डॉ. अपूर्वा हजिरनीस
पोलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा PCOS हा सर्वसामान्यपणे आढळून येणारा हार्मोनल डिसऑर्डर, हा त्रास प्रजननक्षम वयातील महिलांना होतो. मात्र स्थूल महिलांना पीसीओएसमुळे टाइप २ मधुमेह होण्याचा धोका दुप्पट असतो. तर त्यासाठी काय काळजी घ्यायची, जीवनशैली कशी सांभाळायची याचा विचार करायला हवा.
PCOS म्हणजे काय?
क्रोनिक अनोव्ह्यूलशन किंवा ओव्ह्यूलेशन होत नसल्यामुळे महिलांच्या मासिक पाळीमध्ये व्यत्यय येऊन PCOSची समस्या सुरू होते. PCOS हे हार्मोनल डिसऑर्डर असल्यामुळे पीसीओएसमध्ये महिलांच्या अंतर्स्त्राव यंत्रणेच्या कार्यात अडथळे येतात व पर्यायाने त्यांच्यातील टेस्टोस्टेरॉनसारख्या पुरुषी हार्मोन्समध्ये मोठी वाढ होते. यामुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतोच, शिवाय पीसीओएसमुळे मधुमेह मेलिटस, हायपरटेन्शन आणि लिपिड डिसऑर्डरसारखे धोके संभवतात.
(Image : Google)
PCOSलक्षणे कोणती?
१. अनियमित मासिक पाळी – महिलांना कित्येकदा उशीरा पाळी येते किंवा बराच काळ पाळी येत नाही.
२. चेहरा आणि छातीवर पुरुषी पद्धतीने केसांची अस्वाभाविक वाढ होते.
३. चेहरा, हनुवटी आणि छातीवर अचानक मुरुमांची वाढ होते.
४. गरोदर राहाण्यात अडथळे येतात (वंध्यत्व)
पीसीओएस आणि डायबिटिसचा काय संबंध?
हार्मोन्समधील असमतोलामुळे पीसीओएसची समस्या तयार होते. सामान्यतः हार्मोन्समधील अस्थिरपणा प्रजनन हार्मोन्सशी संबंधित असतो, मात्र काहीवेळेस पीसीओएसमुळए इन्शुलिन हार्मोन्सवरही परिणाम होतो. जेव्हा पीसीओएस इन्शुलिन प्रतिरोध नावाने ओळखल्या जाणाऱ्या इन्शुलिनच्या अयोग्य कार्याशी संबंधित असते व त्यामुळे दीर्घकाळात टाइप २ मधुमेह मेलिटस होण्याचा धोका संभवतो. म्हणूनच पीसीओएस असलेल्या स्थूल महिलांना रक्तशर्करा वाढल्याचे सूचित करणारी पुढील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सतत थकवा
मान, कोपर, मांडीचे सांधे किंवा काखेत काळेपणा आल्यास
वारंवार लघवीची भावना
भूक आणि तहान वाढणे
पाय आणि हातांमध्ये सुन्नपणा येणे.
(Image : Google)
मधुमेह आणि पीसीओएस दोन्ही असतील तर?
पीसीओएस असलेल्या महिलांनी योग्य व समतोल आहाराच्या मदतीने वजन कमी करावे तसेच नियमितपणे व्यायाम करावा. पीसीओएस रुग्णांना अनियमित पाळी, केसगळतीसाठी काही औषधे द्यावी लागतात व त्यांनी ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे घेणे अतिशय आवश्यक आहे.
(लेखिका -एमडी मेडिसिन, डीएनबी एंडोक्रिनोलॉजी, एंडोक्रिनोलॉजिस्ट आणि डायबेटोलॉजिस्ट)