गरोदरपण आणि बाळंतपण हा महिलेच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. ९ महिने आपल्या पोटात एक जीव वाढवून त्याला सुखरुपपणे जन्म द्यायचा ही वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाचा इतक्या मोठ्या प्रमाणावर विकास झाला असे आपण म्हणत असलो तरी नुकतेच एक भयंकर वास्तव समोर आले आहे. ते म्हणजे जगात दर २ मिनीटाला एका गर्भवती आणि बाळंत महिलेचा मृत्यू होतो. नव्या जीवाला जन्म देताना मातेचा मृत्यू होणे ही अतिशय धक्कादायक आणि वाईट बाब आहे. युनायटेड नेशन्सच्या एका अहवालातून ही बाब समोर आली आहे (A Woman Dies Every Two Minutes Due to Pregnancy or Childbirth).
मूल जन्माला घालणे हा अतिशय आनंदाचा क्षण असला तरी पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नसल्याने किंवा अन्य काही कारणांनी महिलांना आपला जीव गमवावा लागत आहे. २०२० मध्ये जगभरात अशाप्रकारे गर्भारपण आणि बाळंतपणात मृत्यू झालेल्या महिलांची संख्या २ लाख ८७ हजार इतकी होती. मात्र २०१६ पेक्षा ती काही प्रमाणात कमी होती. २०२० मध्ये जगभरातील मृत्यू झालेल्या गर्भवती आणि बाळंत महिलांपैकी ७० टक्के महिला या एकट्या सब सहारन आफ्रिकेतील असल्याचे समोर आले आहे. खूप जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होणे, उच्च रक्तदाब, गर्भधारणेशी निगडीत संसर्ग, सुरक्षित नसलेली अबॉर्शन, एडस, मलेरिया यांसारख्या आजारांचा गर्भधारणेत सामना करणे ही गर्भवती महिलांच्या मृत्यूमागील महत्त्वाची कारणे आहेत.
या सर्व गोष्टींवर उपाययोजना असून त्या योग्य पद्धतीने उपलब्ध झाल्यास महिलांच्या मृत्यूचे प्रमाण निश्चितच कमी होऊ शकते असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जवळपास ३ पैकी १ महिलेला गर्भधारणा झाल्यानंतर किंवा मूल झाल्यानंतर पुरेशा सुविधा उपलब्ध होत नाहीत. जवळपास २७ कोटी महिलांना फॅमिली प्लॅनिंगच्या आधुनिक पद्धतींबद्दल माहितीच नाहीये. महिलांचा मुलाला जन्म देताना अशाप्रकारे मृत्यू होणे ही अतिशय वाईट बाब असून येत्या काळात प्रत्येक देशाने याकडे गांभिर्याने लक्ष द्यायला हवे. गर्भवती आणि बाळंत महिलांच्या मृत्यूचा दर कमी करण्याकडे आरोग्य यंत्रणांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.