Join us  

सोनाली बेंद्रे सांगतेय, कॅन्सरनंतर कसे जगायचे तुम्ही ठरवा... आयुष्य तुमचे, ते असे सावरा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2021 1:39 PM

कॅन्सर हा आजार, त्याची उपचारपद्धती निश्चितच अतिशय वेदनादायी आहे. पण ही फेज एकदा पार पडली की, नंतरचे आयुष्य तुम्हाला हवे तसे जगण्यासाठी, तुम्हाला हवे तसे खुलविण्यासाठी तुम्ही नक्कीच सज्ज होऊ शकता, असे अभिनेत्री सोनाली बेंद्रे सांगते. 

ठळक मुद्देआपल्याला कॅन्सर झाला आहे, हे ऐकूनच अनेक महिला हतबल  होऊन जातात.केस आणि सौंदर्य म्हणजे महिलांचा विकपॉईंट. कॅन्सर नेमका याच गोष्टींवर आघात करताे. म्हणूनच अशा सगळ्याच महिलांसाठी सोनालीने शेअर केलेली प्रत्येक पोस्ट आणि तिचा प्रत्येक फोटो पॉझिटीव्हीटी देणारा ठरतो आहे. 

अतिशय मोहक आणि लाघवी सौंदर्य लाभलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे. तिला कॅन्सर झाला, तेव्हा तिच्यासकट तिचे चाहतेही हादरले होते. पण ज्या पॉझिटीव्ह ॲटीट्यूटडने सोनालीने कॅन्सरचे उपचार घेणे  सुरू केले, त्यावरून कॅन्सरशी लढणाऱ्या लाखो रूग्णांनी प्रेरणा घेतली होती. हाच पॉझिटीव्ह ॲटीट्यूट सोनालीने नुकताच एक इन्स्टाग्राम पोस्ट टाकून आपल्या चाहत्यांसोबत शेअर  केला आहे. यामध्ये तिने ती कॅन्सरचे उपचार घेत असतानाचा आणि सध्याचा असे दोन फोटो शेअर केले  आहेत. आज कॅन्सरशी लढणाऱ्या हजारो महिलांसाठी सोनालीने शेअर केलेली पोस्ट उर्जा देणारी ठरत आहे.यामध्ये सोनाली म्हणते की, वेळ अगदी अलगद उडून जातो. आज आजारातून बाहेर पडताना जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा मला ताकदही दिसते आणि दुर्बलताही दिसते. पण सगळ्यात महत्त्वाचं  म्हणजे  मला दिसते ती माझी इच्छाशक्ती. उपचारातून बरे झाल्यानंतर कॅन्सरला माझे जगणे कसे असावे, हे ठरवू  न देण्याची माझी इच्छाशक्ती. तुम्ही जे आयुष्य निवडता, तसेच तुम्ही ते तयार करता.  म्हणून  नेहमी  लक्षात ठेवा की कॅन्सरनंतरचे उर्वरित आयुष्य कसे जगायचे आहे किंवा तुम्हाला ते कसे हवे आहे, हे तुम्हीच  ठरवा, कॅन्सरला ते ठरविण्याचा अधिकार देऊ नका.  

 

आपल्याला कॅन्सर झाला आहे, हे ऐकूनच अनेक महिला हतबल  होऊन जातात.  कॅन्सर आता  आपले आयुष्य संपविणार, जगण्यातली मजा, आनंद हरवून जाणार असा अनेकींचा समज असतो. केस आणि सौंदर्य म्हणजे महिलांचा विकपॉईंट. कॅन्सर नेमका याच गोष्टींवर आघात करताे. त्यामुळे कॅन्सरचे उपचार सुरू करताच आपले केस जाणार, आपण विद्रुप होणार हा विचारही अनेकींमध्ये नकारात्मकता  निर्माण करतो. म्हणूनच अशा सगळ्याच महिलांसाठी सोनालीने शेअर केलेली प्रत्येक पोस्ट आणि तिचा प्रत्येक फोटो पॉझिटीव्हीटी देणारा ठरतो आहे. 

कॅन्सरचे निदान झाल्यावर सोनाली आपल्या चाहत्यांना म्हणाली होती, की मला कॅन्सर होईल असं  कधी वाटलंच नव्हतं. पण आता कॅन्सर झाला आहेच, तर लवकरात लवकर उपचार सुरू करणं हा एकमेव उपाय आहे. मी या आजारातून बरी होणारच याविषयी मी, माझे कुटूंबिय आणि मित्रमंडळी प्रचंड आशावादी आहोत. कॅन्सरविरुद्ध निकराचा लढा देण्याचा मी निर्धार केला आहे, असेही सोनालीने त्यावेळी प्रचंड आत्मविश्वासाने सांगितले होते.तिचा हाच आत्मविश्वास आज कॅन्सरशी लढणाऱ्या प्रत्येकाने घेण्याची गरज आहे. कॅन्सर हा आजार, त्याची उपचारपद्धती निश्चितच अतिशय वेदनादायी आहे. पण ही फेज एकदा पार पडली की, नंतरचे आयुष्य तुम्हाला हवे तसे जगण्यासाठी, तुम्हाला हवे तसे खुलविण्यासाठी तुम्ही नक्कीच सज्ज होऊ शकता, असेही सोनाली सांगते. 

टॅग्स :आरोग्यकर्करोगसोनाली बेंद्रे