- प्रज्ञा म्हात्रे
तिला पहिली मासिक पाळी आली आणि घरांतील महिलांमध्ये कुजबुज सुरू झाली. कावळा शिवला असे काही बाही बोलणे सुरू झाले. तिला काहीच समजत नव्हते. तिच्या मैत्रिणींना तिच्या आधीच मासिक पाळी सुरू झाली होती. तिला इयत्ता आठवीत असताना पहिली पाळी आली. त्रास होत होता, पोटात दुखत होते. घरातल्यांनी या दिवसांत समजून घ्यायचे असते. पण घरातील बायकाच इथे नको बसू, तिथे नको बसू, वेगळी रहा, ताट वेगळे ठेव, बाहेर बस असे बोलून तिला हिणवू लागल्या होत्या. प्रश्न तर किती तिच्या मनात होते. कळत नव्हतं मासिक पाळी आली तर असा काय मोठा गुन्हा झाला?
त्यावेळी सॅनिटरी नॅपकिनविषयी तिची फारशी जागरूकता नव्हती. तिच्या आईने तिला कपड्याची चिंधीच दिली होती. ती कशी वापरायची याचे फारसे प्रशिक्षणही मिळाले नव्हते. तिचा कुठे हात लागला तरी आई तिच्यावर धावून जायची, ओरडायची. त्यात पाळीमुळे शारीरिक बदल होत होते. चेहऱ्यावर पिंपल्सही या दिवसांत तिला येऊ लागले होते. पिंपल्स आल्यामुळे मुले तिला चिडवू लागली होती. त्यावेळी शाळेत सामाजिक संस्थांकडून पाळीबद्दल शालेय विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिरे ठेवली जात. असेच तिच्या शाळेत एक शिबिर आयोजित केले होते. वर्ग शिक्षिकेने शाळेत जाहीर केले फक्त मुलींसाठी शिबिर आहे त्यामुळे मुलींनी पहिल्या मजल्यावरील वर्गात जाऊन बसायचे आहे. मुली जात असताना मुलांमध्ये अर्थातच चर्चेला उधाण आले. मुले आपापसात बोलू लागली. शिबिर झाल्यानंतर तिच्या मैत्रिणींनी तिला बाजूला घेऊन बजावले की शिबिराबद्दल वर्गातल्या मुलांशी एक अक्षरही बोलायचे नाही. हळूहळू मुली एकमेकींना तुला पाळी येते का ग? पहिली पाळी कधी सुरू झाली? असे प्रश्न विचारू लागल्या. उत्तर देताना तिलाच लाजल्यासारखे झाले.
महाविद्यालयात गेल्यावर नवीन मैत्रिणींचा ग्रुप तयार झाला. त्या मैत्रिणींसोबत विषय निघाला, मेडिकलमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स मागताना खूप लाज वाटते. त्यात आजूबाजूला पुरुष मंडळी असतील तर आणखीन लाज वाटते. त्यांच्यासमोर मागितले की, सगळे पुरुष एका वेगळ्याच नजरेने पाहतात. त्यातील एक मैत्रीण बिनधास्त होती. ती म्हणाली, मला तशी काही लाज वाटत नाही, मी तर बिनधास्त मागते. मैत्रिणीच्या या बोलण्याने तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि तिही मेडिकलमध्ये जाऊन मोकळेपणानं सॅनिटरी नॅपकिन्स मागू लागली.
पुढे तिचे लग्न झाले आणि लग्न झाल्यावर ती त्याच जुनाट जगात परत गेली. पाळी आली तसा सासूने जाच सुरू केला. बाजूला बसणं सुरू झालं. त्यात हुंडा, खोटे बोलून लग्न केलेले या सगळ्या गोष्टींनी तिला सासरी जाच झाला. त्यांनी तिला घरातून हकलून दिल्यावर ती माहेरी राहू लागली. एकीकडे ती न्यायालयीन लढा देत असताना दुसरीकडे पाळीविषयी समाजात जनजागृती करू लागली. तिची पाळी बोलू लागली. आज ती बिनधास्त पाळीवर बोलते, त्यासंदर्भातल्या प्रश्नांच्या बातम्या करते. एकेकाळी अळीमिळी गुपचिळीमध्ये अडकलेला पाळी हा विषय तिच्यासाठी आता समाज जागरूकता करण्याचा विषय झाला आहे.