रेशमा कचरे
मासिक पाळीच्या काळात अनेकजणी चिडचिड करतात, रडतात. त्यांचं मानसिक स्वास्थ्यही बिघडलेलं दिसतं. पण असं का होतं तर आहार, व्यायामाचा अभाव असेल तर अशा स्त्रियांमध्ये हा त्रास अधिक असतो. हा त्रास असह्य होत असेल तर सर्व प्रथम स्त्रीरोगतज्ज्ञांना दाखवायला हवं. ते ही फार कमी जणी करतात. अंगावर काढतात. काहींना तर मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याची गरज असते, काहीवेळा स्त्रीरोगतज्ज्ञच मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला देतात. वयात येताना आणि रजोनिवृत्तीच्या काळात शरीराइतकेच मनाचे स्वास्थ्यही महत्त्वाचे असते. पण त्याकडेही लक्ष दिले जात नाही.
काय दिसतात ही लक्षणं?
लोकांशी संवाद कमी करतात. चिडचिड करतात. कामातील रस कमी होतो. काम करायला नको वाटते.
कामात लक्ष लागत नाही. उत्साह कमी झालेला असतो. झोपेवर व भुकेवर परिणाम होतो.
आत्मविश्वास कमी झालेला असतो. निद्रानाशाच्या अनेक तक्रारी निर्माण होतात.
यासाऱ्यावर औषधोपचारांच्या बरोबरीने योग्य आहार, व्यायामाची जोड दिली व सकारात्मक विचारांनी या लक्षणांची तीव्रता कमी करता येते. या टप्प्यांमध्ये शारीरिक मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी बदलांचा डोळसपणे विचार करायला हवा.
वयात येताना, प्रसूतीपूर्व, प्रसूतीपश्चात आणि रजोनिवृत्तीच्या कालावधीमध्ये होणारे शारीरिक, मानसिक बदल वैद्यकीय परिभाषेत समजून घेत त्यांना योग्य उपचारांची जोड दिली तर त्यावर या दिवसातही आनंदी, उत्साही राहता येऊ शकतं.
स्त्रियांच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर काही नेमके बदल होत असतात. मासिक पाळीची सुरुवात, प्रसूती आणि मासिक पाळी बंद होणे, या टप्प्यांवर काही स्त्रियांना विशिष्ट "मानसिक आजार" होतात. या प्रत्येक टप्प्यांवर स्त्रियांना कमी कालावधीत काही शारीरिक, मानसिक व सामाजिक बदल स्वीकारावे लागतात. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडू शकते.
मासिक पाळी दरम्यान स्त्रियांचे मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी उपाय
१. स्त्रियांनी नेहमी स्वतःला वेळ देणे आवश्यक आहे म्हणजेच जे काम केल्याने स्वतःला आनंद होतो ते काम कमीत कमी अर्धातास दिवसातुन काढून करणे.
उदाः मैत्रीणींशी गप्पा, वाॅक, जिम, योगा, मेडिटेशन, रिलॅकशेसन, म्युझीक, डान्स, काहीही ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल.
२. स्त्रियांचे स्त्रीत्त्व अधोरेखित करणारे दोन हार्मेन्स म्हणजे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. गर्भधारणेच्या अवयवांचे आरोग्य आणि कार्य हे हार्मोन्स पार पाडतात. अर्थातच या हार्मोन्सचे कार्य केवळ या अवयवांपर्यंत राहत नाही. ३. शरीरातील प्रत्येक बाब मेंदूशी निगडित असल्याने या हार्मोन्सचाही मेंदूवर परिणाम होतो.विशेषत: स्त्रियांचा कल स्वतःचा कोणताही आजार क्षुल्लक समजण्याकडे असतो. शिवाय याबाबतची अपुरी माहिती देण्याकडेही कल असतो.
४. महिला आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेत असतात. पण इतरांच्या आरोग्याची देखभाल करणाऱ्या स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करत असतात. हैराण करणारी बाब म्हणजे त्यांच्या या त्यागाकडे घरातील लोकही दुर्लक्ष करतात.
५. महिलांना दुय्यम दर्जा देण्याची विचारधारा त्यांच्या आरोग्याबाबतही लागू होते. या महिला आपल्या शारीरिक आणि मानसिक अडचणींबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत नाहीत. परिणामी, त्यांच्यावर योग्य वेळी उपचार केले जात नाहीत.
६. शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये ह्या विषयावर अजूनही पाहिजे तितके मोकळेपणाने, खुलेपणाने बोललं जात नाही. मासिक पाळी विषयी गुपचूप बोललं जातं व या विषयाबध्दल खुप साऱ्या अंधश्रध्दाही आहेत.
७. आज समाजात स्त्री व पुरुष या दोघांनाही मासिक पाळी बद्दल अजून ज्ञान घेण्याची, स्त्रियांच्या भावनांना समजून घेण्याची खुप गरज आहे. जनजागृतीमुळे हे शक्य होऊ शकेल व लोकांशी संवाद साधून मोकळेपणाने बोलणे ही काळाची गरज आहे. स्त्रियांच्या शारिरीक व मानसिक आरोग्यावर आणि स्थैर्यावर तिच्या कुटुंबाचे भविष्य अवलंबून असते. शारीरिक त्रासासाठी जसा उपचार- सल्ला घेणे गरजेचे असते, त्याचप्रमाणे मानसिक आरोग्याची काळजीही घेणे सुध्दा महत्त्वाची असते.
८. घरातील स्त्री आजारी असल्यावर तिची कामे कदाचित इतर कोणी करु शकेल, पण तिच्यासारखे प्रेम आणि आपुलकी इतर कुठूनही मिळवणे कठीण म्हणून मानसिक समस्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. मानसिक आजारपण आणि मानसिक ताणतणाव यामुळे आपल्या आयुष्यातील आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो.
९. जगण्यातील उमेद कमी होते याचा विचार गांभीर्याने करणे आवश्यक आहे. म्हणून आपणच आपले मानसिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करूयात व प्रत्येक क्षण आनंदी करण्याचा प्रयत्न करूया.
( लेखिका मानसिक आरोग्यासाठी जनजागृती करणाऱ्या परिवर्तन संस्थेत लेखिका समुपदेशक आहेत.
मानसिक आधार आणि आत्महत्या प्रतिबंध मनोबल हेल्पलाईन
७४१२०४०३००
येथेही तुम्ही मदतीसाठी संपर्क साधू शकता.
www.parivartantrust.in