बाळांतपणानंतर शारीरिक आणि मानसिकरित्या आई थकलेली असते. तिला पूर्ण आरामाची गरज असते. पण तो मिळतो का? महिना सव्वा महिना आई झालेली स्त्री पलंगावर बसलेली किंवा पहुडलेली दिसत असली तरी त्या अवस्थेत ती आराम करत असते असं नाही. आई झालेल्या स्त्रीच्या वाट्याला रात्रीची जागरणं, अपुरी झोप हे अनुभव येणारंच हे जणू इतरांसह तिने स्वत:नेही गृहित धरलेलं असतं. आणि म्हणूनच नव्या आईची अपुरी झोप हा न बोलण्याचा विषय होतो. पण समाज माध्यमांवर हा विषय चर्चिला गेला जेव्हा अभिनेत्री आणि लेखिका कल्की कोचलीन याबद्दल बोलली.
Image: Google
फेब्रुवारी 2020 मधे कल्कीला मुलगी झाली . आई झाल्याचा आनंद कल्कीने व्यक्त केलाच पण आईपणासोबत मिळालेली अपुर्या झोपेची वेदना ती लपवू शकली नाही. भलेही ती याबद्दल उशिरा बोलली पण बोलली हे महत्त्वाचं.
कल्कीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यात तिने आपल्या या अपुर्या झोपेबद्दलच्या वेदनेला शब्दरुप दिले. ती म्हणते की, अपुरी झोप हा काही विनोद नाही. अतिशय गंभीर विषय आहे. अपुर्या झोपेमुळे शारीरिक आणि मानसिकरित्या अशक्तपणा येतो. आज संपूर्ण जगात अनेकांना अपुर्या झोपेची समस्या विविध कारणांमुळे भेडसावते आहे. आई झालेल्या स्त्रिया अपुर्या झोपेच्या अनुभवाशी स्वत:ला नक्कीच जोडू शकतात.
ही अपुरी झोप आपल्याला दमवून टाकते, निराश करते. पण आई झालेल्या स्त्रीच्या आजूबाजूची माणसं तिला या कामी नक्कीच मदत करु शकतात. घरातल्या कामांची जबाबदारी थोडी स्वत:वर घेऊन बाळासोबत आईलाही झोपता येईल असा निवांतपणा तिला नक्कीच देऊ शकतात. आई झालेल्या स्त्रीची ती मोठी गरज असते. गेल्या दीड वर्षांपासून मुलीची काळजी घेत असताना ही अपुरी झोप माझ्या वाट्याला अनेकदा आल्याचं कल्की म्हणते. पण शक्य तेव्हा छोटीशी डुलकी काढून आराम करण्याचा आपण प्रयत्न केल्याचं ती म्हणते. अपुरी झोप ही आई झालेल्या स्त्रीला छळणारी मोठी गोष्ट असते. त्याबद्दल बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. पण तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करणार्या या गंभीर गोष्टीकडे तिने स्वत: आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी गंभीरपणे पाहायला हवं.
Image: Google
कल्कीनं ही छोटीशी पोस्ट लिहून आईच्या अपुर्या झोपेच्या समस्येला वाचा तर फोडलीच सोबतच आई झालेल्या स्त्रीला पूर्ण झोप मिळणं कसं आवश्यक आहे याकडेही जगाचं लक्ष वेधलं आहे. अर्थातच या समस्येवर कोणी बाहेरुन येऊन उपाय करु शकणार नाही हेही खरंच आहे. स्वत: ती स्त्री आणि तिचं कुटुंबच ही समस्या सोडवू शकतात. पण किमान या समस्येचं गांभीर्य तरी काय हे कल्कीच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टवरुन समोर आलं.
अपुरी झोप का?
