिया करताना दिसतात. या मानसिकतेतून समाजाला बाहेर काढायलाच हवे. बिचाऱ्या कामावर जाणाऱ्या महिला सगळी कामे निमुटपणे करत असतात; फक्त देवाचा विषय आला की मग ह्या समजुती उफाळून येतात.

डॉ. शिल्पा चिटणीस जोशी

“डॉक्टर, घरी पूजा आहे... पाळी लांबवण्याच्या गोळ्या हव्या होत्या...”

श्रावण महिना सुरु झाला की सगळ्या स्त्रीरोगतज्ञांच्या क्लिनिकमध्ये ऐकू येणारा हा हमखास संवाद! सध्या जेव्हा स्त्रियांच्या देवळातल्या प्रवेशाबद्दल चर्चा सुरु आहे तेव्हा ह्या सर्वात महत्वाच्या मुद्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं दिसतेय. तो म्हणजे मासिक पाळी चालू असताना स्त्रीला दिली जाणारी संतापजनक वागणूक. या बाबतीत पेशंट स्त्रियांची समजूत घालण्याचा आम्ही स्त्रीरोगतज्ञ खूप वेळा  प्रयत्न करतो. मासिक पाळी येणे हे जननक्षमतेचे लक्षण आहे. देवी ही जर आपण स्त्रीरुपातच बघतो तर तिला पाळी येत नसणार का? मग देवीचे दर्शन घेताना पाळी चालू असेल तर काय बिघडले?  (Navratri Special Health Misconceptions about Postponing Menstrual Cycle with Medicine).

(Image : Google)

देवाला जायच्या आधी इतर शारीरिक धर्म आपण आंघोळ करून जात असू तर पाळी चालू असताना आंघोळ करून दर्शनाला गेले तर काय फरक पडतो? पण दुर्दैवाने आपल्या समाजातल्या सर्व स्त्रियांच्या मनावर मासिक पाळी म्हणजे अशुध्द, अस्वच्छ अशा अत्यंत चुकीच्या समजुतींचा पगडा इतका पक्का आहे की समजावून सांगूनही स्त्रिया ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात.  सर्वात चिंताजनक परिस्थिती ही सुध्दा आहे की, करीअर करणाऱ्या, इंजिनीयर किंवा कधीकधी डॉक्टर असलेल्या महिला सुध्दा ह्या गैरसमजुतीतून बाहेर पडू शकत नाहीयेत. बऱ्याच जणींना हे चुकीचे आहे हे पटते पण घरचे व बाहेरचे काही कर्मठ लोक ‘तू असं केलंस तर देवाचा कोप होईल’ वगैरे तथ्यहीन भयगंड या महिलांना घालतात. मुळातच मासिक पाळी का येते हे समजून घेणे महत्वाचे आहे.

गर्भाशयाच्या आतील आवरण दर महिन्याला तयार होत असते. गर्भधारणा झाली तर तयार होणाऱ्या गर्भासाठी पोषक द्रव्ये मिळवीत म्हणून ही तयारी असते. गर्भधारणा झाली नाही तर हे आवरण पाळीच्या रूपाने निघून जाते. मग हे रक्त अशुध्द कसे असेल? आता तर संशोधनाअंती असे सिध्द झाले आहे की, या रक्तात एकप्रकारच्या स्टेम सेल्स असतात ज्या विविध पेशींमध्ये रुपांतरीत होऊ शकतात. म्हणजे नवनिर्माण करण्याची सृजनशक्ती असलेल्या पेशी या पाळीच्या रक्तात असतात. काही आन्तरराष्ट्रीय कंपन्या हे रक्त जमा करून त्यातून स्टेम सेल्स काढून घेण्यासाठी महिलांना आर्थिक मोबदला पण देण्यास तयार आहेत. अशावेळी आपण मात्र जुन्या पुराण्या बुरसटलेल्या समजुती कवटाळून बसलो आहोत.

(Image : Google)

मुळात या समजुती पसरवण्यामागे पुरुषप्रधान संस्कृतीचाच हात आहे. स्त्रीच्या शरीराला अपवित्र मानले, तिला त्या चार दिवसात अस्पृश्य मानले की तिचा आपोआप तेजोभंग होतो. तिला मानसिक आणि शारीरिक खचवण्याचा हा उत्तम उपाय त्यावेळच्या कर्मठ लोकांना सापडला असावा. पाळीच्या वेळी विश्रांतीची गरज असते वगैरे हे युक्तीवाद धादांत ढोंगीपणाचे आहेत. आपल्या समाजात एरवी खरोखर आजारी असलेल्या स्त्रीलाही विश्रांती मिळत नाही मग पाळीच्या वेळी गरज नसताना सक्तीची विश्रांती कशासाठी?  या जुनाट आणि बुरसटलेल्या विचारांच्या पगड्यांमुळे कित्येक स्त्रियांचे आयुष्य दुर्धर झालेले आम्ही बघतो. कोणताही सण समारंभ अथवा यात्रा असेल तर त्यातील आनंद अनुभवायचा सोडून ‘तेव्हा माझी पाळी तर येणार नाही ना’ याच विचारात ह्या स्त्रिया चिंतातूर होतात. मग पाळी लांबवण्याच्या गोळ्या सतत घेणे सुरु होते. स्त्रियांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने या गोळ्या सारख्या घेणे हानिकारक असते. कधी कधी तर ह्या सगळ्याला कंटाळून ‘गर्भपिशवी काढून टाका’अशीही मागणी स्त्रिया करताना दिसतात. या मानसिकतेतून समाजाला बाहेर काढायलाच हवे. साधारणपणे पाळी चालू असताना खास विश्रांतीची काही गरज नसते. बिचाऱ्या कामावर जाणाऱ्या महिला सगळी कामे निमुटपणे करत असतात; फक्त देवाचा विषय आला की मग ह्या समजुती उफाळून येतात. हे सगळे कर्मकांड करणाऱ्यांच्या सोयीचे आणि कमालीचे दांभिक आहे. 

(उद्या बोलू दुसऱ्या एका गैरसमजाविषयी)

(लेखिका स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्य