सध्या कमी वयातच महिला आणि पुरुष वर्गाला भयानक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यातीलच एक मुख्य आणि गंभीर आजार म्हणजे कॅन्सर. हा आजार शरीरातील विविध अवयवांवर होतो. महिलांमध्ये देखील कर्करोगाची समस्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यातील एक मुख्य प्रकार म्हणजे सरव्हायकल कॅन्सर. हा कॅन्सर अर्थात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आहे. सरव्हायकल कॅन्सर हा स्त्रियांमधील सर्विक्स ह्या अवयवात होणारा कॅन्सर आहे. सर्विक्स म्हणजे गर्भपिशवी आणि योनीला जोडणारा अवयव. जगामधे महिलांमध्ये आढळणारा सरव्हायकल कॅन्सर हा सर्वात सामान्य विकार आहे. भारतात ६ - २९% महिलांना ह्या कर्करोगाची बाधा होते.
सरव्हायकल कॅन्सर हा प्रामुख्याने ह्युमन पॅपीलोमा व्हायरस या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे होतो. जो योनि, तोंडी किंवा गुदव्दार संभोगाद्वारे एखाद्या व्यक्तीतून दुस-या व्यक्तीत पसरू शकतो. याचे प्रमाण ३५ ते ५५ वयाच्या महिलांमध्ये जास्त आढळून येते. यासह काही इतर घटक देखील याला कारणीभूत आहेत, जसे की :-
धूम्रपान
रोगप्रतिकारशक्ती कमी होणे
५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर.
३ मुलांपेक्षा जास्त मुले असणे.
सरव्हायकल कॅन्सरची मुख्य लक्षणे काय आहेत?
सुरुवातीला गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे लक्षात येत नाही. गर्भाशयाचा कर्करोग जसजसा वाढत जातो, तशी त्याची लक्षणं निदर्शनास येतात.
त्यापैकी लक्षणे:-
पाळी दरम्यान किंवा लैंगिक संभोगानंतर अनियमित किंवा असामान्य योनी रक्तस्त्राव.
पाठीच्या खाली वेदना किंवा पायात वेदना.
वजन कमी होणे
भूक कमी लागणे
दुर्गंधी स्त्राव किंवा योनि अस्वस्थता
दोन्ही पायांना सूज
सरव्हायकल कॅन्सरवर लवकरच येणार लस
महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची वाढती प्रकरणे लक्षात घेता, भारत सरकारने अलीकडेच जाहीर केले की, ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एप्रिलमध्ये देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली जाईल. या मोहिमेअंतर्गत, महिलांना लस देण्यात येईल, जी ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचा (HPV) धोका कमी करण्यास मदत करेल.
लसीकरणासाठी राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे अध्यक्ष एनके अरोरा यांनी डब्ल्यूएचओला सांगितले की, "लसीकरणासाठी एक धोरण तयार करण्यात आले आहे. कोविड लसीकरण मोहिमेतून मिळालेल्या अनुभवांमुळे खूप मदत झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने विकसित केलेली 'क्वाड्रिव्हॅलेंट लस', ज्याला "सर्वाव्हॅक" असेही म्हणतात. ही लस HPV विषाणूपासून संरक्षण करेल".