Join us   

प्रेग्नन्सीमध्ये मळमळ - ॲसिडीटी - कॉन्स्टीपेशन होतं? आहारात करा सोपे बदल, त्रास होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2023 12:37 PM

Basic or Common Pregnancy Problems and Their Solutions : आहारात काही सोपे बदल केल्यास या लहान-मोठ्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते

गर्भधारणा हा प्रत्येक स्त्रिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर बदलत नाही तितकं आयुष्य मूल आल्यानंतर बदलणार असतं. इतकंच नाही तर गर्भधारणा झाल्यानंतर महिलांच्या शरीरात, मानसिकतेत आणि भावनिक अवस्थेतही मोठ्या प्रमाणात बदल होतात. हार्मोन्समध्ये बदल झाल्याने हे सगळे घडत असते. आपल्या जीवात एक जीव वाढवणे ही वाटते तितकी साधी आणि सोपी गोष्ट नक्कीच नाही. त्यामुळेच गर्भधारणा झाल्यापासूनच शरीराच्या काही ना काही तक्रारी सुरू होतात. बाळ होणार या आनंदात काही वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण अनेकींना मळमळीचा किंवा अन्य त्रास इतके जास्त होतात की बरेचदा हे ९ महिने नकोसे होऊन जातात (Basic or Common Pregnancy Problems and Their Solutions). 

सुरुवातीचे ३ ते ४ महिने बहुतांश महिलांना मळमळ, उलट्या, अॅसिडीटीचा त्रास होतो. तर त्यानंतर कॉन्स्टीपेशन, हिमोग्लोबिनची कमतरता यांमुळे पचनाशी निगडीत तक्रारी किंवा प्रमाणाबाहेर थकवा अशा समस्या उद्भवतात. अशावेळी आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपाय करतोच. पण गर्भधारणा झालेली असताना जास्त प्रमाणात औषधे घेऊ नयेत हेही आपल्याला माहित असल्याने आहारात काही सोपे बदल केल्यास या लहान-मोठ्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. आहारामध्ये अगदी लहान बदल केल्यास त्याचा नेमका कसा परीणाम होतो ते पाहूया...

अॅसिडीटीचा त्रास असेल तर 

१. रिकाम्या पोटी केळं खायला हवे.

२. शक्य तितके नारळ पाणी म्हणजेच शहाळं पाणी प्यायला हवं.

३. एकावेळी कमी आहार घेऊन जास्त वेळा थोडे थोडे खावे.

हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास..

१. काळ्या मनुकांचा आहारात आवर्जून समावेश करावा.

२. डाळींब नियमितपणे खायला हवे.

३. बीटाचा आहारात अवश्य समावेश करायला हवा.

कॉन्स्टीपेशन होत असेल तर...

१. आहारातील फायबर असणाऱ्या पदार्थांचा समावेश वाढवावा. यामध्ये प्रामुख्याने सॅलेडचा समावेश होतो.

२. इसाबगोल हे कॉन्स्टीपेशनसाठी अतिशय उपयुक्त असे औषध असून डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण ते निश्चित घेऊ शकतो. 

३. पाणी कमी प्यायले गेल्यासही कोठा जड होतो आणि पोट साफ होत नाही. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी आणि द्रव पदार्थ घेणे अतिशय गरजेचे आहे. 

हातापायांवर खूप सूज आली तर..

१. आहारातील मीठाचा वापर कमी करावा.

२. पाणी जास्तीत जास्त प्यायचे. 

३. हाता-पायांना मसाज करायचा 

४. आहारातील चहा आणि कॉफीचे प्रमाण कमी करायचे.    

टॅग्स : आरोग्यप्रेग्नंसीगर्भवती महिलाहेल्थ टिप्स