Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > टीव्हीवर मासिक पाळीविषयी जाहीर बोलण्याचं डेअरिंग करणाऱ्या बायका, विचारतात आमच्या वेदनांचं काय?

टीव्हीवर मासिक पाळीविषयी जाहीर बोलण्याचं डेअरिंग करणाऱ्या बायका, विचारतात आमच्या वेदनांचं काय?

सोमालियातल्या महिलांना पहिल्यांदाच टीव्हीवर बोलण्याची संधी मिळाली आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2024 08:00 AM2024-05-08T08:00:00+5:302024-05-08T08:00:02+5:30

सोमालियातल्या महिलांना पहिल्यांदाच टीव्हीवर बोलण्याची संधी मिळाली आणि...

somalian women talk abot periods, menstuation, removing the shame | टीव्हीवर मासिक पाळीविषयी जाहीर बोलण्याचं डेअरिंग करणाऱ्या बायका, विचारतात आमच्या वेदनांचं काय?

टीव्हीवर मासिक पाळीविषयी जाहीर बोलण्याचं डेअरिंग करणाऱ्या बायका, विचारतात आमच्या वेदनांचं काय?

Highlightsसोमालियन महिलांच्या मनात आतापर्यंत कुलूप बंद होते. त्याला यानिमित्ताने वाचा फुटली आहे.

माधुरी पेठकर

सोमालियातील महिलांची ही गोष्ट, खरंतर एका लहानशा टीव्ही कार्यक्रमाची. सोमालिया हा पूर्व आफ्रिकेतला देश. सोमाली महिलांना दुष्काळ, विस्थापन, राजकीय अस्थैर्य हे काही नवीन नाही. आर्थिक परिस्थिती तर बिकट. त्यात लिंगअसमानता मोठी. महिलांना स्वत:बद्दल बोलण्याची संधी फारशी कधी मिळतच नाही. सोमालियात केवळ २३ टक्के महिला नोकरी करतात. २० ते २४ वयोगटातील ६५ टक्के महिलांना पूर्ण शिक्षण मिळतच नाही. १८ वर्षांच्या आधीच त्यातही १५ व्या वर्षीच लग्न होणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे. वय वर्ष १५ ते १९ दरम्यान मूल होण्याचं महिलांचं प्रमाणही जास्त आहे. सोमालियातील ९९.२ टक्के महिलांना खतना या भयंकर परंपरेला सामोरं जावं लागतं.

मात्र त्या टीव्ही शोने ठरवलं की, महिलांच्या या वेदनेविषयी बोलायचं. केवळ महिलांनी सादर केलेला हा कार्यक्रम, इथे महिला मोकळेपणानं बोलतात. आपली दु:ख सांगतात. न बोललेल्या गोष्टी बोलतात. सोमालियात असं काही इतकं उघड पहिल्यांदाच घडत आहे, म्हणूनच जगालाही या घटनेची दखल घ्यावी लागली.
‘बिलन’ हा सोमालियातील केवळ महिलांचा एकमेव माध्यम समूह आहे. या समुहाने चालू घडामोडींवर आधारित एका कार्यक्रमाची आखणी केली. हा कार्यक्रम महिला सादर करतात. ‘मासिक पाळी ते राजकारणातील महिला’ या आतापर्यंत कधीच न बोलल्या गेलेल्या विषयांवर बोललं जात आहे. चर्चात्मक, वादप्रतिवाद हे या कार्यक्रमाचं स्वरूप आहे.

मासिक पाळीतल्या समस्या, शिक्षण क्षेत्रात महिला शिक्षकांची कमतरता, राजकारणात येण्यासाठी महिलांना करावा लागणारा संघर्ष, पर्यावरणीय समस्यांमुळे महिलांसमोरची आव्हानं या विषयांवर महिला बोलतात. मात्र, मासिक पाळी या विषयावर चारचौघात पहिल्यांदाच अनेक मुली या कार्यक्रमात बोलल्या आहेत.
नायमा सलाह नावाची महिला या कार्यक्रमाची होस्ट आहे. या शोमुळे आपणही पहिल्यांदाच मासिक पाळी याविषयावर बोललो असं नायमा सांगते. कधी माझी आईसुद्धा माझ्याशी पाळी या विषयावर बोलली नव्हती, तो विषय आपण जाहीर बोललो. इतर महिला मुलींना बोलतं करू शकलो, याचा आनंद नायमाला आहे. अनेक विषय, अनेक समस्या, अनेक मुद्दे सोमालियन महिलांच्या मनात आतापर्यंत कुलूप बंद होते. त्याला यानिमित्ताने वाचा फुटली आहे.

 

Web Title: somalian women talk abot periods, menstuation, removing the shame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.