Join us   

पुठ्ठ्यांपासून बनवलं व्हेंडिंग मशिन.. ५ रूपयांत सॅनिटरी नॅपकीन, शिक्षिकेचा अभिनव प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 6:54 PM

शाळा- कॉलेजमध्ये असताना ऐनवेळी पाळी आली तर मग सॅनिटरी नॅपकीनच्या (Sanitary napkins) शोधात फिरायचं कुठं? हा तिथल्या विद्यार्थिनींना कायम पडलेला प्रश्न.. त्यामुळेच तर तेथील शिक्षिका किरण सलगर (Kiran Salgar) यांनी पुढाकार घेतला आणि शाळेतच बनवलं व्हेंडिंग मशिन. 

ठळक मुद्दे पाळी सुरू असताना जर एक्स्ट्रा पॅड आणायचं विसरलं तर मग करायचं काय.. त्यामुळे मग अनेक विद्यार्थिनी पाळी सुरू असताना शाळेत, महाविद्यालयात येणं टाळायच्या.

ऋचिका सुदामे पालोदकर 

नांदेड जिल्ह्यातलं  (Nanded district) सगरोळी हे गाव. ग्रामीण भाग असला तरी तेथील संस्कृती संवर्धन मंडळ ही संस्था बरीच नावाजलेली आहे. संस्थेचा परिसर अतिशय मोठा असून तिथे १ ली ते १० वीची शाळा, अकरावी- बारावीचे वेगवेगळ्या शाखेतले वर्ग तसेच संस्थेचे अनेक उपक्रम कायम सुरू असतात. त्यामुळे आसपासच्या गावातील अनेक विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेण्यासाठी येतात. शिवाय संस्थेचा व्याप बराच मोठा असल्याने अनेक शिक्षकांसह अनेक महिला येथे नोकरी करण्यासाठी, रोजगार मिळविण्यासाठीही वेगवेगळ्या गावांहून येत असतात.

 

त्यामुळे तिथे येणाऱ्या प्रत्येकीची अडचण सारखीच.. हा भाग ग्रामीण असल्याने आणि आजूबाजूला खूप काही दुकानं नसल्याने ऐनवेळी जर पाळी आली, तर मग शोधाशोध करत फिरायचं कुठे.. शिवाय पाळी सुरू असताना जर एक्स्ट्रा पॅड आणायचं विसरलं तर मग करायचं काय.. त्यामुळे मग अनेक विद्यार्थिनी पाळी सुरू असताना शाळेत, महाविद्यालयात येणं टाळायच्या. पाळीच्या कारणामुळे त्यांना दर महिन्याला नाईलाजाने ठराविक सुट्ट्या घ्याव्याच लागायच्या. 

 

विद्यार्थिनींचं यामुळे होणारं नुकसान पाहून संस्थेच्या छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अध्यापिका किरण सलगर यांनी व्हेंडिंग मशिन विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बरीच शोधाशोध केली पण या मशिनच्या किमती खूप जास्त होत्या. शिवाय संस्था खूप मोठी असल्याने एक मशिन घेऊनही उपयोग नव्हता कारण संस्थेचे आवार मोठे असल्याने प्रत्येक इमारतीत एक मशिन असणं गरजेचं आहे. त्यामुळे मग त्यांनी व्हेंडिंग मशिन संदर्भात इंटरनेटवर बरीच माहिती घेतली आणि स्वत:च ते मशिन तयार करायचं ठरवलं. त्या स्वत: फिजिक्सच्या अध्यापिका असल्याने त्यांना हे मशिन तयार करणे, त्याचे बारकावे लक्षात घेणे सोपे गेले आणि त्यांनी पुठ्ठे वापरून मशिन तयार केले.

 

या मशिनची रचना अशी करण्यात आली आहे की ५ रूपयांचा कॉईन या मशिनमध्ये टाकला की त्यातून एक सॅनिटरी नॅपकीन बाहेर येतं. सध्या तयार करण्यात आलेलं हे व्हेंडिंग मशिन आकाराने लहान आहे. त्यामुळे त्यात एका वेळेला २० सॅनिटरी नॅपकीनच साठवून ठेवता येतात. आता लवकरच स्टिल आणि पत्र्याचा वापर करून भरपूर नॅपकीन साठवून ठेवता येतील, असं मशिन तयार करण्याचा त्यांना मानस आहे.. भविष्यात या मशिनमध्ये ठेवण्यासाठीचे रियुजेबल सॅनिटरी नॅपकिन्स संस्थेतच कसे तयार करता येतील आणि त्याद्वारे महिलांना रोजगार कसा देता येईल, याचा विचारही संस्थेतर्फे करण्यात येत आहे, असे सलगर यांनी सांगितले. 

 

टॅग्स : आरोग्यमासिक पाळी आणि आरोग्यनांदेडशिक्षकविद्यार्थी