अभिनेता मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कोंवर किती फिटनेस फ्रिक आहे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. हे दोघेही सतत फिटनेसची वेगवेगळी चॅलेंजेस करुन सोशल मिडियावर त्याविषयी अपडेट करत असतात. त्यामुळे त्यांचे चाहतेही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या फिटनेसकडे लक्ष देतात. अंकिता आणि मिलिंद यांनी नुकताच २० किलोमीटर धावण्याचा एक रिल व्हिडियो आणि फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. परफेक्ट कपल गोल असे त्यांनी यामध्ये म्हटले होते. आता अंकिताने आणखी एका महत्त्वाच्या विषयावर पोस्ट केली असून मुली आणि महिलांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
मासिक पाळीदरम्यान मुली व्यायामाला सुट्टी देतात. या काळात व्यायाम करावा की नाही यावर अनेक वाद रंगलेले दिसतात. पण या काळातही तुम्ही व्यायाम करु शकता असं सांगणारी एक पोस्ट अंकिताने नुकतीच शेयर केली आहे. आपली मासिक पाळी सुरु असून आपण धावण्याने हा त्रास दूर करत असल्याचे सांगत तिने तिचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. याखाली माझा हृदयाच्या ठोक्यांचा दर नियंत्रणात आहे असेही तिने म्हटले आहे. तर पिरीयडसच्या काळात नेहमी माझ्या नाकाच्या खाली एक पिंपल येतो असे ती सांगते. सध्या मुंबईत ऑक्टोबर हिट असल्याचेही तिने यामध्ये म्हटले आहे. यापुढे तिने एका फिटनेस अॅप्लिकेशनचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. यावेळी पिरियड दरम्यान तिने ५ किलोमीटरचे अंतर जवळपास अर्ध्या तासात धावून पूर्ण केल्याचे दिसते. तिच्या या पोस्टला असंख्य लाइक्स मिळाले असून तिच्या फॅन्सनी यावर कमेंटसही केल्या आहेत. तर अंकिताचा नवरा मिलिंद सोमणने हृदयाच्या ठोक्यांसाठी प्रेम अशी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.
मासिक पाळी म्हणजे दर महिन्याला चार दिवसांसाठी थोडा आराम. पिरीयडसच्या काळात अनेकदा पोट इतकं दुखतं की हालचालही नकोशी वाटते. पण तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर पिरीयडच्या काळातही तुम्ही किमान व्यायाम केल्यास त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. मात्र या काळात व्यायामात गॅप पडली तर नंतर पुन्हा नव्याने व्यायाम सुरु करण्यास कंटाळा येऊ शकतो. पिरीयडसच्या काळात व्यायाम केल्यास शरीरातील एंडोरफिन हा हार्मोन नासर्गिकरित्या तयार होण्यास मदत होते. या हार्मोनमुळे तुमचा मूड तर चांगला होतोच पण पेनकिलर म्हणूनही हा हार्मोन काम करतो. या काळात धावल्यास रक्ताभिसरण चांगले होते आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी चांगली राहण्यास मदत होते. यामुळे शरीराच्या कोणत्या भागावर सूज असेल तर ती कमी होते तसेच चरबी घटण्यासही याची मदत होते. आराम म्हणून नुसते पडत राहणे हे योग्य नाही पण याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे की या दिवसात शरीराला जास्त ताण देणे सुद्धा योग्य नाही, त्यामुळे तुम्हीही पिरियडसदरम्यान तुम्हाला झेपेल तेवढा व्यायाम करु शकता. यामुळे शरीराबरोबर मनाचे आरोग्य चांगले राहण्यासही निश्चितच मदत होईल. चालणे, धावणे, काही योगासने, स्ट्रेचिंग यांसारखे व्यायामप्रकार तुम्ही पिरीयडच्या दरम्यानही नक्कीच करु शकता.