डॉ. शिल्पा चिटणीस जोशी
"डॉक्टर ,तुम्ही दिलेल्या गोळ्या बंद केल्या की परत युरीन इन्फेक्शनचा त्रास सुरू झालाय..कधी बरं वाटेल मला?"
"अहो, तुमची शुगर अजून जास्तच दिसतीये..मी सांगितलं तसा व्यायाम आणि भात,साखर,मैदा,बटाटा सगळं बंद केलंय का नक्की?"
"हो हो..मी आता गूळघालते चहात सुद्धा!!"
"अहो गुळ घालून कसं चालेल?शुगर वाढणारच..कोणी सांगितलं तुम्हाला मधुमेहात गुळ चालतो म्हणून?"
"अहो व्हॉट्स ॲप वर आलं होतं आमच्या ज्येष्ठ नागरिक ग्रुप वर.. बरं मग मध सुरू करते"
"नाही हो! मधाने ही शुगर वाढणारच शेवटी..तुमची शुगर इतकी जास्त आहे की हे सगळंच बंद करायला हवं. व्यायाम वाढवायला हवा. शुगर नियंत्रणात आल्याशिवाय कोणतंच इन्फेक्शन बरं होत नाही."
हे असे संवाद रोजचेच आहेत क्लिनिक मध्ये. व्हॉट्सअँप फॉरवर्ड वर ही मंडळी जेवढा विश्वास ठेवतात तेवढाच त्यांच्या डॉक्टरांवर दाखवला तर डॉक्टर यांना लगेच बरे करू शकतील. गेल्या काही वर्षात आपल्या देशात मधुमेह असलेल्या रुग्णांचा महापूर आला आहे. जगातले सर्वात जास्त मधुमेही रुग्ण भारतात आहेत. भारताची जशी जशी आर्थिक आणि सामाजिक प्रगती होत गेली तसतशी अन्नधान्याची मुबलकताही वाढत गेली. आता वेगवेगळे अन्नपदार्थ सहज उपलब्ध आहेत आणि दुसरीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे शारीरिक कष्ट सर्वांचेच कमी झालेत. त्यातून भात आणि साखर हे भारतीयांच्या रोजच्या आहारात अगदी आग्रहाने खाल्ले जातात. भारतीयांच्या मागच्या पिढ्या कुपोषित होत्या आणि आता अतिखाण्यामुळे वजन वाढून वेगळ्या अर्थाने कुपोषित होत आहेत. गेल्या काही महिन्यात क्लिनिक मध्ये अनियंत्रित मधुमेह असल्यामुळे बरेच आठवडे बरा न होणारा योनीमार्ग तसेच लघवीचा जंतुसंसर्ग असलेल्या बऱ्याच स्त्रिया पाहण्यात येत आहेत (Navratri Special Health Misconceptions about Diabetes and having Jaggery and Honey Instead of Sugar) .
बऱ्याच वेळा मधुमेहाचे निदान झालेलेच नसते. मधुमेहाचे निदान करण्यासाठी Hba1C ही तपासणी अनिवार्य आहे. ही तपासणी चाळीशीनंतर प्रत्येक वर्षी सर्वांनी जरूर करावी तसेच मधुमेह असलेल्यांनी ही तपासणी तर तीन महिन्यांनी करावीच. बरेच जण फास्टींग म्हणजे उपाशीपोटी आणि जेवणानंतर दोन तासांनी रक्ताची तपासणी करतात. हे बरोबरच आहे पण ज्या दिवशी तपासणी करायचीय त्यादिवशी नकळत हे रुग्ण खूप कमी खातात जेणेकरून रिपोर्ट साखरेची पातळी कमी दाखवतो. मधुमेह नियंत्रणात नसेल तर स्त्रियांमध्ये योनीमार्ग ,लघवी आणि इतर अवयवांचे संसर्ग बरेच होऊ शकत नाहीत . पेशींमध्ये वाढलेली साखर ही वेगवेगळ्या जीवजंतूंना आमंत्रण देत असते. कोविडच्या काळात काळी बुरशी म्हणजे mucor mycosis च्या संसर्गाचे मुख्य कारण मधुमेह हेच असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे खालील गोष्टी पाळल्या तर सगळ्यांच्याच आरोग्याच्या समस्या कमी होण्यास मदत होईल.
१.तरुण वयापासूनच भात आणि इतर कर्बोदके कमी खायची सवय करून घ्यावी. आहारात प्रोटीनचे प्रमाण जास्त असावे.
२.आठवड्यातून कमीत कमी चार दिवस तरी व्यायाम करायची शरीराला सवय लावल्यास तब्येतीच्या खूप तक्रारी कमी होतील. मोकळ्या हवेत रोज फिरायला जाण्यामुळे मानसिक ताण आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते.
३.आजच्या काळात पस्तीशीनंतर दरवर्षी Hba1c ही तपासणी नक्की करावी.
४.शुगर जास्त असल्याचा रिपोर्ट आला की पेशंट आधी बराच काळ आपल्याला मधुमेह आहे हे स्वीकारतच नाही. त्यामुळे उपचार आणि नियंत्रण लांबवले जाते. मात्र मधुमेहाचा स्वीकार करून त्यावर मात करण्याची वृत्ती असावी.
५.मधुमेह अनुवांशिक असला तरीही तुम्ही उत्तम जीवनशैलीने या अनुवंशिकतेवर मात करून मधुमेह होण्याचे वय खूप पुढे ढकलू शकता. गरोदरपणात वाढलेली शुगर ही पुढे होणाऱ्या मधुमेहाचा इशारा देत असते. अशा स्त्रियांनी व्यायाम,आहार आणि वजनावर नियंत्रण याकडे विशेष लक्ष द्यायला हवं.
६. रक्तातील साखर खूप वाढलेली असताना काहीच त्रास होत नाही म्हणून लोक दुर्लक्ष करतात, हे अत्यंत धोकादायक आहे. मधुमेह शरीरातील किडनी, हृदय, डोळे, रक्तवाहिन्या अशा सगळ्या अवयवांना वेगाने नुकसान पोहोचवत असतो.
७. सर्वात महत्वाचं, कृपया डॉक्टरांच्या सूचना आणि सल्ले याचं पालन करा. तुम्ही काय करता किंवा करत नाही हे डॉक्टर घरी येऊन बघू शकत नाहीत .त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करणे तुमच्याच हिताचे आहे.
(उद्या बोलू दुसऱ्या एका गैरसमजाविषयी)
(लेखिका स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)