मासिक पाळीदरम्यान प्रत्येकीला होणारा रक्तस्त्राव कमी- जास्त असतो. रक्तस्त्राव कमी किंवा जास्त होणे चांगले किंवा वाईट असते, असे नाही. अनुवंशिकता, प्रत्येकीचे आरोग्य, खानपानाच्या सवयी, तब्येत, व्यायामाच्या सवयी यावरही मासिक पाळीचा रक्तस्त्राव अवलंबून असतो. पण एखाद्या महिन्यात नेहमीपेक्षा खूपच कमी रक्तस्त्राव (decrease in bleeding during periods) होत आहे, असे जाणवले तर त्यामागे नक्कीच काही कारण असते हे लक्षात घ्या. प्रत्येकवेळी हे कारण चिंतेचेच असेल असे नाही. पण तरी अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले.
मासिक पाळीत रक्तस्त्राव अचानक कमी होण्याची कारणे १. थायरॉईड थायरॉईड्स आणि मासिक पाळी यांचा जवळचा संबंध आहे. जर थायरॉईडच्या स्तरामध्ये काही बदल झाला, तर त्याचा परिणाम मासिक पाळीतील रक्तस्त्रावावर होऊ शकतो. त्यामुळे असा त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक असतील तेवढ्या थायरॉईड संदर्भातील चाचण्या करून घ्या.
२. लोहाची कमतरता जर आहारातून लोह खूपच कमी प्रमाणात मिळाले असेल, तरी त्याचा परिणाम पाळीतील रक्तस्त्रावावर होऊ शकतो. त्यामुळे खाण्यापिण्याची काळजी घ्या आणि लोह जास्त प्रमाणात असलेले पदार्थ आहारात आवर्जून घ्या, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
३. मनोपॉजकडे वाटचाल जर तुमचे वय चाळिशीच्या आसपास असेल तर अचानकपणे कमी झालेला रक्तस्त्राव हे मेनोपॉजच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल असू शकते. फ्लो कमी प्रमाणात होण्यासोबतच जर झोपेवर परिणाम झाला असेल, रात्री घाबरून उठत असाल आणि घाम येत असेल, योनी मार्गात कोरडेपणा जाणवू लागला असेल, तर लवकरच येणारा मेनोपॉज हे एक कारण असू शकते.
४. पीसीओडी, पीसीओएस या दोन्ही प्रकारच्या त्रासांमध्ये मासिक पाळीतील रक्तस्त्रावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि हा त्रास कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करा..
या कारणांमुळेही होऊ शकतो पाळीतील रक्तस्त्रावावर परिणाम... - खूप जास्त मानसिक ताण आणि नैराश्य - हार्मोन्समध्ये झालेले बदल - असंतुलित आहार - खूप जास्त व्यायाम - स्थूलता