कोरोना व्हायरसच्या माहामारीमुळे सगळ्यांच्याच आयुष्यात ताण तणाव वाढला आहे. वर्क फॉर्म होममुळे सतत एकाच जागी बसून काम करणं लोकांच्या जीवनशैलीचा भाग बनलं आहे. त्यामुळे ताण तणावात प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून इतर आजार दिसून येत आहे. पीसीओस आणि एन्जायटी म्हणजेच अति प्रमाणात चिंता करणं यात परस्पर संबंध असल्याचं अनेक वैज्ञानिक पुरावे सापडले आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुषमा टोमर यांनी एका वेबसाईटशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. (PCOS and Anxiety) या दोन आजारांमधील संबंधाबाबत डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
PCOS and Anxiety यात काय संबंध आहे?
चिंता ही एक नैसर्गिक आणि निरोगी भावना असते जी आपल्यातील बर्याच जणांना अनुभवत असते. ही एक महत्वाची भावना आहे कारण ती लोकांना चिंताजनक मुद्द्यांकडे लक्ष देण्यास किंवा संभाव्य धोक्याची सुचना देते . परंतु, एन्जायटी म्हणजेच अति चिंतेसह, भीती वाटणं आरोग्यासाठी अधिक त्रासदायक ठरू शकतं. चिंता आणि नैराश्याने तरूण मुलींमध्ये पीसीओएससह आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
पीसीओएस हा प्रजनन वयाच्या स्त्रियांमध्ये आढळणारा सर्वात सामान्य अंतःस्रावी विकार आहे. या आजाराच्या लक्षणांमध्ये Amenorrhea मासिक पाळी अनियमित असणं, (Hirsutism) तोंडावर असामान्य केसांची वाढ, (infertility) वंधत्व, (Obesity) लठ्ठपणा , यांचा समावेश होतो. पीसीओएस ही अशी स्थिती आहे जी स्त्रीच्या मानसिक आरोग्यावर आणि आयुष्याच्या गुणवत्तेवर (क्यूओएल) अफाट परिणाम करते. या बाबीकडे भारतात पुरेसे लक्ष दिले जात नाही.
हॉर्मोनल बदल
पीसीओएस असलेल्या काही स्त्रियांमध्ये इन्सुलिन प्रतिरोध असतो. परिणामी रक्तामध्ये इन्सुलिनचे प्रमाण जास्त असते. एका अभ्यासानुसार असे आढळले आहे की जास्त इंसुलिन रेझिस्टन्समुळे नैराश्याचे धोका वाढतो आणि चिंतेची लक्षणेही वाढतात. पीसीओएस असलेल्या बर्याच लोकांमध्ये अॅन्ड्रोजन (टेस्टोस्टेरॉनसह हार्मोन्सचा समूह) वाढतो. यामुळे महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य येऊ शकते.
दुसरं म्हणजे, पीसीओएस असलेल्या स्त्रिया ज्यांना चिंता किंवा नैराश्याने ग्रासले आहे त्यांच्यात काही न्यूरोट्रांसमीटर (लहान मेंदू आणि मज्जासंस्थेमध्ये सिग्नल पाठविणारी रसायने) कमी असतात. सेरोटोनिन (मज्जासंस्थेमधील एक केमिकल मेसेंजर जो सकारात्मक भावनांशी संबंधित असतो) उदासीनता आणि चिंता सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की पीसीओएस असलेल्या ज्या महिलांमध्ये सेरोटोनिन आणि इतर न्यूरोट्रांसमिटरची पातळी कमी आहे, त्यांना नैराश्य आणि चिंताग्रस्तपणाची अधिक लक्षणे आढळतात.
बचावाचे उपाय
ज्या स्त्रिया पीसीओएसशी निगडित समस्येचा सामना करतात. त्यांच्या मन: स्थितीत बदल पहायला मिळतो. त्या डॉक्टरांशी उपचारांच्या विविध पर्यायांविषयी बोलू शकतात. असे बरेच उपचार आहेत ज्यामुळे त्यांचे नैराश्य आणि चिंता कमी करण्यात मदत होईल. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की व्यायामासह कमी कॅलरीयुक्त आहार नक्कीच मदत करतो.
सक्रिय जीवनशैली जगणे, मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते.पीसीओएस असलेल्या महिलांनी नियमित व्यायाम केल्यास चिंता आणि नैराश्याची लक्षणे कमी होतात. योगा सराव, विश्रांती, श्वासोच्छ्वास व्यायाम आणि ध्यान करणं यामुळे शारीरिक स्थिती सुधारण्यास मदत होते.