गर्भधारणे दरम्यान आणि बाळंतपणानंतर जाड होणे यात काहीच वावगे नाही. स्त्रीच्या शरीरात होत असणाऱ्या बदलांचा तो परिणाम असतो हे स्वतः स्त्रीने आणि तिच्या आजूबाजूच्या लोकांनीही लक्षात घ्यायला हवे. सामान्य स्त्रियांच्या बाबतीत जे घडते त्याचप्रमाणे सेलिब्रिटींच्या बाबतीतही कमी अधिक प्रमाणात तेच घडते. बाळंतपण झाल्यावर करिअरमध्ये येणारा ब्रेक, त्यानंतर वाढणारे वजन या सगळ्यातून अभिनेत्रीनाही सामोरे जावे लागते. पण अभिनेत्रींच्या बाबत सगळ्याच गोष्टीत चर्चा होतात आणि त्यावरून त्यांना ट्रोलही केले जाते. प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू हिने करण सिंग ग्रोव्हर सोबत लग्नगाठ बांधल्यानंतर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मुलीला जन्म दिला. तिचे नाव देवी ठेवले असून पुढच्या महिन्यात ती 1 वर्षाची होईल म्हणजेच बिपाशाही 1 वर्षाची आई होईल (Actress Bipasha basu talk about trolling about weight gain after pregnancy).
'न्यूज 18' ला दिलेल्या मुलाखतीत बिपाशा आणि करण यांनी आपल्या पालकत्वाच्या नवीन भूमिकेबाबत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यावेळी आपल्या वाढलेल्या वजनाबद्दल लोकांकडून केल्या जाणाऱ्या ट्रोलींगबाबतही बिपाशाने मत व्यक्त केले. बिपाशाची गर्भधारणा ही IVFच्या माध्यमातून झाली आहे. त्यानंतर तिचे वजन मोठ्या प्रमाणात वाढले आणि तिला बॉडी शेमिंग आणि नकारात्मकता यांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. याबाबत बिपाशा म्हणाली ' तुमचे ट्रोलींग कृपया असेच चालू राहूद्या कारण मला त्याचा काहीच फरक पडत नाही. ' त्यामुळे वजन वाढीवरून ट्रोल करणाऱ्यांना बिपाशाने अतिशय गोड बोलून खडे बोल सुनावले आहेत.
आई झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीचे आयुष्य मोठ्या प्रमाणात बदलते त्याचप्रमाणे बिपशाचेही झाले आहे. आता माझ्यासाठी देवी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असल्याचे ती म्हणाली. मी घराबाहेर जाते तेव्हा मी कधी एकदा घरी येते आणि तिच्या सोबत राहते असे मला झालेले असते असेही बिपाशा म्हणाली. सध्या देवी ही माझ्यासाठी नंबर एकचे प्राधान्य आहे, त्यानंतर मी नंबर २ आणि करण नंबर ३ हेही बिपाशाने स्पष्ट केले. देवीच्या हृदयाला जन्मतः २ होल असल्याने तिचा आणि आई वडील म्हणून आमचाही प्रवास इतरांसारखा नव्हता. अवघ्या ३ महिन्यांची असताना देवीची ऑपरेशन झाली. त्यामुळे जन्मापासूनच तिचा झगडा सुरू झाला आहे.