डॉ. कल्पना संकलेचा (Nashik Obstetrics And Gynaecology Society)
मासिक पाळी असा थेट शब्द अजूनही आपल्याकडे उच्चारला जात नाही. आडून आडून,सूचक शब्दात सांगितले जाते. त्यामुळे मासिक पाळीच्या संदर्भात गैरसमज आहेत तसे ते मासिक पाळीच्या दिवसातली स्वच्छता अर्थात मेनस्ट्रुअल हायजिनच्या संदर्भातही आहेत. नुकतीच अलिकडे एक घटना सगळ्यांनी बातम्यांमधून आली. मासिक पाळीच्या डागांना काहीतरी भलतंच समजून भावानं बहिणीचा खून केला. त्याचं अज्ञान एवढं की त्याला वाटलं हिचे शरीरसंबंध आले आणि ती कबूल करत नाही. त्या लहानशा मुलीला मासिक पाळीसंदर्भात काही माहितीही नव्हतं. त्यामुळे गैरसमज इतक्या टोकाचेही दिसतात त्यामुळे मासिक पाळीसंदर्भात केवळ मुलींनाच नाही तर मुलांनाही थेट, स्पष्ट शब्दात-शास्त्रीय भाषेत माहिती द्यायला हवी तरच गैरसमज कमी होतील.
आताशा शाळांमध्ये मुलामुलींना मासिक पाळीसंदर्भात माहिती दिली जाते. मुलांचा अवेअरनेस हा मुलींइतकाच महत्त्वाचा आहे. आणि मुख्य म्हणजे स्पष्ट शब्दात, योग्य शब्द वापरुन थेट बोलायला सांगायला हवं. मासिक पाळी आणि मेन्स्ट्रुअल हायजिनसंदर्भात आपल्याकडे एक मोठी अडचण आहे ती म्हणजे मासिक पाळी असे शब्द उच्चारतानाही अनेकजण अडखळतात. सूचक बोलतात. खरंतर वयात येणाऱ्या मुलीला मासिक पाळी आली की तिला घरात त्यासंदर्भात स्पष्ट चारचौघात बोलता यायला हवं. आईबाबा, भाऊबहीण सगळ्यांना माहिती हवं की तिचे पिरिएड्स सुरु आहेत म्हणून तिची चिडचिड होते आहे. पोट दुखतं आहे किंवा अन्य काही तेव्हा मोकळेपणा घरात यायला हवा.
(Image : Google)
दुसरा मुद्दा आहे मासिक पाळीतली स्वच्छता
१. पूर्वी काय हाेते तर कापड वापरले जात. ते सगळ्यांपासून लपवून अंधारात वाळवले जात. त्यामुळे इन्फेक्शन होत असे. आताही कापड वापरायला हरकत नाही. पण ते कापड धुवून सूर्यप्रकाशात वाळवले गेले तर इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
२. शिवाशिव, बाजूला बसणे, हे सारे योग्य नाही हे सांगितले गेले पाहिजे, त्याविषयी बोलले पाहिजे.
३. मासिक पाळीत स्वच्छता राखली नाही तर इन्फेक्शनचा आणि पुढे त्यातून वंध्यत्वाचा धोकाही निर्माण होऊ शकतो.
४. सॅनिटरी पॅड्स वापरण्याबाबतही अनेक गैरसमज दिसतात. काहीजणी सांगतात आम्हाला थोडाच रक्तस्त्राव होतो एकच पॅड चोवीस तास वापरलं तर काय बिघडलं. तर ते ही चूक आहे. थोडा रक्तस्त्राव होत असला तरी दर आठ तासांनी पॅड बदलायला पाहिजे.
५. पॅडमुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो का असा प्रश्न कायम विचारला जातो. तर त्यात डायोक्सिन नावाचा कॅन्सरजनक पदार्थ असतो त्यातून कॅन्सर होण्याचा धोका असतोच. सॅनिटरी पॅडमध्ये प्लास्टिक असते त्याच्या विघटनाचाही प्रश्न आहेच.
६. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात पॅड आड तासाने बदला. अनेकींना रॅश येणं, ॲलर्जी, इन्फेक्शन असा त्रास होतो. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
७. कापड वापरत असला आणि ओलसरपणा राहिला तर त्यातून फंगल इन्फेक्शन होऊ शकते, त्यामुळे स्वच्छता आवश्यक आहे.
८. पॅडपेक्षाही कप वापरणं जास्त सोपं आणि सोयीचं आहे. आईने कप वापरणं शिकून घेतलं तर मुलींना ते वापरणं सोपं आणि अधिक सुखकर होईल.
९. मासिक पाळी नुकतीच सुरु झालेल्या अनेक मुली किंवा त्यांच्या आई विचारतात की टॅम्पून वापरु का, मात्र त्यापेक्षा कप वापरणं जास्त सोयीचं असतं.
१०. मासिक पाळीविषयी स्पष्ट बोलणं आणि योग्य स्वच्छता राखणं अत्यंत गरजेचं आहे.
(लेखिका ख्यातनाम स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)
विशेष आभार : Nashik Obstetrics And Gynaecology Society