Join us   

आई झाले, जाड झाले! - आता पूर्वीसारखं काही नको.. हे सल्ले विसरा, सांगतेय मधुरा वेलणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 8:20 PM

आई झाले आता काय?.... माझ्याकडून अमकं होणार नाही, तमकं करणं मला जमणार नाही.. असे विचार नव्याने आई होणाऱ्या प्रत्येकीच्या मनात डोकावतातच...पण आई झालीस म्हणून सगळं सोडू नको, असं सांगणारी एक सुंदर पोस्ट अभिनेत्री मधुरा वेलणकर हिने नुकतीच शेअर केली आहे. 

ठळक मुद्दे मधुराने सांगितलेला अनुभव पहिल्यांदा आई झालेली प्रत्येक बाई घेत असते. तुमच्या आनंदासाठी, तुमच्या स्वत:साठी तुमच्या आवडीच्या काही गोष्टी जरूर करा.

आई होणं ही खूप मोठी जबाबदार आहे. ही जबाबदारी एकदा अंगावर आली की, अनेकजणी यात पुर्णपणे गढून जातात. आपल्या करिअरला किंवा आपल्या आवडीनिवडीला लागलेला हा पॉज आहे की ब्रेक आहे, हेच अनेकींना कळत नाही. साहजिकच बाळाची काळजी घेण्यामुळे सुरूवातीच्या काळात इतर अनेक गोष्टींवर मर्यादा येतात. शरीरही आपली साथ सोडतं आणि बाळांतपणापुर्वीचं कोवळं शरीर सगळीकडे परिपक्वपणाच्या खाणाखुणा सोडू लागतं. हे पाहून नैराश्य येणं साहजिक आहे. पण त्या पलिकडेही एक जग आहे आणि थोड्याच दिवसात आपण पुन्हा नॉर्मल लाईफ जगायला सुरूवात करणार आहोत, हे अनेकींना समजायला उशीर होताे.

 

अशाच आशयाची एक पोस्ट अभिनेत्री मधुरा वेलणकर हिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते....

"आई झाले! जाड झाले! काही खास लोक म्हणाले, “आता नाचू नको” सोनिया ताई : “नाच सोडू नको, मेहनत सोडू नको! स्वत:साठी नाच, स्वत:ला स्विकारून नाच, कलेची साधना काय देऊ शकते हे अनुभवण्यासाठी नाच!"

 

मधुरा वेलणकर हिने शेअर केलेली पोस्ट प्रत्येक आईच्या मनाला स्पर्शून जाणारी आहे. ही पोस्ट वाचून आपण आई झाल्यावर काय सोडून दिलं हे देखील प्रत्येकीला तिचं तिचं आठवून गेलं. आई झाल्यावरही आपण अमूक अमूक गोष्ट करणार, असा आपला इरादा पक्का असला तरी आपल्या जवळपासची काही माणसं त्यांच्या त्यांच्या विचारानुसार यामध्ये खोडा घालतात. पण आपणहून मिळणाऱ्या सल्ल्यांमधून काय ऐकायचं आणि काय सोडायचं हे जर समजलं तर आई झाल्यानंतरही आपण आपले छंद, आवडीनिवडी जोपासू शकतो, हेच मधुराने या पोस्टमधून सांगायचा प्रयत्न केला आहे. 

 

मधुराने सांगितलेला अनुभव पहिल्यांदा आई झालेली प्रत्येक बाई घेत असते. आई झालो म्हणून आता आयुष्यातलं हे बदलणार, ते बदलणार असे विचार काही जणींना तर प्रेग्नन्सीपासून सुरू होतात. पण आई झालो म्हणून अमुक अमुक करणं सोडायचं, हे काही योग्य नाही. तुमच्या आनंदासाठी, तुमच्या स्वत:साठी तुमच्या आवडीच्या काही गोष्टी जरूर करा आणि आई झालो म्हणून त्या गोष्टी करायच्या सोडू नका, असेही या छोट्याश्या पोस्टद्वारे सुचविण्यात आले आहे. 

 

टॅग्स : आरोग्यमधुरा वेलणकरमहिलाप्रेग्नंसी