आपल्याला मूल व्हावे असे प्रत्येक जोडप्याला वाटत असते. मूल होणे ही काहीशी गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याने जोडप्यांना यामध्ये अडचणी येतात. मग वेगवेगळे उपाय करुन मूल होण्यासाठी प्रयत्न केले जातात. तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने आज अशापद्धतीने मूल होणे सहज शक्य झाले आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या प्रयत्नांना यश आले आणि मूल पदरात आले की पालकांना हायसे वाटते. असेच काहीसे गुजरातमधील एका ७० वर्षीय महिलेबाबत झाले आहे. वयाच्या ७० व्या वर्षी जिवूबेन यांना मूल झाले आहे. त्यामुळे मुलाला जन्म द्यायची त्यांची इच्छा किती तीव्र असेल याची कल्पना येईल.
लग्नाला ४५ वर्षे झाली असतानाही वलाभाई आणि जिवूबेन यांना मूल हवे होते. त्यासाठी दोन वर्षापूर्वी ते भूज येथील डॉक्टरांकडे गेले. तुमचे वय झाल्याने तुम्हाला अशाप्रकारच्या गर्भधारणेमुळे अडचणी येऊ शकतात असा सल्लाही त्यांना डॉक्टरांनी दिला. मात्र काहीही झाले तरी चालेल मला मूल हवेच असा हट्ट जिवूबेन यांनी धरला, हे पाहून डॉक्टरही हैराण झाले. काही झाले तरी मला माझे मूल हवेच आहे असे या महिलेचे म्हणणे असल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. आता इतक्या जास्त वयाच्या महिलेला गर्भ कसा राहू शकतो याबाबत जाणून घेऊया...
१. ही गर्भधारणा IVF तंत्रज्ञानाने करण्यात आली. म्हणजेच बीजांड या ७० वर्षिय महिलेचे नसून ते इतर कोणत्या महिलेचे असावे.
२. जिवूबेन यांचे पती वलाभाई यांचे स्पर्म घेऊन सदर बीजांडाशी त्याचा संयोग करुन हा गर्भ जिवूबेन यांच्या गर्भाशयात वाढविण्यात आला.
३. महिलेचे गर्भाशय कधीही वृद्ध होत नाही तर तिचे अंडाशय वृद्ध होते.
४. ७० वर्षाच्या महिलेची मासिक पाळी कधीच बंद झालेली होती. मात्र सदर घटनेमध्ये महिलेवर उपचार करुन तिची मासिक पाळी पुन्हा सुरु करण्यात आली.
५. यामध्ये कृत्रिमरित्या हार्मोन्स देऊन महिलेचे गर्भाशय गर्भाच्या वाढीसाठी सशक्त बनविण्यात आले.
६. त्यामुळे या वयातही सदर महिला आपल्या गर्भाशयात गर्भ अतिशय व्यवस्थितपणे वाढवू शकली.
७. अशाप्रकारचे उपचार करणे हे आमच्यासाठी आव्हानात्मक काम होते असे या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
८. गर्भधारणा महिलेच्या पोटात झाल्याने या महिलेला सामान्य गर्भधारणेप्रमाणे दूध येते आणि ती स्तनपानही करु शकते.
याबाबत प्रसिद्ध प्रसूतीरोगतज्ज्ञ डॉ आनंद शिंदे म्हणाले, अशाप्रकारे गर्भधारणा झाल्यास ९ महिने बाळाला वाढवताना सदर महिलेच्या जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता असते. तसेच या महिलेला वयामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे त्रास असल्यास ही गर्भधारणा आणखी गुंतागंतीची होऊ शकते. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आई-वडिलांचे वय इतके जास्त असल्याने हे मूल कमी वयात पोरके होण्याची शक्यता असते. आपण सरासरी आयुष्यमान ८० वर्षे धरल्यास आई ७० वर्षाची असेल आणि वडिल त्याहून थोडे मोठे त्यामुळे कमी वयात हे मूल पोरके होऊ शकते. म्हणूनच वयाच्या या टप्प्यावर मूल होऊ द्यावे का नाही हा विवेकाने घ्यायचा निर्णय आहे, म्हणूनच सामाजिकदृष्ट्याही या गोष्टीचा विचार व्हायला हवा.