दर महिन्याला येणारी मासिक पाळी म्हणजे महिलांसाठी अनेकदा एखाद्या आजाराप्रमाणे असते. पाळीच्या आधीपासून पोट, पाठ आणि पायात येणाऱ्या कळा, पाळीदरम्यान होणारा असह्य रक्तस्राव आणि यामुळे येणारा थकवा, डोकेदुखी, मळमळ आणि एकूणच अस्वस्थपणा अनेकींसाठी त्रासदायक असतात. त्यातही हार्मोन्समध्ये होणारे बदल मानसिक आणि भवनिक स्तरावरही बरीच आंदोलने घडवत असतात. अशा काळात स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक आरामाची खऱ्या अर्थाने आवश्यकता असते. पूर्वी आपल्याकडे स्त्रियांना बाजूला बसवण्यामागे हेही एक कारण होते. पण आता जगभरातील स्त्रिया घराबाहेर पडून नोकरी करु लागल्या आणि त्यामुळे घरातले आणि बाहेरचे असे दोन्ही सांभाळताना त्यांची खरंच तारेवरची कसरत व्हायला लागली (Three Day Menstrual Leave Every Month In Spain) .
हिच गोष्ट लक्षात घेऊन जगभरात महिलांना मासिक पाळीचे तीन दिवस कायद्याने सुट्टी द्यायला हवी या प्रश्नावर बरीच वर्षे चर्चा सुरू आहे. जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया आणि झाम्बिया या देशांनी अशाप्रकारची सुट्टी महिला कर्मचाऱ्यांसाठी लागूही केलेली आहे. अमेरिकेतील काही खासगी कंपन्यांनी अशाप्रकारची सुविधा आपल्याकडील महिला कर्मचाऱ्यांसाठी लागू केली आहे. मात्र इतर देशांत त्यावर अद्याप केवळ चर्चा सुरू आहे. महिलांना अशी वेगळी सूट देण्याची आवश्यकता खरंच आहे की नाही याबाबत काही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र आता महिलांना मासिकपाळीची सुट्टी देणारा स्पेन हा युरोप खंडातील पहिला देश ठरला आहे. तसेच जगात अशाप्रकारे महिलांना सुट्टी देणारा स्पेन हा पाचव्या क्रमांकाचा देश ठरला आहे.
पुढच्या आठवड्यापासून हा निर्णय प्रत्यक्ष अमलात येणार असल्याचे म्हटले जात आहे. याबरोबरच ज्या महिलांचा गर्भपात होतो त्यांनाही यापुढे काही दिवसांची सुट्टी दिली जाणार आहे. तर सॅनिटरी पॅडसवरील व्हॅटही माफ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबरोबरच शाळेतील मुलींना पॅडची आवश्यकता असल्यास तेही प्रशासनाकडून पुरवण्यात येणार आहेत. महिला वर्गाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून सर्वच देशात अशाप्रकारचा कायदा व्हायला हवा अशी मागणीही अनेक संस्था-संघटनांकडून होत आहे. भारतात काही कंपन्यांकडून अशी सुविधा देण्यात येत असली तरी या विषयावर बरीच मतमतांतरे आहेत. मात्र स्पेन सरकारने उचललेल्या महत्त्वाच्या पावलामुळे आता युरोपातील इतर देशातही या विषयाला वाचा फुटण्याची शक्यता आहे.