Join us   

मासिक पाळीपूर्वीच्या वेदनांवर सोनम कपूर सांगतेय तिच्या स्पेशल घरगुती काढ्याचा बेस्ट उपाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2021 6:18 PM

सर्वच महिला आणि मुलींना कमी अधिक प्रमाणात मासिक पाळीआधी आणि मासिक पाळी दरम्यान वेदनांना सामोरं जावं लागतं. या वेदना कमी करण्यासाठी जशी औषधं असतात तसेच काही प्रभावी घरगुती उपाय देखील आहेत.पाळीपूर्व होणार्‍या वेदना कमी करण्यासाठी अभिनेत्री सोनम कपूरने एक घरगुती इलाज सांगितला आहे. 

ठळक मुद्दे आल्याचा उपयोग पाळीमधील वेदना कमी करण्यासाठी होतो. पाळीदरम्यान खूप रक्तस्त्राव होत असल्यास आल्याचा काढा उत्तम उपाय आहे.आल्याचा काढा हा पाळीतील वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर असला तरी अति काढा त्रासदायक ठरतो. छायाचित्रं- गुगल

मासिक पाळी हा निसर्ग धर्म असला तरी अनेक महिला मुली यांच्यासाठी मात्र हा वेदनादायी अनुभव असतो. प्रीमेन्स्ट्रअल सिण्ड्रोम अर्थात पाळीपूर्व होणार्‍या वेदना. सर्वच महिला आणि मुलींना कमी अधिक प्रमाणात या वेदनांना मासिक पाळीआधी आणि मासिक पाळी दरम्यान सामोरं जावं लागतं. या वेदना जेव्हा सहन होत नाही तेव्हा नको ही पाळी असं म्हटलं जातं. या वेदना कमी करण्यासाठी जशी औषधं असतात तसेच काही प्रभावी घरगुती उपाय देखील आहेत.पाळीपूर्व होणार्‍या वेदना कमी करण्यासाठी अभिनेत्री सोनम कपूरने एक घरगुती इलाज सांगितला आहे. सोनम कपूर पाळीच्या काही दिवस आधी आल्याचा चहा अर्थात काढा पिण्यास सांगते. ती म्हणते की,  हा उपाय केवळ पाळीतल्या वेदनाच कमी करतो असं नाही तर हे आरोग्यदायी पेय देखील आहे. पाळी आधीचे दिवस हे खूप विचित्र असतात. शरीर आणि मनात अस्वस्थता असते. पोटात, कंबरेत चमका येत असतात. मानसिक ताणही खूप आलेला असतो. ही लक्षणं कमी करण्यासाठी आल्याचा काढा खूप उपयुक्त ठरतो असं सोनम कपूर म्हणते.

छायाचित्र- गुगल

पाळीआधी आल्याचा काढा पिल्याने..

* आल्यात वेदना शामक गुणधर्म असतात. शिवाय दाहविरोधी गुणधर्मही असतात. म्हणूनच आल्याचा उपयोग पाळीमधील वेदना कमी करण्यासाठी होतो. मासिक पाळी येण्याआधी जर पोटात, कंबरेत चमका येत असतील किंवा वेदना होत असतील तर आल्याचा काढा करुन प्यावा. चमका कमी करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.

* पाळीदरम्यान खूप रक्तस्त्राव होत असल्यास आल्याचा काढा उत्तम उपाय आहे. अनेक अभ्यासातून हे सिध्द झालं आहे की तीन महिने नियमित कोणत्याही स्वरुपात आल्याचं सेवन केल्यास पाळीतला रक्तस्त्राव नियंत्रित राहातो.

* आल्यात जिंगीबेन नावाचं एक विकर असतं. हे विकर शरीरावर सूज येण्यास प्रतिबंध करतो आणि यामुळे पाळीतही मूड चांगला राहातो. जिंगीबेन हे प्रोस्टाग्लाइंड नामक दाह निर्माण करणार्‍या रसायनाच्या उत्पादनास रोखतं. या रसायनामुळेच पाळीदरम्यान गर्भाशय आंकुचन पावतं . शरीरातील हे रसायन वाढल्यास गर्भाशय आंकुचन पावतं. आणि रक्तस्त्राव नीट होत नाही. मात्र वेदना खूप होतात.

छायाचित्र- गुगल

आल्याचा काढा कसा करावा?

आल्याचा काढा करण्यासाठी दोन तीन इंच आलं घेऊन ते किसून घ्यावं. आल्याचा हा कीस एक कप पाण्यात उकळायला ठेवावा. एक कप पाणी अर्धा कप होईपर्यंत हा काढा उकळावा. त्यानंतर तो गाळून घ्यावा. चवीसाठी यात साखर न घालता थोडं मध किंवा लिंबाचा रस किंवा दोन्ही घालावं. दिवसातून दोन तीन वेळेस हा काढा घ्यावा.

छायाचित्र- गुगल

अति काढा पिणं ठरु शकतं हानिकारक पाळीआधी वेदना कमी करण्यासाठी आल्याचा काढा हा योग्य प्रमाणात घेतल्यास उपयुक्त ठरतो. मात्र हा काढा जास्त पिल्यास मात्र ढेकर येणे, पोट बिघडणे, छातीत जळजळ होणे, पोटात गॅस होणे या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आल्याचा काढा हा पाळीतील वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर असला तरी अति काढा त्रासदायक ठरतो हे मात्र लक्षात असू द्यावं. तसेच अनेक डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की आल्याचं सेवन प्रत्येकालाच फायदेशीर असेल असं नाही. काहींना आल्याच्या सेवनानं पाळीत रक्तस्त्राव जास्त होऊ शकतो. असा त्रास झाल्यास आपण किती आल्याचा काढा घेतो याकडे लक्ष द्यावं. आणि कमी घेत असूनही हा त्रास झाला असेल तर मात्र काढा पिऊ नये. आल्याचा काढा पिऊनही मासिक पाळीपूर्वीचा त्रास तेवढाच किंवा वाढलेला असल्यास डॉक्टरांना गाठावं.