भारतात लैंगिक शिक्षण योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे गर्भधारणाविषयाबाबत पुरेशी जागरुकता नाही. त्यामुळे आजही नको असलेली गर्भधारणा होण्याचे प्रमाण जास्त आहे. गर्भ राहीला असे वाटल्यास कधी मनानेच, कधी कोणी सांगितले म्हणून तर कधी रितसर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे म्हणून गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात. तर दुसरीकडे गर्भनिरोधक गोळ्या घेणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक असते, त्यामुळे त्या घेऊ नयेत असा समज असणाराही एक मोठा वर्ग पाहायला मिळतो. या गोळ्या घेतल्याने महिलांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होतो. अशाप्रकारची औषधे भविष्यात घातक ठरु शकतात अशाप्रकारच्या चर्चा आपण दबक्या आवाजात नेहमी ऐकतो.
मात्र या औषधांबाबत तज्ज्ञांकडून योग्य आणि पुरेशी माहिती घेऊन मगच त्याचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलेली ही औषधे नक्कीच फायदेशीर ठरु शकतात. वाशी येथील फोर्टीस हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ असलेल्या डॉ. नेहा बोथरा यांनी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या गर्भनिरोधक गोळ्यांविषयी सर्वच वयोगटातील महिलांच्या मनात साधारणपणे असणाऱ्या गैरसमजांविषयी खुलासा केला. डॉ. बोथरा म्हणतात, “गर्भनिरोधक गोळ्या योग्य पद्धतीने वापरल्यास त्या अतिशय उपयुक्त ठरतात. तसेच याच्या यशस्वीतेचे प्रमाण जास्त आहे. तसेच या गोळ्या तुमची मासिक पाळी नियमित येण्यास उपयुक्त असतात. प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्राव होत असेल तर त्यावरही नियंत्रण आणण्यास त्या फायदेशीर ठरतात. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ठराविक दिवस दररोज एक गोळी घेणे कंटाळवाणे आणि नकोसे होऊ शकते. मात्र एखादा दिवस जरी गोळी घेणे विसरल्यास गर्भधारणा टाळणे अवघड होते. त्यामुळे महिलांनी आपल्या रिप्रॉडक्टीव्ह हेल्थ (Reproductive health) चा योग्य तो विचार करुन या बाबतीत जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. तसेच गर्भनिरोधक गोळ्यांबाबतच्या गैरसमजांवर अजिबात विश्वास न ठेवता डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन महिलांनी आपले आरोग्य जपायला हवे.”
गर्भनिरोधक गोळ्यांबाबतचे गैरसमज
१. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे वजन वाढते -
सुरुवातीच्या गर्भनिरोधक गोळ्यांमुळे ठराविक काळासाठी वजनवाढ व्हायची. याचे कारण म्हणजे शरीरातील द्रव पदार्थांचे प्रमाण या औषधामुळे वाढते, त्यामुळे आपल्याला वजन वाढल्यासारखे वाटते. पण नव्याने आलेल्या गोळ्यांमुळे वजन वाढत नाही हे लक्षात घ्यायला हवे. उलट ज्यांना पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम म्हणजेच PCOS चा त्रास आहे त्यांच्यामध्ये तर अशाप्रकारच्या गोळ्यांमुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच या गोळ्यांचे इतरही फायदे असतात.
२. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे चेहऱ्यावर मुरुम येतात आणि केसांची असामान्य वाढ होते -
पूर्वीच्या काही औषधांमुळे शरीरावर असा परिणमाम होत असेल तर नवीन गर्भनिरोधक गोळ्यांतील घटकांत भिन्न प्रोजेस्टेरॉनसह, टेस्टोस्टेरॉन कमी करते आणि ज्यांना पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम म्हणजेच PCOS चा त्रास आहे त्यांना येणारी मुरुमे कमी करण्यास मदत करते
३. गर्भनिरोधक गोळ्यांचा कोर्स सुरू असताना एक दोन वेळा गोळ्या चुकल्या तर चालते
आपल्याला डॉक्टरांनी ठराविक काळासाठई काही औषधे दिली असतील आणि ती आपण योग्य पद्धतीने घेतली नाहीत तर त्यामुळे गर्भधारणा राहू शकते. तसेच यामुळे कधीतरी स्पॉटींग किंवा दोन मासिक पाळ्यांच्या मध्येच रक्तस्राव होऊ शकतो. त्यामुळे एक किंवा दोन गोळ्या कोणत्या कारणाने घ्यायच्या चुकल्या तर तातडीने आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांचा याबाबत सल्ला घ्यायला हवा. अशावेळी जे घडले आहे त्यावर काय उपाय करता येतील आणि गर्भधारणा टाळता येईल याबाबत पुरेसा विचार व्हायला हवा.
४. गर्भनिरोधक गोळ्यांचा प्रजनन क्षमतेवर परीणाम होतो
गर्भनिरोधक गोळ्यांचा आपल्या प्रजनन क्षमतेवर परीणाम होतो असा एकही पुरावा आतापर्यंत समोर आलेला नाही. या गोळ्या केवळ त्यावेळची गर्भधारणा प्रतिबंध करण्यास मदत करतात.
५. गर्भनिरोधक गोळ्या कोणत्याही जोखमीशिवाय घेतल्या जाऊ शकतात
ज्यांना रक्ताच्या गुठळ्या होण्याची, लठ्ठपणाची, धुम्रपानाची सवय असणाऱ्यांना या गोळ्यांमुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे या सर्व बाबींची डॉक्टरांना कल्पना देणे आवश्यक असते. त्यामुळे तोंडातून घेण्याच्या गर्भनिरोधक गोळ्या घेण्याआधी या सर्व गोष्टींची रुग्णांनी आणि डॉक्टरांनी खात्री करायला हवी.