दर महिन्याला येणारी पाळी ही प्रत्येक महिलेसाठी अगदीच सामान्य गोष्ट. पाळीमध्ये खूप रक्तस्त्राव होणे, पाळीच्या दरम्यान आणि अलिकडे काही दिवस पोट, पाय, कंबर दुखणे, डोकं जड होणे किंवा अगदी वजन वाढणे अशा समस्या महिलांना भेडसावतात. पण नवीन जीवाची निर्मिती करण्याची क्षमता असलेली स्त्री हे सगळे कोणतीही तक्रार न करता सहन करते. अनेकदा हे त्रास जास्त वाढले की आपण डॉक्टरांचा सल्लाही घेतो. पण गेल्या काही वर्षात तरुणींमध्ये पाळी उशीरा येणे, पाळी महिन्यापेक्षा लवकर येणे किंवा बराच काळ रस्तस्त्राव होत राहणे अशा समस्या वारंवार दिसून येतात. बऱ्याच मोठ्या गॅपने पाळी येणे किंवा वेळेच्या आधी पाळी येणे यामागे नेमकी काय कारणे असू शकतात. फक्त हार्मोन्सच्या असंतुलनामुळे हे होते की इतरही काही गोष्टी यासाठी कारणीभूत असतात हे लक्षात घ्यायला हवे. पाहूयात पाळीच्या तारखा चुकण्याची नेमकी कारणे कोणती...
१. गर्भनिरोधक किंवा इतर औषधोपचार
हल्ली लग्नाच्या आधी लैंगिक संबंध ठेवणे किंवा विवाहेतर लैंगिक संबंध यांचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत चुकून गर्भ राहिला तर गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा पर्याय अनेक जण स्वीकारतात. कोणत्याही माहितीशिवाय किंवा योग्य त्या सल्ल्याशिवाय अशाप्रकारे गर्भनिरोधक औषधे घेणे त्या वेळेसाठी योग्य वाटत असले तरी त्याचे दिर्घकालिन परिणाम होतात. पाळीच्या तारखा चुकणे यामागे गर्भनिरोधक औषधे घेणे हे एक महत्त्वाचे कारण असू शकते. याशिवाय स्टेरॉईडस किंवा इतरही काही औषधांमुळे पाळीच्या तारखा पुढे-मागे होऊ शकतात.
२. पाळीशी निगडित तक्रारी
सध्या विविध कारणांनी तरुणींमध्ये पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम, थायरॉईड, पॉलिप्स, पेल्विक इन्फ्लमेटरी जिसीज अशा विविध तक्रारी असतात. या सगळ्या तक्रारींमध्ये हार्मोन्सचे असंतुलन हे मुख्य कारण असले तरी गर्भाशयाशी निगडीत समस्या यामध्ये होतात. यामुळे पाळीशी निगडीत तक्रारी उद्भवतात आणि एकतर पाळी आली की खूप काळ सुरु राहते किंवा सातत्याने पाळी येते. तर काही वेळा कित्येक महिने पाळी लांबते. या समस्यांसाठी वेळीच स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही फायद्याचे ठरते.
३. ताणतणाव
सध्या करीयर, कौटुंबिक किंवा इतरही ताण इतके जास्त वाढले आहेत की त्याचा महिलांच्या पाळीवर परिणाम होतो. सतत ताणग्रस्त परिस्थितीत असल्यास पाळी नेहमीपेक्षा खूप लवकर येते. त्यामुळे मानसिक स्थिती चांगली ठेवणे अतिशय आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ताणरहित जीवन जगणे, आयुष्यातील आनंदाचे क्षण शोधणे अतिशय गरजेचे असून सतत तणावात राहिल्यास आरोग्याच्या इतरही अनेक समस्या उद्भवतात.
४. जीवनशैलीविषयक गोष्टी
आपला आहार, झोप, व्यायाम, व्यसने या जीवनशैलीतील गोष्टी आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करत असतात. आपण सतत जंक फूड किंवा पोषण न मिळणारे पदार्थ खात असू तर त्याचाही पाळीवर परिणाम होतो. इतकेच नाही तर पुरेशी झोप न मिळणे, व्यायामाचा अभाव यांसारख्या गोष्टींमुळेही मासिक पाळीच्या समस्या उद्भवतात. याशिवाय हल्ली दारु, सिगारेट किंवा इतरही व्यसने करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण वाढत चालले आहे. या व्यसनांचा शरीरावर आणि पाळीवर परिणाम होत असल्याने त्याबाबतही काळजी घ्यायला हवी.