गर्भधारणा ही प्रत्येक स्त्रीसाठी एक आनंदाची बाब असली तरी ती आव्हानात्मक असते. शरीरात, मनात आणि एकूणच होणारे बदल स्त्रिला आतून-बाहेरुन बदलून टाकणारे असतात. गर्भधारणा झालेली असताना ९ महिने आरोग्याची काळजी घेणे अतिशय गरजेचे असते. यामध्ये उत्तम आहारासोबतच, व्यायाम, मानसिक शांती, भावनिक स्थिरता या सगळ्या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. गर्भधारणा झाल्यानंतर साधारण ३ महिने कोणत्याच प्रकारचा व्यायाम करु नये असे सांगितले जाते. मात्र त्यानंतर चालणे, योगासने, प्राणायाम असे किमान व्यायाम करायला हवेत असे आवर्जून सांगितले जाते. शेवटच्या ३ महिन्यात तर गर्भाची निर्मिती जवळपास पूर्ण झालेली असल्याने गर्भधारणा सुलभ होण्यासाठी काही नेमके व्यायामप्रकार सांगितले जातात. यामध्ये उठाबशा काढण्याबरोबरच डक वॉक करण्यासही सांगितले जाते. डॉक्टर किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने हे व्यायाम केल्यास ही सगळी प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होते. डक वॉक म्हणजे काय आणि ते केल्याने काय फायदे होतात पाहूया (Benefits of Duck walk in pregnancy)...
डक वॉक म्हणजे नेमके काय?
दोन्ही पायांवर खाली बसून बदकासारखे चालण्याला डक वॉक असे म्हटले जाते. पोट वाढलेले असल्याने या अवस्थेत हा वॉक करणे थोडेसे अवघडल्यासारखे होऊ शकते. पण यामुळे गर्भधारणेमुळे प्रसरण पावलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. तसेच कंबरेच्या खालच्या भागाला यामुळे चांगला व्यायाम होत असल्याने डक वॉक करण्याचा सल्ला दिला जातो. उठाबशा प्रकारातीलच हा एक प्रकार असून बाळंतपणाची प्रक्रिया सुलभ होण्यास याची मदत होते.
डक वॉकचे फायदे
१. डक वॉकमुळे पेल्विक फ्लोअरचे स्नायू सक्रिय होतात. जे गर्भधारणेदरम्यान गर्भाशय आणि पेल्विक अवयवांना आधार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. हे स्नायूंना मजबूत झाल्यास तुम्हाला गर्भधारणेतही हालचाल करणे सोपे होते.
२. गर्भधारणेमुळे स्नायूंमध्ये कडकपणा येतो आणि लवचिकता कमी होऊ शकते. पण नियमितपणे डक वॉक केल्यास शरीरात लवचिकपणा टिकून राहण्यास मदत होते.
३. प्रेग्नन्सीमध्ये बहुतांश महिलांना पाठदुखी, कंबरदुखी हा त्रास उद्भवतो. पण डक वॉकमुळे या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते. पाठीच्या कण्यावर पडणारा दबाव कमी होण्यास मदत होते.
४. डक वॉकमुळे स्नायू लवचिक झाल्याने नॉर्मल डीलिव्हरी होण्याची शक्यता काही प्रमाणात जास्त असते. तसेच लेबर पेनमध्ये होणारे पेन काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असते.