आई झालेल्या प्रत्येक स्त्रीला बाळाची काळजी घेण्यासाठी, बाळ रात्री उठतं म्ह्णून, बाळाला दूध पाजण्यासाठी म्हणून रात्री मधे मधे उठावं लागतं. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असलेली शांत सलग झोप कित्येक महिने, अनेकींना तर बाळांतपणानंतर दीड दोन वर्ष मिळू शकत नाही. मातृत्त्व हे एक कारण सोडल्यास अपुर्या झोपेची अनेक कारणं आहेत. या कारणांनी अनेकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. सकाळी झोपल्यामुळे, मेंदूत काही समस्या निर्माण झाल्यामुळे, खूप थकल्याची भावना निर्माण झाल्याने, चिडचिड झाल्याने, भीती वाटत असल्याने अपुर्या झोपेच्या समस्येला जगभरात अनेकांना सामोरं जावं लागत आहे.
कल्की मातृत्त्वामुळे आईला भेडसावत असलेल्या अपुर्या झोपेची समस्या सोडवण्यासाठी स्वत:च्या अनुभवातून एक महत्त्वाची गोष्ट सांगते. ती म्हणते की, आईनं छोटीशी डुलकी काढण्याची संधी शोधायला हवी आणि ती मिळाली की आनंदानं झोपायला हवं. मग ही संधी साडे तीन मिनिटाची असू देत किंवा साडे तीन तासाची. नाहीतर मग झोप कशी पूर्ण होणार?
‘युएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन’ ही आरोग्यविषयक राष्ट्रीय संस्था आहे. या संस्था आईच्या अपुर्या झोपेवर केलेल्या अभ्यासाचा संदर्भ देत म्हणते की, बाळांतिण झालेल्या आईची झोप ही ती बाळंत होण्यापूर्वी किंवा गरोदर राहाण्याच्या आधीच्या स्थितीपेक्षा खूपच कमी असते. या अपुर्या झोपेमुळे नैराश्य येण्याचा धोका असतो.
Image: Google
तज्ज्ञ काय म्हणतात?
बाळंतपणानंतर आईला बाळाची काळजी घ्यावी लागत असली तरी 6 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे. पण बाळाची काळजी घेताना सलग 6 ते 8 तास झोपणं ही बाब आईसाठी अशक्य होते. अशा वेळेस दिवसभरात आपली झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न तरी ती स्त्री करु शकते आणि यासाठी तिला तिचं कुटुंब नक्कीच मदत करु शकतं. तज्ज्ञ यासाठी आई झालेल्या स्त्रियांना आपली झोप पूर्ण करण्याचे काही मार्गही सुचवतात्.
1. झोप पूर्ण करण्याचा सोपा उपाय म्हणजे बाळ जेव्हा झोपतं तेव्हा आपणही झोपून घ्यायला हवं. बाळाच्या झोपेशी आपल्या झोपेची सांगड घातली तर आईला पुरेसा आराम मिळतो आणि तिची रात्रीची अपूर्ण झोप भरुन निघते.
2. बाळ झोपलं की अनेक महिला घर आवरतात , घरातली कामं करतात किंवा टी.व्ही किंवा मोबाइल पाहात बसतात. यामुळे त्यांच्या आरामाची वेळ टळून जाते. आणि एकदा का बाळ उठलं की झोपायला मिळत नाही. त्यामुळे बाळ झोपलं की घरातली कामं बाजूला ठेवून, टी.व्ही मोबाईल पाहाण्यात वेळ न दवडता तिने आपल्या झोपेला प्राधान्य द्यायला हवं.
3. रात्री सलग 6-8 तास झोपणं शक्यं नसतं. रात्री जर आईची तीन चार तासच झोप होत असेल तर बाकीची झोप दिवसभरात तासा-दिड तासाच्या छोट्या छोट्या डुलक्या काढून भरुन काढावी. सकाळी बाळाला आंघोळ घातल्यानंतर बाळ दोन तास झोपत असेल तर तेव्हा दोन तासांची दुपारच्या जेवणानंतर , बाळ झोपलेलं असलं की आईनंही तास दिड तास झोप काढावी. दिवसभरात अशा छोट्या छोट्या डुलक्या घेऊनच आईची झोप पूर्ण होऊ शकते आणि तिला अपुर्या झोपेमुळे उद्भवणार्या समस्यांना टाळता येतं असं तज्ज्ञ म्हणतात.