पीसीओएस ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. तरुणींमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे या समस्येचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम. पुरुषांमध्ये असणाऱ्या अँड्रोजन नावाच्या हार्मोन्सचे प्रमाण महिलांच्या शरीरात वाढते आणि त्यामुळे वजन वाढणे, चेहऱ्यावर अनावश्यक केस येणे, पुरळ येणे या समस्या निर्माण होतात. नियमित पाळीचे चक्र बिघडणे हे या समस्येचे सर्वात महत्त्वाचे लक्षण असते. वयात आलेल्या महिलेच्या शरीरात साधारण पाळीनंतर १४ दिवसांनी अंडे तयार होते आणि त्यानंतर एकतर गर्भधारणा होते किंवा १४ दिवसांनी म्हणजेच साधारण २८ दिवसांनी ते अंडे फुटते आणि मासिक पाळी येते. अशाप्रकारे दर २८ ते ३० दिवसांनी महिलेला पाळी येणे आवश्यक असते. पण पीसीओएसमध्ये हे चक्र बिघडते आणि पाळी कधी खूप लवकर येते तर कधी खूप उशीरा येते.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गीता वडनप सांगतात...
व्यायाम किंवा आहारावर नियंत्रण ठेवून वजन कमी करावे लागते. किमान २० टक्के वजन कमी केले तरी पीसीओडीची समस्या नियंत्रणात येऊ शकते. हार्मोन्स कंट्रोल करणारी औषधे दिली जातात. ज्यामुळे हार्मोन्सचे संतुलन होण्यास मदत होते आणि पाळी नियमित येण्यास सुरुवात होते. पण काही वेळा औषधे चालू असेपर्यंत ही समस्या नियंत्रणात राहते आणि एकदा औषधे बंद केली की समस्या पुन्हा सुरू होते. त्यामुळे ताणतणावाचे नियमन, जीवनशैली संतुलित असणे हेच यावरील उत्तम उपाय आहेत हे लक्षात घ्यायला हवे. अशाप्रकारच्या समस्या असलेल्या तरुणींना इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यांचे कॉम्बिनेशन असलेल्या गोळ्याही दिल्या जातात.
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. तेजा कुलकर्णी सांगतात...
त्वचेवर अनावश्यक केस येणे, पुरळ येणे यांसारख्या समस्यांसाठी असंख्य ट्रिटमेंटस आहेत. पण त्या घेत असतानाच लाईफस्टाईलमध्ये बदल करणेही तितकेच महत्त्वाचे असते. चेहऱ्यावर जाड जाड केस येणे, अंडर आर्म आणि गळ्यावर डार्क रंग येणे यांसारख्या समस्या सौंदर्याच्यादृष्टीने नक्कीच त्रासदायक असू शकतात. केस खूप जास्त प्रमाणात गळणे, टक्कल पडल्यासारखे दिसणे यांमुळे आत्मविश्वास कमी होतो, त्याचा मुलींच्या मानसिक आरोग्यावरही परीणाम होतो. मात्र वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्यास या सगळ्या समस्यांवर अतिशय उत्तम असे उपाय करता येऊ शकतात. लेझर ट्रिटमेंट, औषधे, काही क्रिम्स यांमुळे या समस्या आटोक्यात येऊ शकतात. त्याचबरोबर वजन कमी करणे आणि लाईफस्टाइलमधील बदलही तितकेच महत्त्वाचे असतात.