सणवार, लग्नकार्य अशा कोणत्याही प्रसंगी आपल्या मागे पाळीची कटकट नको, असे प्रत्येकीलाच वाटते. ज्यांच्या घरी खूप सोवळे ओवळे असते, त्यांना तर सणवार सुरू होताच पाळीचा मोठा धाकच पडलेला असतो. ऐन सणासुदीत पाळी आल्यावर काय करायचे ?, आपण असे बाजूला बसल्यावर सर्व रितीरिवाज, कुळधर्म कुलाचार कसे सांभाळायचे ?, अशा एक ना हजार शंका महिलांच्या डोक्यात पिंगा घालू लागतात. मग यावर एक जबरदस्त उपाय शोधून काढला जातो आणि तो म्हणजे.... आला सण, की घे पाळी लांबविण्याच्या गोळ्या..
तुम्हीही हे असंच करत असाल, तर सावधान !! पाळी लांबविण्यासाठी गोळयांची पाकिटं रिती करणं आणि त्यासोबतच काही घरगुती उपाय करणं तुमच्यासाठी अतिशय घातक ठरू शकतं. सणावारासाठी किंवा नातलगांच्या लग्न कार्यासाठी गोळ्या घेत असाल, तर एक गोष्ट हमखास लक्षात ठेवा. तुमचे आरोग्य हे सणवारापेक्षा किंवा एखाद्या समारंभापेक्षा अधिक मौल्यवान नाही. सणवार दरवर्षीच येत असतात. पण तुमच्या आरेाग्याची हानी झाली, तर ती मात्र भरून येणे खूप अवघड असते.
पाळी लांबविण्यासाठी गोळ्या का नको ? पाळी येणे हे आपल्या शरिरातील एक नैसर्गिक चक्र आहे. पाळी येण्यासाठी आणि न येण्यासाठी शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेऊन आपण या नैसर्गिक चक्रात मोठा अडथळा निर्माण करत असतो. यामुळे हार्मोनल इम्बॅलेन्स होऊन आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे पाळी लांबविण्यासाठी नेहमीच जर असे काही अघोरी उपाय करत असाल, तर ते महागात पडू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:च्या मनाने कधीच असे प्रयोग करू नयेत.
पाळी लांबविण्यासाठी बायका हे देखील करतात... - पाळी लांबविण्यासाठी गोळ्या घेणे घातक आहे, हे अनेक महिलांना आता पटलेले आहे. पण तरीही गोळ्या नाही, तर मग काही घरगुती उपाय करून बघू, याकडे महिलांचा कल असतो. म्हणून मग एकमेकींच्या सल्ल्याने महिला घरातल्या घरात पाळी लांबविण्यासाठी असेही काही प्रयोग करून पाहतात. हे उपाय घरगुती असले, तरीही ते आरोग्यासाठी कितपत सुरक्षित असतात, हे डॉक्टरच सांगू शकतात.
- व्हिनेगर, लिंबाच्या बिया असे पदार्थ खाऊन पाळी येणे लांबविले जाऊ शकते. तसेच मसालेदार पदार्थ खाणे टाळल्यानेही पाळी पुढे जाते, असे काही जणींचे म्हणणे आहे.