प्रसिद्ध सुपरमॉडेल आणि अभिनेत्री पद्मा लक्ष्मी (Padma laxmi ) ही तिच्या बोल्ड फोटोंमुळे आणि रेखीव फिगरमुळे कायमच चर्चेत असते. कधी एखाद्या गोष्टीवर वक्तव्य केल्यामुळे तर कधी आपले वय सांगितल्यामुळे तिच्याविषयी बऱ्याच चर्चा होत असतात. पण आपल्याप्रमाणेच अभिनेत्रींनाही आरोग्याच्या तक्रारी किंवा विविध आजार असू शकतात. विशेष म्हणजे प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या या अभिनेत्रीही विविध प्रकारच्या आजारांशी आपल्याप्रमाणेच लढा देतात आणि धैऱ्याने नव्या जोमाने स्वत:ला उभ्या करतात. त्याचप्रमाणे प्रसिद्ध अभिनेत्री पद्मा लक्ष्मी हिलाही गर्भाशयाशी निगडीत एक आजार असून त्या आजाराशी तिने दिलेल्या लढ्याची गोष्ट तिने नुकतीच आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.
पद्मा लक्ष्मी हिने या आजाराबाबत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहे. तिला एंडोमेट्रिओसिस (endometriosis) हा गर्भाशयाशी निगडीत आजार असल्याचे तिने सांगितले आहे. जगभरातील १२ ते ५२ या वयोगटातील प्रजनन करु शकणाऱ्या महिलांपैकी जवळपास २ हजार लाख महिला या समस्येने त्रस्त असल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
ती म्हणते, हा आजार तुम्हाला अनेक अर्थांनी कमकुवत करणारा आजार आहे. या आजारामुळे तुमचे करीयर तर खराब होतेच पण तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वैवाहिक जीवनाचा अनुभवही योग्यरितीने घेऊ शकत नाही. त्यामुळे हा आजार म्हणजे तुमचा कौटुंबिक प्रश्न होतो असेही ती आपल्या पोस्टच्या शेवटी म्हणते. आता हा आजार म्हणजे नेमके काय तर आपल्याला येणारी मासिक पाळी.
मार्च महिना एंडोमेट्रिओसिस जागृती महिना म्हणून सेलिब्रेट केला जातो. बहुतांश महिलांना या आजाराविषयी पुरेशी माहिती नसल्याने आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पद्मा लक्ष्मी हिने या आजाराबाबतची पोस्ट केली आहे. दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या वेळी पोट आणि कंबरेत येणाऱ्या कळा, प्रमाणापेक्षा जास्त होणारा रक्तस्राव, लघवी करताना होणारा त्रास या गोष्टींमुळे महिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकून जातात. पण आपण महिला आहोत त्यामुळे दर महिन्याला हा त्रास होणारच असे म्हणून बहुतांश महिला त्याकडे दुर्लक्ष करतात. पण पाळीच्या काळातला हा त्रास प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घेऊन त्यावर तोडगा काढायला हवा. कारण हा चार दिवसांचा त्रास म्हणून तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केल्यास अनेकदा जास्त प्रमाणात रक्तस्राव होणे किंवा पोट, शरीर जास्त दुखणे हे धोक्याचे ठरु शकते.