Join us   

ऋतूचक्राचा कसला विटाळ? मासिक पाळी म्हणजे जगण्याचा आधार, त्याविषयी का आळीमिळी गुपचिळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2024 7:07 PM

World Menstrual Hygiene Day : मासिक पाळीतल्या दिवसातली अस्वच्छता मोठ्या आजारांचे कारण ठरते.

ठळक मुद्दे जो गर्भ वाढवतो आणि बाळ जन्म घेण्यासाठी महत्त्वाचा असतो, तो गर्भशयाचा स्तर वाईट, अपवित्र, घाण कसा असू शकेल?

डॉ. गौरी करंदीकर (स्त्री आरोग्य व प्रसुती शास्त्र तज्ज्ञ) ‘माझी १० वर्षांची मुलगी शाळेतून लवकर घरी आली आणि रडत होती, शाळेत मैत्रिणी हसल्या तिला, एवढं लवकर कशी सांगणार होते तिला मी?’ “तीन तीन महिने पाळी आली नाही आणि मला छान वाटत होतं, कटकट नको, ते घरी इथे बसू नको, हे करू नको, असा काही त्रासच नाही... आणि वजन वाढत गेलं, काय म्हणे PCOS” “वारंवार पांढरे जात होते, दिवस राहत नाही म्हणून तपासणी केली तर त्यामुळे अडचण येते आहे, गर्भनलिका बंद झाल्या आहेत. हायजिन नाही म्हणे, म्हणजे नक्की काय चुकले ?” “पाळी बंद होऊन दोन वर्षे झाली आणि मग अंगावर अधूनमधून लाल जात होते, सांगायची भीती आणि लाज वाटत होती आणि आज टेस्ट केली तर कॅन्सर!!” ** २८ मे हा दरवर्षी मासिक पाळीदरम्यान घेण्याची स्वच्छता यासाठी जनजागृती करण्याचा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. मासिक पाळी ही खरं तर घराघरात घडणारी गोष्ट असते, तरी जागृती करायची काय गरज आहे, असा प्रश्न आल्यावाचून राहात नाही. मासिक पाळी ही नैसर्गिक बाब असली तरी त्याबाबत अनेक गैरसमजुती आहेत. अगदी मासिक पाळी का आणि कशी येते, ती येणे का जरूरी आहे, याबाबत मुली आणि महिलांना अजूनही अर्धवट माहिती आहे. मुळात मासिक पाळीला, अडचण, महिन्याचा त्रास, विटाळ आणि असे अनेक नकारात्मक शब्द आणि कल्पना जोडल्या गेल्या आहेत. नियमित पाळी येत असेल तर दर पहिल्या पंधरा दिवसात अंडाशयामध्ये स्त्रीबीज बनते आणि गर्भाशयात अंतस्तर बनतो. गर्भधारणा झाली तर पाळी येत नाही. कारण गर्भाशयाचा अंतस्तर त्या गर्भाला वाढवण्यासाठी गादी तयार करून त्याचे पोषण करते. मात्र, गर्भधारणा नाही झाली तर तोच स्तर बाहेर पडतो. त्यालाच पाळी येणे म्हणतात. जो गर्भ वाढवतो आणि बाळ जन्म घेण्यासाठी महत्त्वाचा असतो, तो गर्भशयाचा स्तर वाईट, अपवित्र, घाण कसा असू शकेल?

मात्र, चित्र काय दिसतं?

१. २०२३मध्ये नाशिक स्त्रीरोगतज्ज्ञ संघटेनेतर्फे मासिक पाळीबाबत घेण्यात आलेल्या फेम या उपक्रमदरम्यान आणि याचवर्षी प्रकाशित जागतिक स्तरावरच्या सर्वेक्षणातसुद्धा असे आढळून आले की, पाळीदरम्यान स्वच्छ्ता कशी राखावी, याबाबत अनेक स्त्रियांना अपूर्ण माहिती आहे. २. अजूनही स्वच्छ कापड किंवा पॅड्स किंवा कप वापरणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण भारतात ५०% आहे आणि जगभरात ते त्याहीपेक्षा कमी आहे. ३. मासिक पाळीदरम्यान वेगळे बसणे, स्वयंपाक घरात न येणे, काही पदार्थ न खाणे, शिवाशिव टाळणे, व्यायाम न करणे, अशा अनेक प्रथा बघायला मिळतात. ४. आणि या समजूती फक्त भारतातच नव्हे तर जगभरात अशा अनेक समजुती आहेत. ५. मासिक पाळीदरम्यान घेण्याची काळजी आणि स्वच्छता याबाबत नेमके काय करावे, याबद्दल स्त्रियांना नीट माहितीच नाही. याविषयावर स्त्रिया घरात बोलत नसल्यामुळे याबाबतच्या शास्त्रीय माहितीपासून स्त्रिया दूरच आहेत.

