मासिक पाळी ही महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. वयात आलेल्या मुलीला दर २८ दिवसांनी पाळी येणे म्हणजे तिचे आरोग्य उत्तम आहे असे समजले जाते. मात्र हल्ली वेगवेगळ्या कारणांनी हार्मोन्सचे असंतुलन झाले की पाळी कधी खूप लवकर येते किंवा २-३ महिने येतच नाही. काही मुलींची पाळी एकदा सुरू झाली की १०-१५ दिवस सुरुच राहते. काही जणींना प्रमाणाबाहेर रक्तस्त्राव होतो तर काही जणींना पाळी येऊन गेल्याचे कळतही नाही (Reasons and remedies for Irregular Periods).
प्रत्येक महिलेचा आहार, अनुवंशिकता, ताणतणाव आणि आरोग्याच्या इतर तक्रारी यानुसार पाळीच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. पण पाळी वेळेत येणे गरजेचे असून ती सतत पुढे-मागे होत असेल तर मात्र वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. प्रसिद्ध योग प्रशिक्षक स्मृती यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याविषयीची माहिती शेअर केली असून पाळी अनियमित होण्याची काही महत्त्वाची कारणं सांगितली आहेत, ती कोणती पाहूया...
१. खूप जास्त प्रमाणात मैदा आणि साखरेचे सेवन. म्हणजेच जंक फूड जास्त प्रमाणात खाणे.
२. अनियमित झोप आणि झोपेतून उठण्याच्या चुकीच्या सवयी.
३. खूप जास्त प्रमाणात बैठे काम आणि आळस
४. नियमितपणे व्यायामाचा अभाव
५. विविध प्रकारचे ताणतणाव
पाळी नियमित येण्यासाठी काय करायला हवे?
१. प्लास्टीकच्या पॅकेटमध्ये येणारी कोणतीही गोष्ट खाणे थांबवायला हवे. जेवण स्कीप करणे, जेवणांच्या मध्ये जंक फूड खाणे टाळायला हवे.
२. कोणताही पदार्थ घेताना त्यात कोणकोणते पदार्थ आहेत हे तपासून पाहायला हवे.
३. नियमितपणे योगा करायला हवा. योगामुळे शारिरीक व्यायाम तर होतोच पण मानसिक आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते.
४. विशिष्ट ऋतूमध्ये बाजारात येणारी सिझनल फळं दररोज आवर्जून खायला हवीत.
५. रात्री वेळेत झोपणे आणि सकाळी वेळेत उठणे अतिशय आवश्यक आहे. रात्री किमान १०.३० पर्यंत झोपायला हवे. जेणेकरुन आपले झोपेचे हार्मोन्स जागृत होतात आणि ताणाचे हार्मोन्स नियंत्रणात राहण्यास मदत होते.
६. कोणत्याही गोष्टीचा कमीत कमी ताण घेणे (यासाठी योगाचा अतिशय चांगला उपयोग होतो)
७. रिफाईंड शुगर आणि रिफाईंड कार्बोहायड्रेटस आहारात टाळायला हवे.