मासिक पाळीत नेहमी व्यवस्थित येणारे कपडे घट्ट झाल्यासारखे वाटतात. शरीर जड झाल्यासारखं वाटतं. या काळात वजन वाढल्यासारखं वाटतं.. असा अनुभव बहुतांश मुलींना आणि महिलांना येतो. पण हा भास आहे की खरंच पाळीमध्ये वजन वाढतं हे मात्र अनेकींना तपासता येत नाही.पण वैद्यकीय तज्ज्ञ - डाॅक्टर यांच्या मते पाळीमध्ये शरीर जड होणं, वजन वाढल्यासारखं वाटणं ही सामान्य बाब आहे. या काळात खरोखर वजन वाढतं. पण म्हणून या वजनाचं टेन्शन घ्यावं असं नाही आणि वाढणाऱ्या वजनाकडे पाळीमुळे वाढतंच वजन असं निष्काळजीपणे बघणंही योग्य नाही. पाळीतल्या वजनाचा विचार दोन टोकांवर राहून नाही तर मधला मार्गानं समजून उमजून जाणतेपणानं करायला हवा. तज्ज्ञ म्हणतात मासिक पाळीत वजन वाढण्यामागे शास्त्रीय कारणं आहेत. या कारणांशी निगडित गोष्टीवर नियंत्रण ठेवलं गेलं नाही तर या काळात वाढलेलं वजन नंतर कमी न होता टिकून राहातं. पण पाळीत वाढणारं वजन जर काळजी घेतली तर ते तात्पुरत ठरुन त्याचा वजनवार दीर्घकालीन परिणाम होत नाही.
Image: Google
का वाढतं मासिक पाळीत वजन ?
मासिक पाळीत वजन वाढण्याचं एक च एक कारण नाही. 4 ते 5 गोष्टींमुळे वजन वाढतं. 1. मासिक पाळीत संप्रेरकांमध्ये बदल होतात. त्यांच्यात असंतुलन निर्माण होतं. पाळी जवळ आली की स्तन जड झाल्यासारखे वाटतात. पोटावर सूज येते. पाय आणि कंबर दुखायला लागते. मासिक पाळीत ॲस्ट्रोजन नावाच्या हार्मोन्सची पातळी वाढते. यामुळे शरीरात द्रवपदार्थ साचून राहातात. मासिक पाळीत शरीर जड वाटणं, पोट फुगलेलं वाटणं याचं कारण शरीरातील वाढलेली पाण्याची पातळी हे असतं. मासिक पाळी गेल्यानंतर वजन पुन्हा पूर्ववतही होतं असं तज्ज्ञ म्हणतात.
2. मासिक पाळीच्या काळात हार्मोन्स बदलांमुळे चटक मटक खाण्याची, सारखं खाण्याची इच्छा निर्माण होते. अशा पध्दतीने खाल्ल्याने शरीरात हॅप्पी हार्मोन्स तयार होतात. पण याच दुष्परिणाम म्हणजे अशा प्रकारे अधिक कॅलरीज आणि हाय कोलेस्ट्राॅल पदार्थ खाल्ल्याने शरीरात फॅट्स वाढतात. हे फॅटस वाढल्याने मासिक पाळीत वजन वाढतं.
Image: Google
3. मासिक पाळीच्या काळात हार्मोन्समधील बदलांमुळे अस्वस्थता वाढते. ताण वाढतो. थकल्यासारखं वाटतं. ही लक्षणं घालवून उत्साही राहाण्यासाठी , पोट, कंबरदुखीच्या वेदनांना आराम मिळण्यासाठी या काळात अनेक महिला जास्त प्रमाणात काॅफी/ चहा/ ग्रीन टी पितात. या पेयांमध्ये कॅफिनचं प्रमाण जास्त असतं. यामुळे शरीरात पाणी जास्त साठून राहातं. पोट फुगल्यासारखं वाटतं.
4. पाळीची लक्षणं दिसू लागली, पाळी आली की व्यायाम करणं सोडलं जातं. शारीरिक कष्टाची कामं कमी केली जातात. पाळीत व्यायाम करु नये, व्यायाम केल्यास त्रास होतो हा समज बाळगून अनेकजणी व्यायाम करत नाही. पाळीच्या दिवसात अनेकजणी नुसतं बसून राहातात. झोपून राहातात. यामुळे शरीराला जडपणा येतो. शरीराच्या हालचाली कमी होतात. खाण्या पिण्याचं प्रमाण मात्र वाढतं. यामुळे मासिक पाळीत वजन वाढतं.
5. मासिक पाळीत हार्मोनल बदलांमुळे, हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण झाल्यानं त्याचा परिणाम चयापचयावर होतो. त्यातून पोटदुखी, पचनाशी निगडित समस्यांचा सामना अनेकजणींना करावा लागतो. मासिक पाळीच्या काही दिवसआधी आणि मासिक पाळीच्या दिवसात शरीरातील प्रोजेस्ट्राॅन या हाम्रोन्सची पातळी वाढते. यामुळे काही खाल्लं तरी पोट फुगल्यासारखं वाटतं. ॲसिडिटी होते, बध्दकोष्ठतेची समस्या निर्माण होते. याचाच परिणाम म्हणजे मासिक पाळीत वजन वाढतं.
Image: Google
मासिक पाळीत वजन किती वाढतं?
मासिक पाळीत वजन वाढणं ही सामान्य बाब आहे.मासिक पाळीच्या काही दिवस आही आणि मासिक पाळीत, मासिक पाळी झाल्यानंतर दोन तीन दिवस वजन वाढल्यासारखं वाटतं, पण नंतर ते नैसर्गिकपणे कमीही होत. साधारणत: 2/3 किलो वजन वाढणं ही सामान्य बाब मानली जाते. तज्ज्ञ म्हणतात या काळात वाढणाऱ्या वजनाची काळजी करु नये. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास या काळात वाढणाऱ्या वजनाचे दीर्घकालीन परिणाम होत नाही.
Image: Google
मासिक पाळीत वजन नियंत्रित ठेवण्यासाठी
1. मासिक पाळीत शरीरात पाण्याचं प्रमाण साठून राहातं, म्हणून वजन वाढतं असं तज्ज्ञ म्हणतात. पण म्हणून पाणी कमी पिणे हा उपाय नाही. तज्ज्ञांच्या मते मासिक पाळीदरम्यान पाणी पुरेसं प्यावं. यामुळे सतत काहीबाही खाण्याची इच्छा कमी होते. शरीराला पुरेसे पाणी पिल्याने ऊर्जा मिळते. कारण पाण्यातून शरीरातील इलेक्ट्रोलाइटचा स्तर वाढतो.
2. मासिक पाळीच्या दिवसात पचनावर नकारात्मक होणारा परिणाम टाळण्यासाठे फायबरयुक्त पदार्थ खावेत. मीठ, साखर जास्त असलेले पदार्थ , जंकफूड टाळावेत.
Image: Google
3. मासिक पाळीत शरीराची जास्त हालचाल केली नाही, व्यायाम केला नाही तर जडत्त्व येतं. हे टाळण्यासाठी मासिक पाळीतही व्यायाम करणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. पाळीत व्यायाम केल्यानं त्रास होतो, रक्तस्त्राव जास्त होतो, वेदना होतात हा गैरसमज असून या काळात उत्साही वाटण्यासाठी हलका फुलका व्यायाम करणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
4. मासिक पाळीदरम्यान चहा काॅफी जास्त पिल्यानं वजन वाढतं. म्हणूनच चहा काॅफी मर्यादित स्वरुपात सेवन करावी.