डॉ. जयदीप पळवदे
मातृत्वामुळे स्त्रीला पूर्णत्व येते असे म्हणतात, आई होणं हा प्रत्येक स्त्रीसाठी आनंदाचा क्षण असतो. हे मातृत्व सुखद, सुरक्षित व सुदृढ व्हावे यादृष्टीने काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतरचे नियोजन व महत्त्वाचे ठरते. सुखद प्रसूतीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या स्त्रीचे प्रसूतीनंतरचे आरोग्य तसेच बाळाचे प्रसूती दरम्यान व नंतरचे आरोग्य खूप महत्त्वाचे आहे व त्याचा कायम प्राधान्याने विचार होणे आवश्यक आहे. हे सगळे ठिक असले तरी या सगळ्या काळात नेमकी काय आणि कशी काळजी घ्यायची हे आपल्याला माहित नसते. पाहूया त्यासाठीच काही महत्त्वाच्या टिप्स....
१.आपले डॉक्टर योग्य शिक्षित व अनुभवी असावेत. तसेच प्रसूती ही अशी गोष्ट आहे की त्यामध्ये बऱ्याच अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आपल्या शंकांसाठी आणि उपचारांसाठी कोणत्याही वेळेला उपलब्ध असणारे डॉक्टर असायला हवेत.
२. आपण निवडलेले हॉस्पिटल सगळ्या अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त हवे. यामध्ये सोनोग्राफी , पॅथॉलॉजी, आधुनिक ऑपरेशन थिएटर, २४ तास औषधाचे दुकान, खाण्यापिण्याची सोय अशा गोष्टी अवश्य असायला हव्यात.
३. बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रणाही याठिकाणी असायला हवी. बाळाला जन्मानंतर कोणता त्रास असेल तर त्याला न्यू बोर्न आय सी यू nicu मध्ये ठेवावे लागते. शक्यतो आपल्याच हॉस्पीटलमध्ये ही सुविधा असेल तर जास्त चांगले. त्यामुळे नातेवाईकांची धावपळ होत नाही.
४. गर्भधारणेदरम्यान औषधोपचारा व्यतिरिक्त डाएट, योगा, समुपदेशन या गोष्टींचा रुग्णालयात अंतर्भाव असेल तर ते फायद्याचे ठरते. त्यामुळे रुग्णालयाची निवड करताना या सगळ्या गोष्टी पाहून घ्याव्यात.
ह्या सगळ्याचां खूप चांगला उपयोग आई व बाळाच्या पुढील आरोग्यसाठी उपयुक्त ठरतो.गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंतचा काळ माता आणि अर्भकासाठी नाजूक असतो. याबरोबरच प्रसूतीनंतर बालकाच्या सर्वांगीण पोषणासाठी आणि मातेच्या सुदृढ आरोग्यासाठीही या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. पण आपल्याकडे त्याचा म्हणावा तितका विचार केला जात नाही. त्यामुळे भविष्यात माता आणि बालक यांच्यासमोर आरोग्याच्या समस्या उभ्या राहतात. बर्याचदा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे किंवा निदानात्मक उपचारासाठी आधुनिक संसाधनांच्या अभावामुळे गंभीर स्थिती उद्भवल्याचे दिसते.
गर्भवती मातेची प्रसूती ही नैसर्गिक व कमी कष्टदायी व्हावी, यासाठी गर्भधारणेपासूनच शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन करायला हवे. गर्भवती स्रीचा आहार उत्तम असेल तर जन्माला येणारे बाळही सुदृढ असण्याची शक्यता वाढते. गर्भावस्थेत आईचे साधारण १० ते १६ किलो वजन वाढणे चांगले मानले जाते. वजन वाढवण्यासाठी आपण अतिरिक्त प्रमाणात पौष्टिक आहाराचे सेवन करायला हवे. पौष्टिक, संतुलित आहारामध्ये प्रथिनेयुक्त पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ हे कॅल्शिअमचा पुरवठा करतात. तसेच स्टार्चयुक्त पदार्थ आणि भरपूर फळभाज्यांचाही समावेश आहारात करायला हवा. यातून आवश्यक जीवनसत्त्वे आणि फायबर म्हणजे तंतूजन्य पदार्थांचा शरीराला पुरवठा होतो अशा संतुलित आहारासोबत नियमित व्यायामही तितकाच महत्त्वाचा असतो.
(लेखक स्त्रीरोगतज्ञ आहेत)