६. त्यात शहर आणि ग्रामीण, शिक्षित, अशिक्षित हा फरक असला तरी याबाबतीत एकंदर योग्य माहिती असलेल्यांचे प्रमाण फारच कमी आहे. घरातील पुरुष मंडळी किंवा मुले यांना योग्य माहिती असण्याची संख्या पण कमी असल्याचे आढळून येते. ७. मग ही माहिती कुठून मिळते? बहुतांश वेळा मुलींना त्यांची आई, मैत्रीण आणि आता सोशल मीडियाकडून मिळते. ८. २८ दिवसांनी येणारी व ५ दिवस राहणारी पाळी म्हणून २८ मे हा दिवस जगभरासाठी निवडला आहे. ९. प्रजननाबरोबरच स्त्रीच्या आरोग्यासाठीसुद्धा मासिक पाळी नियमित येणे महत्त्वाचे आहे. १०. पाळी २१ दिवसांच्या आत येणे, दीड महिन्यापेक्षा उशिरा येणे, नियमित काम किंवा शाळा कॉलेज बुडेल इतके पोटात दुखणे, अती रक्तस्राव होणे, अंगावर गाठी जाणे, अधूनमधून रक्तस्राव होणे, मेनोपॉजनंतर रक्त जाणे या लक्षणांची गांभीर्याने दखल घेणे जरूरी आहे.

स्वच्छता महत्त्वाचे कारण.. १. मासिक पाळीदरम्यान विशेष स्वच्छता ठेवावी लागते. दर आठ तासाला पॅड, कप बदलणे, मुळात पाळीसाठी घरातील घाण कापडाचा वापर न करणे, हे महत्त्वाचे आहे. २. पॅड, कप वापरताना स्वतःचे हात आधी आणि नंतर योग्य पद्धतीने धुतले पाहिजेत. अनेक वेळा सार्वजनिक टॉयलेटमध्ये हे पॅड उघडे टाकलेले दिसतात. त्यामुळे इतर स्त्रियांना इन्फेक्शन होऊ शकते. ३. योग्य स्वच्छता ही केवळ त्या चार - पाच दिवस न ठेवता, नेहमी ठेवायची आहे. त्यामुळे बाहेर येणारा स्त्राव हा नैसर्गिक आणि स्वच्छ असेल. जंतुसंसर्ग स्वतःला, जोडीदाराला होणार नाही.

४. स्वच्छता न राखल्याने जंतुसंसर्ग म्हणजेच पांढरे पाणी जाणे, त्याला वास असणे, खाज येणे, पुरळ येणे, वारंवार लघवीमध्ये इन्फेक्शन होणे, संभोग करताना त्रास होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे वंध्यत्व आणि पुढे कर्करोगही होऊ शकतो. ५. नाशिकमध्ये FeM, हा मासिक पाळीसंदर्भात उपक्रम राबवला. तेव्हा अनेक शाळा, महिला मंडळ, संस्थांमध्ये जाऊन जेव्हा आम्ही मुलं - मुली आणि स्त्रियांशी संवाद साधला. तेव्हा कळलं की अजूनही पाळीसंदर्भात गैरसमज आहेत. ६. प्रत्येक मासिक पाळीमध्ये वापरले जाणारे प्रत्येक स्त्रीचे साधारण १५ पॅड्स हे स्त्रियांच्या आरोग्याबरोबर पर्यावरणासाठी घातक ठरणार आहेत. त्याचे विघटन होण्यासाठी सुमारे ५०० वर्षे लागू शकतात. त्यासाठी रियजेबल पॅड्स किंवा मेन्ट्रुअल कप वापरले तर दर महिन्याला तयार होणारा कचराही कमी होऊ शकतो. ७. मासिक पाळी म्हणजे निसर्गाचा मानव जातीला कायम ठेवण्याचा मोठा प्रयत्न आहे. त्यासाठी पाळण्याची स्वच्छता स्त्री आणि निसर्ग दोघांसाठी महत्त्वाची आहे आणि म्हणून हा जनजागृती दिवस World menstrual hygiene day!  

टॅग्स : मासिक पाळीचा दिवसमहिलामासिक पाळी आणि आरोग्यआरोग्य