ॲम्नीऑसेन्टेसिस तपासणी ही जन्मपूर्व चाचणी आहे. ही चाचणी गरोदरपणाच्या काळात केली जाते. या चाचणीद्वारे गर्भातील व्यंग ओळखला जातो, ही चाचणी केवळ त्याच महिलांची केली जाते ज्यांच्या गर्भात व्यंग असण्याची शक्यत असते.
ॲम्नीऑसेन्टेसिस म्हणजे उदर पोकळीच्या पुढील भागातून सुई किंवा सिरिंजच्या साहाय्यानं गर्भशयातील पाणी काढणं. गर्भ गर्भजलात असते. गर्भाचे काही द्रव गर्भाशयातील पाण्यात मिसळले जातात. हे पाणी तपासल्यानंतर गर्भात काही व्यंग आहे अथवा नाही हे तपासता येऊ शकतं. या पाण्याचे अनुवांशिक विश्लेषण (जेनेटिक ॲनालिसीस) केल्यानंतर डाऊन सिंड्रोम, थॅलॅसेमिया, सिकल सेल डिसीज किंवा इतरही काही आजार आहेत का हे समजू शकतं. या चाचणीद्वारे गर्भाचं आरोग्य आणि संभाव्य धोके यांची माहिती मिळू शकते.
कशामुळे समजू शकते कि मातेला धोका आहे?
जन्माला येणारं बाळ काही अनुवांशिक दोष घेऊन जन्माला येण्याची काहीवेळा शक्यता असते. जर वेळीच तपासणी झाली नाही तर पालकांसाठी ते अतिशय काळजीचं आणि अस्वस्थता निर्माण करणारं कारण असू शकतं. खालील अनुवांशिक मुद्द्यामुळे अनुवांशिक दोष बाळात निर्माण होण्याची शक्यता असते जर,
१) आई ३५ वर्षांपेक्षा मोठी असेल.
२) कुटुंबात थॅलॅसेमिया, सिकल सेल सारखेआनुवंशिक आजार असतील.
३) गर्भाच्या गुणसूत्रातील दोष जे सोनोग्राफीदरम्यान लक्षात येतात.
४) स्त्रीला एक मूल गंभीर स्वरूपाच्या अनुवांशिक दोषांचं झालं असेल.
ॲम्नीऑसेन्टेसिस तपासणी कशी केली जाते?
गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीत ही चाचणी केली जाते. साधारणपणे १६ ते २४ आठवड्यांच्या कालावधीत केली जाते. ही चाचणी डॉक्टरांच्या क्लिनिकलाच होते. सोनोग्राफी करताना एक बारीक सुई बेंबीपाशी टोचून काही ॲम्नीऑटिक द्रव बाहेर काढलं जातं. अगदी काही क्षणातच हे द्रव काढलं जातं आणि प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलं जातं. ॲम्नीऑसेन्टेसिस चाचणी सुरक्षित असते. बहुतेक वेळा या चाचणी दरम्यान वेदना होत नाहीत. क्वचितच दुखल्याच्या केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. १००० केसेसमध्ये १ ते ३ वेळा या चाचणीमधे काहीतरी त्रास झाला किंवा अडचण आली अशी नोंद आहे.
आपल्या होणाऱ्या बाळामध्ये काही अनुवांशिक दोष नाहीत ना हे पालकांना आधीच या चाचणीमुळे समजू शकते.
चाचणीचे रिझल्टस आल्यावर पुढे काय?
जर चाचणीत अनुवांशिक दोषांची शक्यता बाळाला अधिक असली तर अधिक सखोल चाचण्या करून नक्की काय प्रॉब्लेम आहे, असू शकतो हे शोधता येते. आणि डॉक्टरांशी बोलून जर तशीच गंभीर समस्या असेल तर गर्भपाताचाही निर्णय घेता येऊ शकतो.
होणारं मूल सुदृढ आणि निरोगी असायला हवं ही काळजी आणि इच्छा प्रत्येक पालकांची असते. या चाचण्यांमुळे आपलं बाळ सुदृढ आहे ना हे काही प्रमाणात का होईना तपासता येऊ शकतं.
विशेष आभार: डॉ. प्रशांत आचार्य
( MD FICOG), फेटल मेडिसिन आणि हाय रिक्स ऑब्स्टट्रिक केअर तज्ज्ञ